अमेरिकेनं इराणवर ज्या B-२ स्टिल्थ बॉम्बर्सनं हल्ला केला त्याची किंमत माहित्येय? तासाला किती खर्च येतो? जाणून थक्क व्हाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 22, 2025 21:16 IST2025-06-22T21:01:25+5:302025-06-22T21:16:10+5:30

१९९९ मध्ये सर्बिया, २००१ मध्ये अफगाणिस्तान आणि २००३ मध्ये इराकवर B-२ बॉम्बरने हल्ला केला होता...

इराण-इस्रायल युद्धात आता अमेरिकेनेही उडी घेतली आहे. अमेरिकेने रविवारी (२२ जून २०२५) पहाटेच्या सुमारास इराणच्या, फोर्दो, नतांज आणि इस्फहान या तीन अणुकेंद्रांवर हवाई हल्ले केले. यानंतर, इराणची अणु ठिकाणं पूर्णपणे उद्ध्वस्त झाली आहेत, असा दावा डोनाल्ड ट्रम्प यांनी केला.

न्यू यॉर्क टाईम्स आणि रॉयटर्सच्या वृत्तानुसार, अमेरिकेने या हल्ल्यांसाठी जगातील सर्वात शक्तिशाली लढाऊ विमानांपैकी एक असलेल्या बी-२ स्टेल्थ बॉम्बर्सचा वापर केला. हे लष्करी विमान जगातील सर्वात महागडे लढाऊ विमान म्हणून ओळखले जाते.

B-२ हे बॉम्बर अण्वस्त्रे देखील वाहून नेऊ शकते. हे बॉम्बर्स अमेरिकेच्या व्हिटमन एअर फोर्स बेस आणि मिसूरी येथे ठेवले आहेत. याशिवाय, ते गुआम आणि डिएगो गार्सिया सारख्या परदेशी तळांवरूनही उड्डाण करतात.

अनेक ठिकाणी केला आहे हल्ला - १९९९ मध्ये सर्बिया, २००१ मध्ये अफगाणिस्तान आणि २००३ मध्ये इराकवर B-२ बॉम्बरने हल्ला केला होता. २००८ मध्ये एक B-२ बॉम्बर कोसळले होते. एक २०२२ मध्ये झालेल्या अपघातानंतर निवृत्त झाले. माध्यमांतील वृत्तांनुसार, अमेरिकेकडे सध्या १९ बी-२ बॉम्बर कार्यरत आहेत.

काय असते स्टील्थ टेक्नॉलॉजी? - B-२ बॉम्बरमध्ये स्टिल्थ हा शब्द वापरण्यात आला आहे. खरे तर, स्टिल्थ ही एक मिलिट्री टेक्नॉलॉजी आहे. जिच्या सहाय्याने विमाने अथवा क्षेपणास्त्रे शत्रूच्या रडारला सहज चुकवू शकतात. अर्थात, हे रडारवर जवळपास दिसतच नाहीत.

किती आहे या फायटर जेटची किंमत? - हे फायटर जेट अमेरिकेने १९८९ मध्ये बनवले होते. त्यावेळी त्याची किंमत सुमारे ७३७ मिलियन डॉलर्स एवढी होती. त्यावेळी ते जगातील सर्वात महागडे फायटर जेट होते.

१९९७ मध्ये या फायटर जेटमध्ये काही बदल करण्यात आले. यामुळे याची एकूण किंमत सुमारे २.१ अब्ज डॉलर्सवर पोहोचली. आजचा विचार करता ही किंमत ४ अब्ज डॉलर्स (सुमारे ३५० अब्ज रुपये) पेक्षाही अधिक आहे. अशा प्रकारे आजही हे जगातील सर्वात महागडे फायटर जेट आहे.

हे फायटर जेट एक तास उडवण्याचा खर्च १३५००० डॉलर (सुमारे १.१६ कोटी रुपये) एवढा आहे. या विमानात दर सात वर्षाला 60 मिलियन डॉलरची सुधारणा केली जाते.

B-२ स्टिल्थ बॉम्बर...