फक्त २ तासांत २५६ किमी पार! 'या' मुस्लिम देशात आहे जगातील अनोखा हायवे; गिनीज बुकमध्येही नोंद

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 12, 2026 20:47 IST2026-02-12T20:44:31+5:302026-02-12T20:47:53+5:30

जगाच्या पाठीवर एक असाही महामार्ग आहे, जिथे तुम्ही स्टिअरिंग एकदा सरळ धरलं की पुढचे दोन तास तुम्हाला ते फिरवावच लागणार नाही!

रस्ता म्हटला की नागमोडी वळणं, चढ-उतार आणि ट्रॅफिक हे ओघानं आलंच. पण जगाच्या पाठीवर एक असाही महामार्ग आहे, जिथे तुम्ही स्टिअरिंग एकदा सरळ धरलं की पुढचे दोन तास तुम्हाला ते फिरवावच लागणार नाही!

सौदी अरेबियातील 'हायवे-१०' सध्या आपल्या अनोख्या बनावटीमुळे संपूर्ण जगात चर्चेचा विषय ठरला आहे. या रस्त्याने ऑस्ट्रेलियाच्या आयरे हायवेचा विक्रम मोडीत काढत जगातील सर्वात लांब आणि सरळ रस्ता म्हणून 'गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्स'मध्ये आपले नाव कोरले आहे.

हा महामार्ग सौदी अरेबियातील 'अल-खली' वाळवंटातून जातो. या वाळवंटाला 'एम्प्टी क्वार्टर' म्हणूनही ओळखले जाते, कारण हा जगातील सर्वात मोठा सलग रेतीचा प्रदेश आहे. या विस्तीर्ण आणि ओसाड वाळवंटातून तब्बल २५६ किलोमीटरपर्यंत हा रस्ता अगदी पट्टीने आखल्यासारखा सरळ जातो. यात कुठेही एकही वळण किंवा चढ-उतार नाही.

या हायवेचा इतिहासही रंजक आहे. हा रस्ता सुरुवातीला सौदीचे माजी राजा किंग फाहद यांच्यासाठी एक खाजगी रस्ता म्हणून विकसित करण्यात आला होता. पुढे तो सार्वजनिक करण्यात आला. हा हायवे 'हराद' शहराला संयुक्त अरब अमिरातीच्या सीमेजवळील 'अल बाथा' या ठिकाणाशी जोडतो.

जर तुम्ही या रस्त्यावरून प्रवास करत असाल, तर २५६ किलोमीटरचे हे अंतर पार करण्यासाठी सरासरी २ तासांचा वेळ लागतो. प्रवासादरम्यान डोळ्यासमोर फक्त सरळ सडक आणि दोन्ही बाजूला वाळूचे साम्राज्य दिसते. इंजिनिअरिंगचा हा एक उत्कृष्ट नमुना मानला जातो, कारण इतक्या लांब अंतरापर्यंत जमिनीची पातळी एकसमान राखून रस्ता तयार करणे हे मोठे आव्हान होते.

याआधी ऑस्ट्रेलियातील 'आयरे हायवे' हा जगातील सर्वात सरळ रस्ता मानला जात असे. तो १४६ किलोमीटरपर्यंत विना वळणाचा आहे. तिथे रस्त्यावर अचानक कांगारू येत असल्याने चालकांना सतर्क राहावे लागते. मात्र, सौदीच्या हायवे-१० ने आता हा मान आपल्याकडे घेतला असून तो ऑस्ट्रेलियाच्या रस्त्यापेक्षा तब्बल १०० किलोमीटरने जास्त लांब आहे.

रस्त्यावरची वळणं माणसाला थकवतात, पण हा रस्ता इतका सरळ आहे की इथे चालकाला डुलकी लागण्याची भीती जास्त असते, असे मिश्किलपणे बोलले जाते.