पाकच्या अर्थव्यवस्थेचे 'बुरे दिन', इम्रान खान जनतेला म्हणाले...'टॅक्स भरा, तरच देश चालेल!'

By ऑनलाइन लोकमत | Published: September 4, 2021 03:16 PM2021-09-04T15:16:27+5:302021-09-04T15:21:41+5:30

पाकिस्तानच्या अर्थव्यवस्थेचा बट्ट्याबोळ झालेला आहे आणि इम्रान खान सरकारवर दिवसेंदिवस दबाव वाढत आहे. याच पार्श्वभूमीवर पंतप्रधान इम्रान खान यांच्यावर जनतेला आवाहन करण्याची वेळ आली आहे.

पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी देशातील जनतेला टॅक्स भरण्याचं आवाहन केलं आहे. 'जर तुम्ही देशाला समृद्ध आणि भरभराट झालेली पाहायचं असेल तर टॅक्स भरायला हवा', असं इम्रान खान म्हणाले.

जनतेनं टॅक्स भरला तर देशाला विकासासाठी निधी प्राप्त होतो. यामाध्यमातून शिक्षण, आरोग्य, चांगले रस्ते, वीज आणि इतर आवश्यक सुविधांमध्ये सुधारणा करता येते, असं इम्रान खान म्हणाले.

टॅक्स न भरता विविध सुविधांची अपेक्षा करणाऱ्या नागरिकांवरही इम्रान खान यांनी निशाणा साधला. "टॅक्स न भरणारे लोक एकही चांगलं काम करत नाहीत. पण असेच लोक जन्नतमध्ये जाण्याची अपेक्षा करतात. देशातील जनतेनं टॅक्स भरायला हवा तरच देशाची प्रगती होऊ शकेल", असं इम्रान खान यांना जनतेला सांगायची वेळ आली आहे.

गेल्याच महिन्यात इम्रान खान यांना पाकिस्तानात सत्तेवर आल्यानंतर तीन वर्ष पूर्ण झाली आहेत. इम्रान खान यांच्या तहरीक-ए-इन्साफ (पीटीआय) पक्षाच्या सरकारला तीन वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्तानं इस्लामाबादमध्ये जिन्ना कन्वेंशन सेंटरमध्ये कार्यक्रमाचा आयोजन करण्यात आलं होतं.

"गेली तीन वर्ष खूप कठीण होती. जेव्हा आम्ही सत्तेवर आलो तेव्हा देशाची अर्थव्यवस्था पूर्णपणे कोसळून पडलेली होती आणि आधीच्या सरकारनं आमच्यासाठी २० अब्ज डॉलरचं परदेशी कर्ज वारसा हक्कानं देऊन ठेवलं होतं", असं इम्रान खान म्हणाले.

सौदी अरेबिया, चीन आणि यूएईनं जर मदत केली नसती तर आपल्या देशाचं मोठं नुकसान झालं असतं, असंही इम्रान खान म्हणाले.

पाकिस्तानच्या अर्थव्यवस्थेची सध्याची परिस्थिती देखील काही विशेष राहिलेली नाही. त्यामुळेच इम्रान खान यांना देशातील जनतेला टॅक्स भरण्याचं आवाहन करण्याची वेळ आली आहे.

इम्रान खान पाकिस्तान अर्थव्यवस्थेत सुधारणा करत असल्याचा दावा करत असलं तरी प्रत्यक्षात परिस्थिती अतिशय वाईट असल्याचा आरोप विरोधी पक्षानं केला आहे. पाकिस्तानच्या मुस्लिम लीगचे अध्यक्ष शहबाज शरीफ यांनी देशातील महागाई आणि भ्रष्ट सरकारला आता दफन करण्याची वेळ आली असल्याची टीका केली आहे.