इराण युद्धापेक्षाही जास्त चर्चा 'टॉयलेट वॉर'ची! समुद्रात तैनात असलेल्या अमेरिकेच्या युद्धनौकेत काय घडतंय?
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 4, 2026 12:39 IST2026-03-04T12:34:44+5:302026-03-04T12:39:22+5:30
इराण विरुद्ध अमेरिका- इस्रायल या युद्धामुळे सगळ्या जगावर नवे संकट घोंगावू लागले आहे. या युद्धाची तीव्रता दिवसेंदिवस वाढू लागली आहे. अशातच अमेरिकेच्या युद्धनौकेमध्ये जे सुरू आहे, त्याची चर्चा जास्त होत आहे.

सध्या जगाच्या अनेक भागात युद्धाचे वारे वाहत आहेत. पश्चिम आशिया युद्धाच्या तोंडावर उभा आहे. होणार होणार असा अंदाज असलेलं युद्ध अखेर सुरू झाले. अमेरिका आणि इस्रायलने इराणवर हल्ला केला. यात इराणचे सर्वोच्च नेते खामेनेई ठार झाले. मात्र, या पार्श्वभूमीवर आणखी एक वेगळंच युद्ध सध्या चर्चेत आहे. इराणवर हल्ल्याच्या तयारीत असलेले अमेरिकेचे यूएसएस जेराल्ड आर. फोर्ड ही अतिबलाढ्य युद्धनौका गेल्या वर्षीच्या जूनपासूनच इराणजवळ समुद्रात तैनात आहे. जगातली ही सर्वांत मोठी विमानवाहू युद्धनौका आहे.

कोणत्याही विमानवाहू जहाजाची तैनात साधारणपणे नऊ महिन्यांची असते, पण लष्करी हालचाली वाढल्या की ती वाढवली जाते. याच कारणानं अमेरिकेनं आपलं हे जहाज समुद्रात तैनात ठेवलं आहे. या विशालकाय जहाजात अमेरिकेचे तब्बल पाच हजार सैनिक सज्ज आहेत. पण हे जहाज सध्या एका वेगळ्याच कारणानं गाजतं आहे आणि संपूर्ण जगभरात ते चर्चेचा केंद्रबिंदू ठरलं आहे. इराण आणि अमेरिका यांच्यातील युद्ध प्रत्यक्षात सुरू होण्याच्या बऱ्याच आधी या जहाजावर 'टॉयलेट वॉर' सुरू झालं आहे. इराणला घेरून उभे असलेले अमेरिकन सैनिक एका वेगळ्याच कारणानं आपसातच भांडायला लागले!

या भांडणाचं सर्वांत मोठं कारण आहे टॉयलेटा या जहाजावर तब्बल ६५० टॉयलेट्स आहेत आणि त्यावरूनच अमेरिकन सैनिकांमध्ये वादावादी आणि 'वॉर' सुरू झालं होतं. या टॉयलेटमध्ये आधी कोण जाईल, यावरून या सैनिकांमध्येच हमरीतुमरी सुरू झाली. कारण, जहाजावरील सीवेज सिस्टीम पूर्णपणे फेल झाली. बहुतांश टॉयलेट्स जाम झाली. यामुळे जहाजावर असलेल्या सैनिकांचं आयुष्य अक्षरशः बेहाल झाले. जहाजावरील जी काही मोजकी टॉयलेट्स चालू अवस्थेत होती, त्याचा वापर करण्यासाठी या सैनिकांना दररोज किमान पाऊण तास रांगेत उभं राहावं लागत होतं, आजही त्यात फारसा फरक पडलेला नाही.

परिस्थिती इतकी वाईट आहे की टॉयलेट्सच्या कमतरतेमुळे प्लम्बिंग आणि दुरुस्तीची जबाबदारी असलेल्या टेक्निशियन आणि नौसैनिकांमध्येच सातत्यानं वादावादी सुरू आहे. सिस्टीम दुरुस्त करण्यासाठी टेक्निशियन युद्धजन्य स्थितीतही दररोज तब्बल १९ तासांपेक्षा अधिक वेळ काम करताहेत.

खरं तर ही समस्या एका तांत्रिक त्रुटीशी संबंधित आहे. अत्याधुनिक सुविधांनी सुसज्ज असलं तरी हे जहाज एका नाजूक व्हॅक्युम-आधारित सीवेज सिस्टीमवर अवलंबून आहे. केवळ एका व्हॉल्व्हमध्ये बिघाड झाला तरी संपूर्ण जहाजावरची सर्व टॉयलेट्स बंद पडू शकतात. हे जहाज २०२५ पासून समुद्रात तैनात आहे.

यावर्षी जानेवारीमध्ये याच जहाजानं व्हेनेझुएलावर झालेल्या अमेरिकन कारवाईत महत्त्वाची भूमिका बजावली होती, ज्यात अध्यक्ष निकोलस मादुरो यांना अटक करण्यात आली होती. सलग समुद्रात तैनात असल्यामुळे या जहाजाची नियमित देखभाल करता आलेली नाही.

प्रत्येक वेळी सिस्टीम दुरुस्त करण्यासाठी अॅसिड फ्लशवर सुमारे चार लाख डॉलर्स खर्च येतो. जहाजावरील अनेक नौसैनिक २० ते २५ वयोगटातले आहेत. सततची ड्यूटी आणि दीर्घ तैनातीमुळे ते वैतागले आहेत. कुटुंबापासून दीर्घकाळ दूर राहण्याबरोबरच टॉयलेटसारख्या कारणांवरून त्यांच्या संतापाचा पाराही वाढला आहे. इराण-अमेरिका युद्धापेक्षाही नेटवर या 'टॉयलेट वॉर'चीच चर्चा अधिक आहे.

















