इराणमध्ये हिंसक आंदोलन, लोक रस्त्यावर उतरले; पाकिस्तानला धडकी, शहबाज शरीफांची झोप का उडाली?
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 12, 2026 15:21 IST2026-01-12T15:15:42+5:302026-01-12T15:21:33+5:30

इराणमध्ये सुरू असलेले विरोधी आंदोलन आणि अस्थिरता वाढण्याच्या भीतीने शेजारील राष्ट्रातही चिंता वाढली आहे. त्यातील सर्वात महत्त्वाचं नाव पाकिस्तानचं आहे. ज्याला इराणमधील उलथापालथीमुळे त्यांच्या देशात याचा परिणाम होण्याची भय सतावत आहे.

इराणमधील प्रत्येक हालचालीवर पाकिस्तानातील शहबाज शरीफ यांचं सरकार नजर ठेवून आहे. इराणमधील अस्थिरता ही पाकिस्तानच्या सुरक्षा, अर्थव्यवस्था आणि प्रादेशिक स्थितीवर परिणाम करू शकते असं पाकिस्तानला वाटते.

पाकिस्तान आणि इराण यांच्यात जवळपास ९०० किमीहून अधिक सीमा आहे. त्यात बहुतांश भाग डोंगराळ आहे. जिथे सुरक्षा व्यवस्थेसाठी काही खास व्यवस्था नाही. सध्या इराणमधील लोकसंख्येतील एक मोठा भाग रस्त्यावर उतरला आहे ज्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही.

एका सरकारी अधिकाऱ्याने सांगितले की, इराणचा हा अंतर्गत वाद आहे परंतु पाकिस्तान सतर्क आहे. आम्ही प्रत्येक स्थितीवर लक्ष ठेवून आहोत. इराणमध्ये अराजकता होऊ नये असं पाकिस्तानला सरकारला वाटते असं त्यांनी सांगितले.

शिवाय या रिपोर्टमध्ये एका पाकिस्तानी अधिकाऱ्याच्या हवाल्याने म्हटले आहे की, जर तेहरानमधील निदर्शने दीर्घकाळ सुरू राहिली तर संपूर्ण प्रदेशात अस्थिरता पसरेल. पाकिस्तान असा पहिला देश असेल जिथे त्याचा वाईट परिणाम होईल. त्यामुळे पाकिस्तान तेहरानवर लक्ष ठेवून आहे. पाकिस्तानने इराणसाठी ट्रँव्हल एजवाइजरी जारी केली आहे.

इराणमधील पाकिस्तानचे राजदूत मुदस्सीर टिपू यांनी पाकिस्तानी नागरिकांना इमिग्रेशन आणि प्रवासाच्या आवश्यकतांचे काटेकोरपणे पालन करण्याचे आवाहन केले. इराणहून पाकिस्तानला प्रवास करणाऱ्या सर्व पाकिस्तानी नागरिकांनी त्यांच्या पासपोर्टवर वैध व्हिसा किंवा एक्झिट स्टॅम्प असल्याची खात्री करावी असं त्यांनी म्हटलं.

तर गेल्या तीन दशकांत मी इराणमध्ये चार निदर्शने पाहिली आहेत. इतिहासाकडे पाहिल्यास सध्याच्या निदर्शनांमुळे सत्ता बदल होईल असे कोणतेही संकेत अद्याप मिळालेले नाहीत. परंतु यावेळी सशस्त्र निदर्शक मोठे आव्हान उभे करत आहेत असं इराणमधील आंतरराष्ट्रीय घडामोडींचे तज्ज्ञ मुहम्मद हुसेन यांनी द एक्सप्रेस ट्रिब्यूनला सांगितले.

विश्लेषकांच्या मते, इराणमधील दीर्घकाळ अस्थिरतेमुळे पाकिस्तानसोबतचा सीमापार व्यापार विस्कळीत होऊ शकतो, तस्करी नेटवर्क वाढू शकतात आणि बलुचिस्तानमध्ये सीमा व्यवस्थापन गुंतागुंतीचे होऊ शकते.

यामुळे इराणमधील स्थितीमुळे निर्वासितांचा दबाव वाढू शकतो, ज्यामुळे पाकिस्तान सरकार एका नवीन संकटात सापडेल. इराणमध्ये अमेरिका आणि इस्रायली हस्तक्षेपामुळे पाकिस्तान कठीण राजनैतिक स्थितीत येईल असं तज्ज्ञ सांगतात.

परिणामी, पाकिस्तानला इराण, आखाती देश, चीन आणि अमेरिकेशी संबंध संतुलित करण्याचे आव्हान असेल. म्हणूनच पाकिस्तानमधील इस्लामाबाद प्रशासन शेजारील इराणमध्ये स्थिरता राखण्यासाठी प्रयत्नशील आहे.

















