रशियात भीषण भूकंपानंतर महाप्रलय; त्सुनामीमुळे प्रशांत महासागर खवळला, भारताला बसू शकतो फटका?

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 30, 2025 13:26 IST2025-07-30T13:20:29+5:302025-07-30T13:26:25+5:30

रशियात भीषण भूकंप आला आहे. हा भूकंप इतका भयंकर आहे की त्याची तीव्रता ८.८ रिश्टर स्केल नोंदवण्यात आली आहे. रशियातील कामचटका बेटावर आलेल्या या भूकंपामुळे अमेरिकेपासून जपानपर्यंत त्सुनामीचा धोका निर्माण झाला आहे. अलास्का, कामचटका बेटाजवळ अमेरिका-रशियातील न्यूक्लिअर केंद्र आहेत.

दुसरीकडे जपानमधील फुकुशिमा अणुऊर्जा प्रकल्प रिकामा करण्यात आला आहे. जर जपानमध्ये त्सुनामी आली तर त्याचा परिणाम भारतातील अंदमान-निकोबार बेटांवरही जाणवेल हे स्पष्ट आहे. या भागात एक दिवस आधी भूकंपही झाला होता.

या भूकंपामुळे बल्गेरियाचे बाबा वेंगा यांची भविष्यवाणी पुन्हा चर्चेत आली आहे. त्यांनी म्हटलं होतं की, २०२५-२०२६ काळात पृथ्वीला धक्के बसतील आणि लोकांना पूरासारख्या नैसर्गिक आपत्तींना तोंड द्यावे लागेल. तीव्र भूकंपामुळे विनाश होऊ शकतो म्हणजेच महाप्रलय येण्याचं भाकीत त्यांनी वर्तवले होते.

बाबा वेंगा यांनी युरोपमध्ये एक भयानक भूकंप आणि मोठ्या लष्करी संघर्षाचीही भविष्यवाणी केली होती. USGS नुसार, भूकंप ही खूप धोकादायक नैसर्गिक आपत्ती आहे. ज्याने जगभरात नुकसान होते. १९६० मध्ये चिलीतील बायोबियो येथे ९.५ तीव्रतेचा भूकंप आला होता. त्याला चिली भूकंप म्हणून ओळखले जाते. हा आतापर्यंतचा सर्वात मोठा भूकंप होता.

चिली भूकंपात १६५५ लोक मारले गेले होते तर २० लाखाहून अधिक बेघर झाले. १९५२ मध्ये रशियातील कामचटका येथे ९ तीव्रतेचा भूकंप आला होता. त्यातून एक मोठी त्सुनामी आली होती. ज्यामुळे १० लाख डॉलरपेक्षा अधिक नुकसान झाले. २०११ साली जपानच्या तोहोकू येथे ९.१ तीव्रतेचा भूकंप झाला. त्यानंतर त्सुनामीत १५ हजाराहून अधिक लोक मारले गेले. १ लाख ३० हजार लोक बेघर झाले.

भारतात आतापर्यंत सर्वात मोठा भूकंप अरुणाचल प्रदेशला आला होता. १९५० मध्ये ८.६ रिश्टर तीव्रता असणाऱा हा भूकंप होता. या भूकंपामुळे जमीन हादरली होती. अनेक ठिकाणी रस्त्यांना भेगा पडल्या होत्या. काही ठिकाणी भूस्खलन झाले होते. या भूकंपात ७८० लोकांनी आपला जीव गमावला होता.

आज रशियात झालेल्या भूकंपाच्या २४ तास आधी भारताच्या अंदमान निकोबार येथेही रात्री १२.११ वाजता भूकंपाचे तीव्र धक्के जाणवले. या भूकंपामुळे लोकांमध्ये दहशतीचं वातावरण पसरले होते. मात्र स्थानिक प्रशासनाने इथल्या नागरिकांना सतर्क राहण्याचे आदेश दिले आहेत. बंगालची खाडी आणि अंदमान क्षेत्र एक संवेदनशील भूकंप प्रवण क्षेत्र मानले जाते.

त्यात रशियातील कामचटका भागात आलेल्या भीषण भूकंपामुळे त्सुनामीच्या लाटा उसळल्या आहेत. त्यात अनेक सागरी किनारी देशांना धोका निर्माण झाला आहे. त्सुनामीमुळे समुद्राच्या लाटांची उंची वाढली आहे. त्यामुळे सखल भागात पाणी साचण्याची शक्यता आहे. त्सुनामीमुळे प्रशांत महासागर खवळल्याचे दिसून येत आहे.

२००४ साली त्सुनामीमुळे भारताला फटका बसला होता. २६ डिसेंबर २००४ साली हिंद महासागरातील इंडोनेशियाच्या सुमात्रा बेटावर ९.१ तीव्रतेचा भूकंप आला होता. त्यातून समुद्रात महाकाय लाटा निर्माण झाल्या. या लाटा भारताच्या पूर्वेकडील विशेषत: अंदमान आणि निकोबार, तामिळनाडू, आंध्र प्रदेश, केरळपर्यंत पोहचल्या होत्या.

त्सुनामीचे मुख्य कारण म्हणजे समुद्राच्या तळात अचानक शक्तिशाली स्फोटासारखी परिस्थिती होते. या हालचाली अनेक नैसर्गिक घटनांमुळे होऊ शकतात. सर्वात सामान्य कारण म्हणजे समुद्रात होणारा भूकंप, यामध्ये समुद्राच्या तळातील टेक्टोनिक प्लेट्स घसरतात, ज्यामुळे पाण्यात मोठी हालचाल होते.