‘प्लॅन २०४९’, चीनची भारताच्या अरुणाचल प्रदेशवर नजर, लष्करी बळावर कब्ज्याची तयारी
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 24, 2025 20:20 IST2025-12-24T20:08:57+5:302025-12-24T20:20:01+5:30
Pentagon Latest Report On India China Relation: गेल्या काही वर्षांमध्ये चीनने आर्थिक आघाडीवर झपाट्याने प्रगती केली आहे. आता आर्थिकदृष्या प्रबळ होत असलेल्या चीनने आपल्या विस्तारवादी धोरणाला पुन्हा एकदा आक्रमक रूप देण्यास सुरुवात केली असून, चीनच्या या विस्तारवादी धोरणामुळे भारतासमोरही पुढच्या काही वर्षांत मोठा धोका उद्भवण्याचे संकेत मिळू लागले आहेत. भारतासोबतच्या सीमावादाबाबतही चीनचा भयानक डाव अमेरिकन काँग्रेसला पेटागॉनने सादर केलेल्या अहवालामधून समोर आला आहे.

गेल्या काही वर्षांमध्ये चीनने आर्थिक आघाडीवर झपाट्याने प्रगती केली आहे. आता आर्थिकदृष्या प्रबळ होत असलेल्या चीनने आपल्या विस्तारवादी धोरणाला पुन्हा एकदा आक्रमक रूप देण्यास सुरुवात केली असून, चीनच्या या विस्तारवादी धोरणामुळे भारतासमोरही पुढच्या काही वर्षांत मोठा धोका उद्भवण्याचे संकेत मिळू लागले आहेत. भारतासोबतच्या सीमावादाबाबतही चीनचा भयानक डाव अमेरिकन काँग्रेसला पेटागॉनने सादर केलेल्या अहवालामधून समोर आला आहे.

पेटागॉनच्या या रिपोर्टमधील माहितीनुसार चीनने भारताच्या अरुणाचल प्रदेश या राज्यावरील आपला दावा अधिक आक्रमकपणे मांडताना आपल्या दीर्घकालीन राष्ट्रीय धोरणामध्ये त्याला स्थान दिले आहे. याअंतर्गत चीन आता लष्करी बळाचा वापर करून अरुणाचल प्रदेशला आपल्या कब्ज्यात आणण्याची रणनीती आखत आहे. चीनच्या दीर्घकालीन विस्तार धोरणामध्ये तैवान आणि दक्षिण चीन समुद्र आधीपासूनच आहे. आता चीनने त्यामध्ये अरुणाचल प्रदेश आणि जपानच्या सेनकाकू बेटांचा समावेश केला आहे.

पेंटागॉनच्या अहवालानुसार चीननने २०४९ पर्यंत चीनच्या महान साम्राज्याच्या पुनर्स्थापनेचं लक्ष्य चीनने समोर ठेवलं आहे. या पुनर्स्थापनेसाठी वरील चारही ठिकाणांवर कब्जा करणं हे चीनचं मुख्य लक्ष्य आहे. विशेषकरून तैवानच्या विलिनीकरणाला चिनी अधिकारी नैसर्गिक आवश्यकता मानत आहेत.

चिनी राज्यकर्त्यांच्या मते एक शक्तिशाली चीन जगातिक सैन्याचं संचालन करेल. हे सैन्य लढण्यास आणि युद्ध जिंकण्यास सक्षम असेल. या सैन्याच्या जोरावर चीन जगभरात संपूर्ण अधिकाराने कार्य करेल. तसेच जगात आपलं सार्वभौमत्व, सुरक्षा, आणि विकासात्मक हितसंबंधांचं रक्षण करेल.

दरम्यान, गेल्या काही महिन्यांपासून चीनने नियोजनबद्धरीत्या भारतासोबतचा तणाव कमी करण्यास सुरुवात केली आहे. मात्र ही चीनची एक चाल असल्याचे पेंटागॉनच्या रिपोर्टमध्ये म्हटले आहे. तसेच भारत चीनच्या या खेळींनंतरही सतर्क आहे. तसेच दोन्ही देशांमध्ये अद्यापही अविश्वासाचं वातावरण आहे.

तसेच चीन आणि पाकिस्तानमध्ये दृढ होत असलेल्या सैनिकी आणि आणि रणनीतिक संबंधांचाही या रिपोर्टमध्ये उल्लेख आहे. तसेच चीन पाकिस्तानला अत्याधुनिक लढाऊ विमाने आणि पाणबुड्या पुरवत असल्याचेही या रिपोर्टमध्ये म्हटले आहे.

















