ब्रिटनच नाही तर जगातील या सात प्रमुख देशांचं नेतृत्व करताहेत भारतीय वंशाच्या व्यक्ती

By नितीश गोवंडे | Published: October 25, 2022 04:21 PM2022-10-25T16:21:08+5:302022-10-25T16:26:01+5:30

Rishi Sunak: भारतीय वंशाचे ब्रिटिश खासदार ऋषी सुनक हे आता ब्रिटनचे नवे पंतप्रधान म्हणून शपथ घेणार आहेत. त्यांची पंतप्रधानपदी निवड झाल्यानंतर जगभरातून विविध प्रतिक्रिया येत आहेत. मात्र भारताबाहेर एखाद्या देशाचं नेतृत्व करणारे ऋषी सुनक हे काही पहिलेच भारतीय वंशाचे व्यक्ती नाहीत. ब्रिटनशिवाय जगातील ६ देशांमध्ये सध्या भारतीय वंशाच्या व्यक्ती नेतृत्व करत आहेत, त्यांची यादी पुढीलप्रमाणे.

भारतीय वंशाचे ब्रिटिश खासदार ऋषी सुनक हे आता ब्रिटनचे नवे पंतप्रधान म्हणून शपथ घेणार आहेत. त्यांची पंतप्रधानपदी निवड झाल्यानंतर जगभरातून विविध प्रतिक्रिया येत आहेत. मात्र भारताबाहेर एखाद्या देशाचं नेतृत्व करणारे ऋषी सुनक हे काही पहिलेच भारतीय वंशाचे व्यक्ती नाहीत. ब्रिटनशिवाय जगातील ६ देशांमध्ये सध्या भारतीय वंशाच्या व्यक्ती नेतृत्व करत आहेत, त्यांची यादी पुढीलप्रमाणे.

युरोपमधील भारतीय वंशाच्या नेत्यांमध्ये अँटोनियो कोस्टा यांचं नाव प्रामुख्याने घेतलं जातं. अँटोनियो कोस्टा यांचे वडील ओरलँडो कोस्टा कवी होते. त्यांनी वसाहतवादविरोधी आंदोलनामध्ये सहभाग घेतला होता. अँटोनियो कोस्टा यांचे आजोबा गोव्यात राहायचे. मात्र कोस्टा यांचा जन्म मोझाम्बिकमध्ये झाला. पण त्यांचे नातेवाईक अजूनही गोव्यातील मडगावजवळच्या एका गावात राहतात.

मॉरिशसचे पंतप्रधान प्रविंद जगन्नाथसुद्धा भारतीय वंशाचे राजकारणी आहेत. त्यांचे मूळ भारतातील बिहारमध्ये आहे. प्रविंद जगन्नाथ यांचे वडील अनिरुद्ध जगन्नाथ हेसुद्धा मॉरिशसमधील वजनदार नेते होते.

सिंगापूरच्या राष्ट्रपती हलिमा याकूब यांच्या पूर्वजांचं मूळसुद्धा भारतात आहे. त्यांचे वडील हे भारतीय होते. हलिमा याकूब यांनी सिंगापूरच्या पहिल्या महिला राष्ट्रपती बनून इतिहास रचला आहे.

दक्षिण अमेरिकेतील देश असलेल्या सुरीनामचे राष्ट्रपती चंद्रिका प्रसाद संतोखी हे सुद्धा भारतीय वंशाचे आहेत. भारतीय-सुरिनामी कुटुंबात जन्मलेल्या चंज्रिका प्रसाद संतोखी यांना चान संतोखी म्हणूनही ओळखले जाते.

कॅरेबियाई देश गुयानाचे राष्ट्रपती इरफान अली यांच्या पूर्वजांचं मूळसुद्धा भारतात आहे. त्यांचा जन्म १९८० मध्ये एका भारतीय गुयानी कुटुंबात झाला होता.

सेशेलचे राष्ट्रपती वावेल रामकलावनसुद्धा भारतीय वंशाचे नेते आहेत. त्यांचे पूर्वज हे भारताच्या बिहार प्रांतातील होते. त्यांचे वडील लोहार तर आई शिक्षिका होती.

भारतीय वंशाच्या वरिष्ठ नेत्यांमध्ये अमेरिकेच्या उपराष्ट्रती कमला हॅरिस यांचाही समावेश आहे. २०२१ मध्ये त्यांना ८५ मिनिटांसाठी अमेरिकेच्या राष्ट्रपतीपदाची शक्ती देण्यात आली होती. त्याबरोबरच अमेरिकन इतिहासामध्ये कमला हॅरिस ह्या अध्यक्षीय जबाबदाऱ्या सांभाळणाऱ्या त्या पहिल्या महिला ठरल्या होत्या.