द रॉक! एक असा भयावह कैदखाना, ज्यातून कधीच कुणी कैदी पळून जाऊ शकला नाही...

By ऑनलाइन लोकमत | Published: May 9, 2020 03:57 PM2020-05-09T15:57:38+5:302020-05-09T16:13:58+5:30

या तुरूंगाचं नाव आहे अलकाट्राज जेल. हा तुरूंग कॅलिफोर्नियातील सॅन फ्रान्सिस्कोच्या तटापासून दूर अलकाट्राज बेटावर आहे.

जगभरात वेगवेगळ्या शहरांमध्ये एकापेक्षा एक सुरक्षित आणि भयावह तुरूंग आहेत. तर काही असेही तुरूंग आहेत ज्यांना बघून वाटतं की, ते तुरूंग नाही तर फाइव्ह स्टार हॉटेल्स आहेत. तशा सामान्यपणे कोणत्या ना कोणत्या तुरूंगातून कैदी पळून गेल्याची बातमी आपण वाचत असतोच.

पण आज आम्ही तुम्हाला एका खास तुरूंगाबाबत सांगणार आहोत. असे म्हणतात की, या तुरूंगातून आजपर्यंत कुणी पळून जाऊ शकलं नाही. प्रयत्न अनेकांनी केले पण यश कुणालाच आलं नव्हतं. (Image Credit : YouTube)

या तुरूंगाचं नाव आहे अलकाट्राज जेल. हा तुरूंग कॅलिफोर्नियातील सॅन फ्रान्सिस्कोच्या तटापासून दूर अलकाट्राज बेटावर आहे. याचं निर्माण 1934 मध्ये करण्यात आलं होतं. पण जास्त खर्च लागत असल्याने हे तुरूंग 1963 मध्ये बंद करण्यात आलं होतं.

आता या तुरूंगाचा वापर केवळ म्युझिअम म्हणून केला जातो. दरवर्षी हजारो पर्यटक हा तुरूंग बघायला गर्दी करतात. या तुरूंगाला 'द रॉक' या नावानेही ओळखलं जातं.

कडक बंदोबस्त आणि चारही बाजूंनी सॅन फ्रान्सिस्कोच्या खाडीतील थंड पाण्याने वेढलेल्या या तुरूंगाला अमेरिकेतील सर्वात मजबूत तरूंग मानला जातो. असे मानले जाते की, इथून पळून जाण्याचा प्रयत्न अनेकांनी केला. पण कुणालाच यश आलं नाही.

असे म्हणतात की, या तुरूंगात अमेरिकेतील सर्वात कुख्यात कैद्यांना ठेवलं जात होतं. या तुरूंगाच्या 29 वर्षाच्या इतिहासात एकूण 36 कैद्यांनी इथून पळून जाण्याचा प्रयत्न केला. पण यातील 14 कैद्यांना पकडण्यात आलं, काहींवर गोळ्या झाडण्यात आल्या आणि काही पाण्यात बुडून मरण पावले. यातील 5 कैद्यांचे मृतदेह सुद्धा सापडले नाहीत. (Image Credit : YouTube)

असेही सांगितले जाते की, जून 1962 मध्ये या तुरूंगातून तीन कैदी फ्रॅंक मॉरिस, जॉन एंगलिन आणि क्लेरेंस एंगलिन पळून जाण्यात यशस्वी ठरले होते. अनेक वर्षांनी पोलिसांना मिळालेल्या एका पत्रातून हा दावा करण्यात आला होता.

त्यानंतर पोलिसांनी त्यांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. पण त्यांच्या हाती काही लागलं नाही. इतकेच काय तर पळून गेलेल्या कैद्यांच्या कुटूंबियांनी सुद्धा ते जिवंत असल्याचा दावा केला होता. पण ते सापडले नाहीत.

या तुरूंगाला अमेरिकेतील सर्वात भितीदायक तुरूंग मानला जातो. इथे अनेक कैद्यांनी आत्महत्या केली होती. त्यानंतर असाही दावा केला जातो की, इथे त्या लोकांची आत्मा भटकत राहते. तसेच इथे अनेक विचित्र घटनाही घडल्याचं लोक सांगतात.