'याद राखा, परिस्थिती आणखी बिघडेल'; युक्रेनला शस्त्र पुरवठ्यावरुन रशियानं अमेरिकेला धमकावलं!
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 25, 2022 16:08 IST2022-04-25T15:59:10+5:302022-04-25T16:08:08+5:30
युक्रेनला युद्धासाठी शस्त्रपुरवठ्यावरुन रशियानं अमेरिकेला उघड धमकी दिली आहे.

युक्रेनला युद्धासाठी शस्त्रपुरवठ्यावरुन रशियानं अमेरिकेला उघड धमकी दिली आहे. युक्रेनला अमेरिकेकडून केली जाणारी शस्त्रांची मदत तातडीनं थांबली गेली पाहिजे. अन्यथा परिस्थिती आणखी बिघडू शकते, असा इशारा रशियाच्या राजदूतांनी अमेरिकेला दिला आहे.

अमेरिकेकडून मोठ्या प्रमाणावर युक्रेनला शस्त्र पुरवठा केला जात असल्याचं आम्हाला दिसून आलं असून हे अजिबात स्वीकाहार्य नाही. अमेरिकेनं तातडीनं शस्त्र पुरवठा थांबवावा, असं रशियन राजदूत अनातोली अँटोनोव्ह यांनी एका रशियन टेलिव्हिजन वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत म्हटलं आहे.

शस्त्र पुरवठ्याबाबत चिंता व्यक्त करणारं पत्र वॉशिंग्टनला पाठविण्यात आल्याची माहिती देखील अँटोनोव्ह यांनी दिली. ते म्हणाले की, युनायटेड स्टेट्सकडून अशा शस्त्रास्त्रांचा पुरवठा परिस्थिती आणखी चिघळवेल आणि संघर्षाची स्थिती वाढवेल.

वॉशिंग्टनचे सर्वोच्च मुत्सद्दी आणि संरक्षण सचिव यांनी रविवारी उशीरा युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोदिमीर झेलेन्स्की यांची कीव्ह येथे भेट घेतली. झेलेन्स्की सरकार आणि रशियन आक्रमणाच्या भीतीखाली असलेल्या या प्रदेशातील इतर देशांना ७१३ दशलक्ष डॉलर्सच्या नव्या मदतीची घोषणा अमेरिकेनं केली आहे.

एप्रिलच्या सुरुवातीला, अमेरिकेचे अध्यक्ष ज्यो बायडन यांनी युक्रेनला अतिरिक्त 800 दशलक्ष डॉलर्सची सैन्य मदत जाहीर केली होती. जड तोफखाना समाविष्ट करण्यासाठी ही आर्थिक मदत केली गेली. यामुळे युक्रेनच्या लष्कराची व्याप्ती वाढणार आहे.

झेलेन्स्की यूएस आणि युरोपियन नेत्यांकडे कीव्हला जड शस्त्रे आणि उपकरणे पुरवण्यासाठी विनंती करत आहेत. रशियानं 24 फेब्रुवारी रोजी युक्रेनमध्ये सैन्य पाठवल्यापासून हजारो लोक मारले गेले आहेत आणि लाखो लोक विस्थापित झाले आहेत.

रशियानं युक्रेनविरोधात 24 फेब्रुवारीपासून युद्धाची घोषणा केल्यानंतर आतापर्यंत हजारो लोक मारले गेले आहेत, लाखो लोक विस्थापित झाले आहेत. रशिया आणि युनायटेड स्टेट्स यांच्यात व्यापक संघर्षाची भीती निर्माण झाली आहे. आतापर्यंत जगातील दोन सर्वात मोठ्या आण्विक शक्ती यामुळे एकमेकांसमोर उभ्या ठाकल्या आहेत.

रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन म्हणतात की युक्रेनमध्ये "विशेष लष्करी ऑपरेशन" आवश्यक आहे कारण युनायटेड स्टेट्स रशियाला धमकी देण्यासाठी युक्रेनचा वापर करत आहे आणि मॉस्कोला रशियन भाषिक लोकांचा छळापासून बचाव करणं हे आमचं कर्तव्य आहे, असं पुतीन यांनी म्हटलं आहे.

तर रशियानं आक्रमक युद्धाची सुरुवात करत संपूर्ण जगाला धोक्यात टाकल्याची भावना अमेरिका आणि पाश्चिमात्य देशांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे सध्याचं वातावरण पाहता हा संघर्ष आता आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे.

















