प्रेयसीने दगा दिल्याने तो बनला 'बेवफा चायवाला'; प्रेमभंग झालेल्यांना देतो विशेष सवलत

By ऑनलाइन लोकमत | Published: February 13, 2019 03:42 PM2019-02-13T15:42:55+5:302019-02-13T15:49:33+5:30

प्रेमभंगाच्या दु:खात बुडालेले आणि आपल्या प्रेमाची आठवण हृदयात साठवून जीवन कंठणारे अनेक आशिक तुम्ही पाहिले असतील. पण लखनौमध्ये दगा देऊन गेलेल्या प्रेयसीची आठवण म्हणून चक्क चहाचे दुकान सुरू केले आहे. सध्या तरुणांमध्ये हे दुकान फारच लोकप्रिय ठरले असून, येथे प्रेमभंग झालेल्यांना चहापाण्याच्या बिलामध्ये विशेष सवलत दिली जाते.

आदित्य सिंह असे या बेवफा चायवाल्याचे नाव आहे. लखनौमधील फन मॉलजवळ असलेल्या त्याच्या दुकानामध्ये चहासोबतच बकवास मॅगी, बेईमान मॉइक्रोनी आणि बदनाम कॉफी अशी चित्रविचित्र नावे धारण केलेले पदार्थ मिळतात. हे पदार्थ आदित्यच्या बेवफा प्रेयसीला आवडत असत.

प्रेमभंग झाल्यानंतर आपण चहाचे दुकान उघडण्याचा निर्णय घेतला. तसेच त्याला बेवफा चायवाला असे नाव दिले, अशी माहिती आदित्य सिंह याने दिली.

या दुकानाचे वैशिष्ट्य म्हणजे प्रेमी युगुलांसाठी येथे 15 रुपये दराने चहा मिळते. तर प्रेमभंग झालेल्यांना सवलतीच्या दरात 10 रुपयात चहा मिळते. इथे वेगवेगळ्या चवीची चहा मिळते.

प्रेमभंग झालेले अनेक लोक सवलतीच्या दरातील चहा पिण्यासाठी येथे येतात. तसेच चहा पिऊन जाताना आदित्यची खुशाली विचारण्यासही विसरत नाहीत.