तालिबाननं अमेरिकेला दिला रोखठोक इशारा, अफगाणिस्तानात काही चुकीचं केलं तर...

By ऑनलाइन लोकमत | Published: October 11, 2021 01:56 PM2021-10-11T13:56:10+5:302021-10-11T14:01:12+5:30

अफगाणिस्तानातून अमेरिकेनं सैन्य माघारी घेतल्यानंतर आता पहिल्यांदाच अमेरिका आणि तालिबान यांच्यात मोठी बैठक पार पडली आहे. या बैठकीत नेमकं काय घडलं जाणून घेऊयात...

कतारच्या दोहा येथे शनिवारी अमेरिकेचे अधिकारी आणि तालिबानमध्ये चर्चा झाली. या चर्चेत अमेरिकेनं तालिबानला मान्यता न देताही अफगाणिस्तानातील जनतेला मदतीचा हात पुढे करण्यासाठीची तयारी दाखवली आहे.

तालिबान करत असलेल्या घोषणा किंवा आश्वासनांनी नव्हे, तर ते करत असलेल्या कामांच्या आधारावर तालिबानचं मूल्यमापन केलं जाईल, असं अमेरिकेच्या अधिकाऱ्यांनी यावेळी स्पष्ट केलं. तर तालिबाननंही अमेरिकेसमोर थेट आपले मुद्दे उपस्थित केले आहेत.

अमेरिकन परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते नेड प्राइस यांनी सांगितलं की, अमेरिकन प्रतिनिधी मंडळानं दोहा येथे आयोजित चर्चेत तालिबानच्या प्रतिनिधींची भेट घेतली आणि राष्ट्रहिताच्या मुद्द्यांवर चर्चा केली. यात दहशतवाद, सुरक्षा, परदेशी नागरिकांची सुरक्षा यासोबतच महिलांच्या अधिकाऱ्यांच्या मुद्द्यावर दोन्ही देशांमध्ये चर्चा झाली.

तालिबानचे प्रतिनिधी या चर्चेत आक्रमक रुपात पाहायला मिळाले. अफगाणिस्ताचे काळजीवाहू परराष्ट्र मंत्री अमीर मुत्तकीनं अमेरिकेला थेट धमकीवजा इशारा दिला. अफगाणिस्तानला अस्थिर करण्याचा प्रयत्न अमेरिकेनं करु नये अन्यथा याचे परिणाम वाईट होतील असा रोखठोक इशारा अमीर मुत्तकीनं दिला आहे.

अफगाणिस्तानातील सरकार अस्थिर करण्याचा अमेरिकेनं प्रयत्न करु नये अन्यथा हे कुणासाठीही चांगलं ठरणार नाही, असं अमेरिकेच्या अधिकाऱ्यांना स्पष्टपणे सांगितल्याचं तालिबानच्या प्रतिनिधीनं एएफपीला दिलेल्या मुलाखतीत म्हटलं आहे.

अफगाणिस्तानसोबत चांगले संबंध ठेवणं प्रत्येकासाठीच फायदेशीर ठरेल, असंही तालिबाननं म्हटलं आहे. अफगाणिस्तानातील सध्याचं सरकार अस्थिर करण्यासाठी कोणत्याही पद्धतीचं षडयंत्र रचलं गेलं तर त्याला जशास तसं प्रत्युत्तर दिलं जाईल, असं तालिबाननं स्पष्ट केलं आहे. असं करणं संपूर्ण जगासाठी मोठी समस्य निर्माण करणारं ठरू शकतं, असंही तालिबाननं म्हटलं आहे.

अफगाणिस्तानच्या केंद्रीय बँकेवर घालण्यात आलेले निर्बंध हटविण्याचीही मागणी तालिबाननं अमेरिकेकडे केली आहे. तालिबानकडून अमीर खान मुत्तकी हे तालिबान-अमेरिकेतील चर्चेचं नेतृत्त्व करत होते.

अमेरिकेकडून अफगाणिस्तानातील सुरक्षा आणि दहशतवादाचा मुद्दा उपस्थित करण्यात आला. तालिबाननं अफगाणिस्तानात दहशतवाद पोसू नये अन्यथा आंतरराष्ट्रीय पातळीवर याची दखल घेतली जाईल, असं स्पष्ट केलं.

अफगाणिस्तानातील महिलांच्या अधिकारांवर आणलेल्या निर्बंधांचाही मुद्दा अमेरिकेनं तालिबानसोबतच्या चर्चेत उपस्थित केला आहे. महिलांची सुरक्षा आणि त्यांच्या स्वातंत्र्याची काळजी तालिबाननं घ्यायला हवी, असंही अमेरिकेनं तालिबानी प्रतिनिधींसमोर म्हटलं आहे.