इराणच्या मिसाईल हल्ल्यांनी इस्राइलमध्ये हाहाकार; ३० हजारांहून अधिक घरे झाली उद्ध्वस्त!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 25, 2025 14:18 IST2025-06-25T14:01:30+5:302025-06-25T14:18:54+5:30

या १२ दिवसांच्या युद्धात इस्रायलमध्ये सुमारे ३८,७०० नुकसानभरपाईचे दावे दाखल झाले आहेत. यापैकी ३०,८०९ दावे घरांच्या नुकसानीशी संबंधित आहेत.

इराण आणि इस्रायल यांच्यातील युद्ध संपले असले, तरी त्याचा विध्वंसक प्रभाव विशेषतः इस्रायलमध्ये अजूनही स्पष्टपणे दिसत आहे. ताज्या आकडेवारीनुसार, केवळ १२ दिवसांच्या या युद्धात इस्रायलमधील सुमारे ३९,००० लोकांनी नुकसानभरपाईसाठी अर्ज केले आहेत, ज्यात घरांच्या विध्वंसाच्या सर्वाधिक तक्रारी आहेत.

१३ जून रोजी इराण आणि इस्रायलमध्ये सुरू झालेल्या या युद्धामुळे इस्रायलमध्ये मोठ्या प्रमाणावर विनाश झाला आहे. इस्रायली माध्यमांमधून समोर आलेली आकडेवारी या युद्धाच्या भीषण परिणामाचे वास्तववादी चित्र दर्शवते.

अहवालानुसार, या १२ दिवसांच्या युद्धात इस्रायलमध्ये सुमारे ३८,७०० नुकसानभरपाईचे दावे दाखल झाले आहेत. यापैकी ३०,८०९ दावे घरांच्या नुकसानीशी संबंधित आहेत. याचा अर्थ एवढ्या घरांना किंवा अपार्टमेंट्सना क्षेपणास्त्रांमुळे फटका बसला आहे. याव्यतिरिक्त, ३,७१३ दावे वाहनांच्या नुकसानीचे आणि ४,०८५ दावे यंत्रसामग्री तसेच इतर वस्तूंच्या नुकसानीचे आहेत.

या युद्ध परिस्थिटी दरम्यान हजारो इतर इमारतींचेही नुकसान झाले आहे, परंतु अद्याप त्यांचे दावे दाखल झालेले नाहीत, असेही म्हटले जात आहे. यामुळे, येत्या काळात हा आकडा आणखी वाढण्याची शक्यता आहे.

स्थानिक वेबसाइट 'बहादेरी हरेदीम'च्या अहवालानुसार, इस्रायलची राजधानी तेल अवीवमधून सर्वाधिक नुकसानभरपाईचे दावे (२४,९३२ हून अधिक) प्राप्त झाले आहेत. त्यानंतर, दक्षिण इस्रायली शहर अश्कलोनला १०,७९३ दावे प्राप्त झाले आहेत, जे सर्वाधिक नुकसान झालेल्या शहरांपैकी एक आहे.

नुकसानभरपाईची नेमकी रक्कम किती असेल, याबद्दल सध्या कोणताही अधिकृत अंदाज नाही, कारण इस्रायली सरकारने या नुकसानीच्या एकूण खर्चाबद्दल कोणतेही विधान दिलेले नाही. मात्र, दाव्यांची वाढती संख्या पाहता, या युद्धाचा आर्थिक भार इस्रायलवर मोठा असणार हे स्पष्ट होते.

१३ जून रोजी सुरू झालेले हे युद्ध इस्रायलने इराणच्या लष्करी आणि अणु तळांवर हल्ला केल्यावर अधिकच तीव्र झाले. इस्रायलने दावा केला होता की इराण अणुबॉम्ब बनवण्याच्या जवळ आहे, जो तेहरानने फेटाळला. प्रत्युत्तरादाखल इराणने क्षेपणास्त्रे आणि ड्रोनने हल्ला केला.