इराणवरील लष्करी कारवाईला तूर्तास ब्रेक; अमेरिकेनं दिली चर्चेची आणखी एक ऑफर, तोडगा निघणार?
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 13, 2026 17:15 IST2026-01-13T17:09:33+5:302026-01-13T17:15:12+5:30

इराणमध्ये हजारो लोक रस्त्यावर उतरले आहे. त्याठिकाणी सरकारविरोधात हिंसक आंदोलन सुरू आहे. त्यात अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणविरोधात सैन्य कारवाई स्थगित केली आहे. सध्या पडद्यामागून इराण आणि अमेरिकेत बॅकडोअर चर्चा सुरू आहे.

माहितीनुसार, व्हाइट हाऊसला तेहरानकडून जो वैयक्तिक संदेश प्राप्त झाला आहे तो सार्वजनिक प्रतिक्रियेपेक्षा वेगळी आहे. राष्ट्रपती ट्रम्प यांनी हे विधानही केले आहे, ज्यात ते जर गरज भासल्यास सैन्याचा वापर करावा लागला तर त्यासाठी ते मागे हटणार नाहीत.

ट्रम्प प्रशासनाने इराणसोबत व्यापार करणाऱ्या देशांवर २५ टक्के टॅरिफ लावण्याचीही घोषणा केली आहे. इराणमध्ये सुरू असलेल्या हिंसक आंदोलनात सरकारकडून होत असलेल्या कारवाईत आतापर्यंत ६०० हून अधिक लोकांचा मृत्यू झाला असून हजारो लोकांना अटक करण्यात आली आहे. त्यामुळे इराणविरोधात सैन्य कारवाई करावी का असा विचार अमेरिकेत सुरू आहे.

डोनाल्ड ट्रम्प म्हणाले की, जर इराणी सरकारने आंदोलनकर्त्यांविरोधात घातक बळाचा वापर केला तर ती अमेरिकेसाठी रेड लाइन असेल. इराण त्यांची सीमा ओलांडण्याच्या दिशेने जात आहे असं ट्रम्प यांनी बजावले. त्यामुळेच व्हाइट हाऊस आणि राष्ट्रीय सुरक्षा टीममध्ये अनेक पर्यायांवर विचार केला जात आहे.

सध्या अमेरिका स्टँडबाय मोडवर आहे. इराणचे काही अदिकारी व्हाइट हाऊसशी संपर्कात आहेत. इराण सार्वजनिक जी विधाने करतंय ती व्हाइट हाऊससोबत करत असलेल्या विधानांपेक्षा वेगळी आहेत. राष्ट्रपती त्या संदेशाची पडताळणी करत आहेत. जर गरज वाटली तर सैन्य कारवाई करायला आम्ही मागे पुढे पाहणार नाही असं व्हाइट हाऊसचे प्रेस सचिव कॅरोलिन लॅविट यांनी म्हटलं.

या सर्व घडामोडीत अमेरिकेने इराणवर दबाव वाढवण्यासाठी एक मोठं आर्थिक पाऊल उचलले आहे. इराणसोबत व्यापार करणाऱ्या देशांवर तातडीने २५ टक्के टॅरिफ लावला जाईल. इराण सरकारकडून आंदोलकांवर होत असलेल्या कारवाईने नाराज ट्रम्प यांनी ही पहिली कारवाई केली आहे.

चीन, संयुक्त अरब अमीरात, तुर्की, ब्राझील, रशिया त्या प्रमुख देशांमध्ये सामिल आहे जे इराणसोबत व्यापार करतात. परंतु व्हाइट हाऊसने टॅरिफबाबत आणि ती लागू करण्याच्या प्रक्रियेबाबत विस्ताराने माहिती दिली नाही. ज्या देशांचे इराणशी आर्थिक संबंध आहेत, ते देखील या दबावाखाली येतील का, असा प्रश्न उपस्थित होत आहे. इराणशी जुने आणि धोरणात्मक व्यापारी संबंध असलेल्या देशांमध्ये भारताचाही समावेश आहे.

आर्थिक वर्ष २०२४-२५ मध्ये भारत आणि इराणमधील द्विपक्षीय व्यापार सुमारे १.६८ अब्ज डॉलर राहिला. यामध्ये भारतानं सुमारे १.२४ अब्ज डॉलरची निर्यात केली, तर इराणकडून ०.४४ अब्ज डॉलरची आयात झाली. म्हणजेच, भारताला या व्यापारात सुमारे ०.८० अब्ज डॉलरचा ट्रेड सरप्लस (व्यापारी नफा) मिळाला

इराणमधील इंटरनेट सेवा पूर्णपणे ठप्प करण्यात आली असून अनेक आंतरराष्ट्रीय विमान कंपन्यांनी १६ जानेवारीपर्यंत आपली उड्डाणे रद्द केली आहेत. त्यामुळे अमेरिकेने आपल्या नागरिकांना आर्मेनिया किंवा तुर्कीमार्गे रस्ते मार्गाने बाहेर पडण्याचा सल्ला दिला आहे

सोमवारी इराणने सरकार समर्थक निदर्शकांना रस्त्यावर उतरून धर्मसत्तेच्या समर्थनार्थ निदर्शने करण्याचे आवाहन केले आहे. त्यानुसार मोठ्या प्रमाणात जमाव रस्त्यावर उतरून अमेरिका मुर्दाबाद, इस्रायल मुर्दाबादच्या घोषणा देत होता.

















