मुस्लीम देशांना भिडवण्यासाठी इस्रायलची युक्ती; 'या' देशात ड्रोन हल्ला केला अन् इराणवर आळ घातला?
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 6, 2026 11:19 IST2026-03-06T11:05:44+5:302026-03-06T11:19:17+5:30

इस्रायल आणि अमेरिका या दोघांनी मिळून इराणवर एकाचवेळी हल्ला केला. या मोठ्या हल्ल्यात इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनेई यांचा मृत्यू झाला. या हल्ल्यानंतर बिथरलेल्या इराणने इस्रायलसह आखाती देशांमधील अनेक ठिकाणांना टार्गेट केले. अमेरिकन सैन्य बेसवर हल्ला करण्यासाठी इराणने ड्रोन आणि क्षेपणास्त्राचा वापर केला.

इराणने कुवेत, सौदी अरेबिया, यूएई, ओमान यासह आखातातील ८ देशांना टार्गेट केले. इराणकडून सातत्याने अमेरिका इस्रायलसह या देशांनाही टार्गेट करण्यात येत होते. यातच इस्रायलने मुस्लीम देशांना भिडवण्यासाठी इराणविरोधात युक्ती लढवली. अलीकडेच अझरबैजान येथे ड्रोन हल्ला करण्यात आला आहे.

मात्र अझरबैजानमधील ड्रोन हल्ल्यासाठी इराणने इस्रायलला जबाबदार धरले आहे. इस्रायल शेजारील देशांशी असलेले संबंध बिघडवण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप इराणने केला. अझरबैजानचे परराष्ट्र मंत्री जेहुन बायरामोव यांच्याशी फोनवर संवाद साधताना इराणचे परराष्ट्र मंत्री अराघची यांनी इस्रायलवर हा आरोप केला. इराणने अझरबैजानवर कुठलाही हल्ला केला नाही असं इराणी परराष्ट मंत्र्यांनी स्पष्ट सांगितले. इराणी परराष्ट्र मंत्रालयाच्या निवेदनानुसार, इस्रायल इराणबद्दल लोकांचे मत बदलण्यासाठी आणि शेजारील देशांशी असलेले संबंध बिघडवण्यासाठी असे हल्ले करत आहे असा आरोप त्यांनी केला. इराण अशा हल्ल्यांचा निषेध करतो असं त्यांनी सांगितले.

इराणच्या सीमेला लागून असलेल्या अझरबैजानमध्ये झालेल्या ड्रोन हल्ल्यात किमान चार जण जखमी झाले आहेत. इराणने अझरबैजानवरील हल्ल्यासाठी इस्रायलला जबाबदार धरले आहे परंतु त्यांनी यापूर्वी तुर्कीवर बॅलिस्टिक क्षेपणास्त्र हल्ला केला होता, जो नाटोच्या हवाई संरक्षण प्रणालींनी रोखला होता. हे क्षेपणास्त्र सायप्रसमधील लष्करी तळाकडे जात होते असं सांगण्यात आले. गुरुवारी तुर्कीच्या संरक्षणमंत्र्यांनी सांगितले की, नाटोच्या डिफेन्स प्रणालीने इराणकडून तुर्कीच्या दिशेने डागण्यात आलेले बॅलिस्टिक क्षेपणास्त्र रोखले आणि ते निष्क्रिय केले. परंतु याबाबत त्यांनी अधिक तपशील दिले नाहीत.

अझरबैजानचे राष्ट्रपती इल्हम अलीयेव यांनी इराणवर दहशतवाद पसरवल्याचा आरोप केला आहे. या ड्रोन हल्ल्यानंतर त्यांनी इराणला प्रत्युत्तर देण्याची शपथ घेतली. या हल्ल्यांमध्ये इराणमधून अझरबैजानच्या सीमेवरील नाखिचेवन प्रदेशात किमान ४ ड्रोन घुसले होते. या घटनेनंतर अलीयेव यांनी तातडीने सुरक्षा बैठक बोलावली होती. त्यात इराणने अझरबैजानच्या भूभागावर दहशतवादी कृत्य केल्याचा आरोप केला.

त्याशिवाय अझरबैजानच्या लष्कराला या हल्ल्याला प्रत्युत्तर देण्याची तयारी ठेवण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत. त्यांना मोबिलायझेशन लेव्हल नंबर वन वर ठेवण्यात आले आहे आणि कोणत्याही कारवाईसाठी तयार राहावे लागेल असं सांगितले. इस्रायल आणि अझरबैजानमध्ये खूप जवळचे संरक्षण संबंध आहेत. दोन्ही देशांमधील मजबूत संबंधांमुळे अझरबैजानला इराणी आणि इस्रायली ड्रोनमध्ये फरक करता येऊ शकतो.

मात्र इराणने अझरबैजानवरील हल्ल्यासाठी इस्रायलला जबाबदार धरले. मात्र अझरबैजानला इराणच्या दाव्यावर विश्वास नाही. या घटनेनंतर अझरबैजानच्या परराष्ट्र खात्याने संबंधित घटनेबाबत तातडीने स्पष्टीकरण देऊन तपास सुरू करावा अशी मागणी केली आहे.

अझरबैजानची बाकू-तिबिलिसी-सेहान तेल पाइपलाइन, जी शेजारच्या जॉर्जिया आणि तुर्कीमधून जाते. इस्रायलच्या तेल आयातीपैकी सुमारे एक तृतीयांश तेल इथूनच आयात होते. आता इराणी सैन्याकडून त्यावर हल्ला होऊ शकतो. २०२४ मध्ये अझरबैजानने बाकू-तिबिलिसी-सेहान पाइपलाइनद्वारे इस्रायलला २.३७ दशलक्ष टन तेल निर्यात केले. इस्रायल त्यांच्या कच्च्या तेलाच्या गरजांपैकी सुमारे ४०% तेल अझरबैजानकडून खरेदी करतो असं बाकूमधील सेंटर फॉर ऑइल रिसर्चचे संचालक इल्हाम शाबान यांनी एएफपीला सांगितले.

इल्हम शबान म्हणाले की, पाइपलाइनचा बहुतेक मार्ग जमिनीखाली गाडला गेला आहे, ज्यामुळे ती बंद करणे कठीण होते. टर्मिनल आणि पंपिंग स्टेशनसारखी जमिनीवरील ठिकाणे अजूनही इराणी ड्रोन हल्ल्यांसाठी असुरक्षित असू शकतात असा धोका त्यांनी वर्तवला. दुसरीकडे दीर्घ काळापासून अझरबैजानचा जवळचा मित्र आणि एक प्रमुख शस्त्रास्त्र पुरवठादार देश इस्रायल इराणवर हल्ला करण्यासाठी अझरबैजानच्या भूभागाचा वापर करू शकतो असंही बोलले जाते.

जरी अझरबैजानने गेल्या वर्षी जूनमध्ये इराणला शब्द दिला होता की, तो इराणविरुद्ध आपला भूभाग वापरू देणार नाही तरी इराण अझरबैजान आणि इस्रायल दोघांनाही एक आव्हान मानतो. अझरबैजानचे इराणशी ऐतिहासिक आणि सीमा विवाद आहेत. इस्रायल अझरबैजानला इराणच्या सीमेवरील गुप्तचर चौकी म्हणून पाहतो जिथून तो इराणच्या हालचालींवर लक्ष ठेवू शकतो.

















