जणू पाण्यावर तरंगणारा सैनिकी तळच, इराणवर हल्ला करणाऱ्या USS अब्राहम लिंकनची अशी आहेत वैशिष्ट्ये

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 28, 2026 15:17 IST2026-02-28T15:08:47+5:302026-02-28T15:17:07+5:30

USS Abraham Lincoln: अनेक दिवसांच्या तणावपूर्व परिस्थितीनंतर पश्चिम आशियामध्ये युद्धाला तोंड फुटले आहे. अमेरिका आणि इस्राइलने इराणवर जोरदा हल्ला चढवला असून, या हल्ल्यामध्ये अमेरिकेच्या यूएसएस अब्राहम लिंकन या विमानवाहू युद्धनौकेने महत्त्वाची भूमिका बजावली आहे. त्यामुळे ही युद्धनौका चर्चेत आली असून तिची खास वैशिष्ट्ये आज आपण जाणून घेऊयात.

अनेक दिवसांच्या तणावपूर्व परिस्थितीनंतर पश्चिम आशियामध्ये युद्धाला तोंड फुटले आहे. अमेरिका आणि इस्राइलने इराणवर जोरदा हल्ला चढवला असून, या हल्ल्यामध्ये अमेरिकेच्या यूएसएस अब्राहम लिंकन या विमानवाहू युद्धनौकेने महत्त्वाची भूमिका बजावली आहे. त्यामुळे ही युद्धनौका चर्चेत आली असून तिची खास वैशिष्ट्ये आज आपण जाणून घेऊयात.

इराणसोबत तणाव वाढल्यानंतर इराणची कोंडी करण्यासाठी अमेरिकेने यूएसएस अब्राहम लिंकन या विमानवाहू युद्धनौकेला काही आठवड्यांपूर्वी दक्षिण चीन समुद्रातून पश्चिम आशियातील समुद्रात आणले होते. दरम्यान, अमेरिकेने आज याच यूएसएस अब्राहम लिंकनवरूनच इराणवर क्षेपणास्त्रे डागली.

यूएसएस अब्राहम लिंकन कॅरियर स्ट्राईक ग्रुप हा अमेरिकन नौदलाचा एक संपूर्ण युद्ध समूह आहे. यामध्ये एक मुख्य जहाज असते. हे जहाज एकट्याने संपूर्ण सैन्याएवढा विध्वंस घडवून आणू शकते. याचं नाव कॅरियर स्ट्राईक ग्रुप ३ असं आहे.

या कॅरियर स्ट्राईक ग्रुप ३ मध्ये यूएसएस अब्राहम लिंकन ही एक मोठी अणुइंधनावर चालणारी विमानवाहू युद्धनौका, ३ ते ४ गाईडेड मिसाईल डिस्ट्रॉयर, १ क्रूझर, १ ते २ न्यूक्लियर अॅटॅक पाणबुड्या, १ ते २ मदत करणारी जहाजे असा मिळून ७ ते १० जहाजे आणि पाणबुड्यांचा ताफा असतो.

तसेच या ताफ्यामध्ये एकूण ७ ते ८ हजार सैनिक आणि नौसैनिक, ६५ ते ७० लढाऊ विमानांचा समावेश असतो.

एवढंच नाही तर कॅरियर स्ट्राईक ग्रुप ३ मध्ये शेकडो टॉमहॉक क्रूझ क्षेपणास्त्रे, हवेतून हवेत मार करणारी क्षेपणास्रे, हजारो बॉम्ब आणि दारुगोळा यांचा समावेश आहे.

आता अमेरिकेच्या या बलाढ्य शक्तिसमोर इराणचं किती नुकसान होऊ शकतं याचा अंदाज घ्यायचा झाल्यास अब्राहम लिंकनवरील सैन्यशक्तीच्या जोरावर अमेरिका इराणचं प्रचंड नुकसान करू शकते. या युद्धनौकेवरील विमाने दररोज १०० ते १५० हल्ले करू शकतात. तसेच टॉमहॉक क्षेपणास्त्रे इराणचे हवाई तळ, क्षेपणास्त्रतळ, तेल कारखाने आणि नाविक तळ नष्ट करू शकतात. याबरोबरच अमेरिकेचं हे बलाढ्य नौदल इराणच्या छोट्याशा नौदलाला पूर्णपणे नष्ट करू शकतं. याशिवाय ही युद्धनौका होर्मुझच्या सामुद्रधुनीवर कब्जा करून तेलाच्या वाहतुकीवर नियंत्रण मिळवू शकते.