इराणने कमी क्षमतेच्या मिसाईल डागल्या अन् अमेरिकेने त्या पडू दिल्या...; कतारवरील हल्ल्यामागचे गुपित कुणाला कळले...
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 24, 2025 12:29 IST2025-06-24T12:19:08+5:302025-06-24T12:29:17+5:30
Israel, America vs Iran War Ceasefire: अमेरिकेच्या कतारमधील एअरबेसवरचा हल्ला हा घडवून आणला गेला?... जगाला वेड्यात काढायचा धंदा ट्रम्पनी केला...

इस्रायल, इराण आणि अमेरिकेत युद्धाचा वेगळात खेळ रंगला होता. गेल्या १२ दिवसांपासून अवघ्या जगाच्या डोळ्यात धूल फेकणेच सुरु होते असे आता सर्वांना वाटू लागले आहे. अमेरिकेने इराणच्या अणूस्थळांवर हल्ला केला तो देखील सांगून केला. अन् इराणने अमेरिकेच्या कतारमधील एअरबेसवर जो हल्ला केला तो देखील म्हणे अमेरिकेला आणि कतारला आगाऊ सांगूनच केला गेल्याचे समोर येत आहे.
अमेरिकेने अवघ्या जगाला वेड्यात काढण्याचे काम केले आहे. इराणचा अमेरिकेच्या एअरबेसवरील हल्ला हा एक दोन्ही देशांनी ठरवून केलेला प्रतिकात्मक हल्ला होता. इराणला त्यांचा राग काढता आला, आपली इज्जत वाचविता आली, एवढ्यासाठीच काय ते घडविले गेले.
या युद्धात कोणाचा काय फायदा झाला, असा सवाल आता उपस्थित होत आहे. इराण हा कट्टर मुस्लिम देश आहे. इराण कथितरित्या अण्वस्त्र निर्मिती करत होता. यामुळे इस्रायलने सेल्फ डिफेन्समध्ये इराणवर १२ दिवसांपूर्वी हल्ला चढविला होता. या हल्ल्यात इस्रायलने इराणचे अण्वस्त्र कार्यक्रमाचे सर्व संशोधक मारले. तसेच इराणचे मोठमोठे कमांडरही मारले होते.
परंतू इस्रायल २०० लढाऊ विमाने आणि शेकडो मिसाईल इराणमध्ये घुसवूनही इराणच्या अणू कार्यक्रम सुरु असलेल्या ठिकाणांच्या केसालाही धक्का लावू शकला नव्हता. दुसरीकडे इराणने इस्रायलची राजधानी तेलअविव पर्यंत आपल्या मिसाईलची धग पोहोचविली होती. यामुळे इस्रायलचे पंतप्रधानांनी देखील इस्रायलमधून पळ काढत ग्रीस गाठले होते.
इराणची मिसाईल इस्रायलच्या सर्व शहरांपर्यंत बिनदिक्कत पोहोचत होती. कधी नव्हे ते इस्रायली नागरिक सायरन वाजला रे वाजला की आहेत त्या अवस्थेत जीव मुठीत घेऊन पळत होते. इस्रायलने इराणची एअर डिफेन्स सिस्टीम उध्वस्त केली होती. तसेच इराणच्या आकाशावर आमचा ताबा असल्याचे जाहीर केले होते. परंतू, तिकडे इस्रायलच्या इमारती गाझामध्ये जसे सांगाडे उरत होते तशा अवस्थेत दिसू लागल्या होत्या.
तितक्यात अमेरिकेची एन्ट्री झाली. अमेरिकेने १२८ लढाऊ विमाने इराणवर हल्ल्यासाठी पाठविली. त्यात सर्वात शक्तीशाली बी२ बॉम्बर विमाने देखील होती. फोर्डोसह तीन अणूस्थळांवर बंकर बस्टर बॉम्ब टाकण्यात आले. आता अमेरिकेने हा हल्ला आम्हाला युद्ध करायचे नाहीय पण तुमची अणुस्थळे उडवायची आहेत असे इराणला सांगत केला होता. याहून पुढे तर मोठी गंमत आहे...
इराणने अमेरिकेच्या या हल्ल्याचा बदला म्हणून कतारचा एअरबेस निवडला. इराणने कतारच्या अल उदीद एअर बेसवर हल्लाही केला. हा एअरबेस अमेरिकेच्या हवाई दलाच्या ताब्यात आहे. एवढेच नाही तर याठिकाणी अमेरिकेच्या सेंट्रल कमांडचे मुख्यालयही आहे. विशेष म्हणजे या हल्ल्यात कोणी मृत्यू किंवा जखमी झाले नाही.
ट्रम्प यांच्या दाव्यानुसार इराणने हा हल्ला करण्यापूर्वी अमेरिकेला माहिती दिली होती. इराणने कमी क्षमतेची मिसाईल डागली, अमेरिकेने ती इंटरसेप्ट केली, या हल्ल्यात कोणी जखमी झाले नाही. याचा अर्थ काय... इराणने कमी क्षमतेच्या मिसाईल डागल्या अन् अमेरिकेने त्या पडू दिल्या...
हे सर्व ठरवून केले गेले. यातून ट्रम्प यांनी काय साध्य केले, तर इराणला बदला घ्यायचा होता तो त्यांनी घेऊ दिला आणि इराणला त्यांची इज्जतही वाचवायची होती, ती देखील ट्रम्पनी वाचविली. इराणने कतारला एक तास आधीच माहिती दिली, अमेरिकेने आपली महागडी विमाने एअरबेसवरून या तासाभरात हटविली. हे सर्व म्हणजे क्रिकेट सामना सेट केल्यासारखेच ठरवून करण्यात आल्याचे आता समोर येत आहे.
इस्रायलला इराणवर हल्ला करून अणुस्थळे उध्वस्त करायची होती, ती त्यांनी केली. अमेरिकेने यात उडी घेतली आणि त्यावर जोरदार हल्ले चढविले. आता इराणची वेळ होती. त्यांना आपला बदला घ्यायचा होता तो देखील अमेरिकेने घेऊ दिला, इज्जतही वाचविली आणि युद्ध थांबविण्याची घोषणाही करून टाकली, असे आता युद्धतज्ञ म्हणत आहेत.
आता ट्रम्प पुन्हा एकदा युद्ध थांबविल्याची टिमकी मारत फिरायला मोकळे झाले आहेत. तिघांसाठीही ही विनविन परिस्थिती झाली आहे. आता एवढे करूनही युद्ध थांबते की सुरु राहते, हे येणारा काळ सांगणार आहे.