भारतात अनेकदा आले, पण पुतिन पाकमध्ये एकदाही का गेले नाहीत?; जाणकारांनी केला मोठा खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 5, 2025 21:18 IST2025-12-05T21:10:22+5:302025-12-05T21:18:45+5:30

Putin India Visit News: रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतिन यांनी एकदाही पाकिस्तानला भेट का दिली नाही? कारण जाणून घ्या...

Putin India Visit News: रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादीमीर पुतिन भारत दौऱ्यावर आहेत. अनेकार्थाने पुतिन यांचा भारत दौरा महत्त्वाचा मानला जात आहे. अवघ्या जगाचे लक्ष या दौऱ्याकडे आहे. सर्व प्रोटोकॉल बाजूला ठेवून पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वतः पुतिन यांचे स्वागत करण्यासाठी पालम विमानतळावर गेले. यानंतर दोघे पंतप्रधान निवासस्थानी पोहोचले.

शुक्रवारी दोन्ही देशांमध्ये अनेक क्षेत्रात मोठे आणि महत्त्वाचे करार झाले. तसेच राष्ट्रपती भवनातही एका खास समारंभाचे आयोजन करण्यात आले. या सगळ्या घडामोडीत एक चर्चा सुरू झाली आहे की, पुतिन भारतात आतापर्यंत ९ ते १० वेळा आले. परंतु, पाकिस्तानात एकदाही का गेले नाहीत?

पुतिन यांच्या भारत भेटीदरम्यान, पाकिस्तानी पत्रकार आणि मानवाधिकार कार्यकर्त्या आरझू काझमी यांनीही त्यांच्या देशाच्या स्थितीबद्दल निराशा व्यक्त केली आहे. पुतिन आपले नुकसान करून घेण्यासाठी पाकिस्तानात का येतील, असा टोलाही लगावला.

पाकिस्तानी संरक्षण विश्लेषक कमर चीमा यांच्या मुलाखतीत काझमी यांनी ही टिप्पणी केली. चीमा यांनी आरजू काझमी यांना विचारले की, पुतिन पाकिस्तानात का येत नाहीत? ते अनेकदा पाकच्या हवाई हद्दीतून जातात. पण ते आमच्याशी कोणताही संपर्क स्थापित करत नाहीत. ते पाकिस्तानात का येत नाहीत? ते मोदींसोबत खूप हसतात.

कमर चीमा यांच्या प्रश्नाचे उत्तर देताना आरजू काझमी म्हणाले की, पाकिस्तानात असे काय उद्योग आहेत की, आम्ही त्यांना बोलावू शकू? ते इथे आले तर आम्ही त्यांना सांगणार तरी काय? आम्हाला लढाऊ विमाने द्या, आम्हाला इंधन द्या, ते कर्जावर द्या की हप्त्यांमध्ये? आम्ही त्यांच्याशी याबद्दल बोलू शकतो का? ते भारतात गेले तर ते रोख व्यवहार करतात. म्हणूनच ते भारतात जातात. ते आमच्याकडे आले तर आम्हीच त्यांचे सर्व काही घेऊ.

भारत जे काही घेईल ते आम्ही घेऊ, पण फक्त दिखावा करण्यासाठी. फरक एवढाच आहे की, आम्ही पैसे देणार नाही, आम्ही ते कर्जावर घेऊ किंवा आम्ही म्हणू ते आम्हाला कसेही द्या, आम्ही चांगले लोक आहोत, या शब्दांत पाकिस्तानच्या परिस्थितीची पोलखोल त्यांनी केली.

आरजू काझमी यांनी पाकिस्तानच्या बिकट आर्थिक परिस्थितीवर बोट ठेवत पुढे म्हटले की, पुतिन कदाचित आम्हाला मोफत वस्तू देण्याच्या मनस्थितीत नसतील, म्हणून ते भारतात गेले. म्हणूनच ते आपल्या देशात येत नाहीत. ज्या दिवशी आपण आपली अर्थव्यवस्था सुधारू आणि रोखीने वस्तू खरेदी करण्यास सक्षम होऊ, त्या दिवशी लोक आपल्या देशातही येऊ लागतील.

आतापर्यंत आपण कधी पूर आणि कधी भूकंप आमच्याकडे येणाऱ्यांना दाखवतो. आम्ही नेहमीच म्हणतो की आमची परिस्थिती वाईट आहे. स्वतःचे नुकसान करून घेण्यासाठी पाकिस्तानात कोण येणार, अशी टोलेबाजीही त्यांनी केली.

पाकिस्तानी पत्रकाराने शाहबाज शरीफ सरकारची खिल्ली उडवत म्हटले की, लोक त्यांच्याच लेव्हलच्या लोकांना भेटतात. त्यांना माहिती आहे की, मी भारतात गेलो, तर डोनाल्ड ट्रम्प यांनी नकार दिला असला तरी भारत तेल खरेदी करेल. भारताने लढाऊ विमाने खरेदी केली तरी ते पैसे देईल. आमचे काय? आम्ही निघताना त्यांच्या विमानांचे टायरही काढू, या शब्दांत त्यांनी टीका केली.

दरम्यान, पुतिन यांनी कधीही पाकिस्तानला भेट दिली नव्हती, परंतु ऑक्टोबर २०१२ मध्ये होणाऱ्या चार राष्ट्रांच्या शिखर परिषदेसाठी ते पाकिस्तानला भेट देणार होते. पाकिस्तान ही भेट ऐतिहासिक म्हणत मोठी तयारी करत होता.

पण शिखर परिषदेच्या अगदी आधी, पुतिन यांनी पाकिस्तानला कळवले की, ते उपस्थित राहणार नाहीत. पुतिन यांच्या अनुपस्थितीची माहिती मिळताच, पाकिस्तानने शिखर परिषदेला स्थगिती दिली.

रशियाचे पाकिस्तानमधील तत्कालीन राजदूत अलेक्सी डेडोव्ह यांनी त्यावेळी म्हटले होते की, येथे समस्या अशी आहे की भेटीसाठी एक ठोस कारण असले पाहिजे. जर तसे असेल तर भेट नक्कीच होईल. यासाठी तयारी आणि करार आवश्यक आहेत.