भारतीय वंशाच्या शास्त्रज्ञाने शोधला एलियन्सचं वास्तव्य असलेला ग्रह, संशोधनानंतर केला दावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 17, 2025 19:38 IST2025-04-17T19:35:18+5:302025-04-17T19:38:31+5:30

Aliens Planet K2-18b News: भारतीय वंशाच्या एका शास्त्रज्ञाने एलियन्सबाबत आता मोठा दावा केला आहे. या शास्त्रज्ञाने पृथ्वीपासून १२० प्रकाशवर्षे दूर असलेल्या एका ग्रहावर एलियन्सचं अस्तित्व असल्याचे संकेत शोधून काढले आहेत. हा ग्रह आपल्या सौरमालेपासून फार दूर अंतरावर आहे.

परग्रहवासी अर्थात एलियन्सबाबत सर्वसामान्यांसह मोठमोठ्या संशोधकांच्या मनातही फार कुतुहल दिसून येतं. दरम्यान, एलियन्सच्या अस्तित्वाबाबत नेहमीच वेगवेगळे दावे केले जातात. कधी कधी हे एलियन्स पृथ्वीवर येऊन गेल्याचंही सांगितलं जातं. त्यावर विविध चित्रपटही तयार झाले आहेत. दरम्यान, भारतीय वंशाच्या एका शास्त्रज्ञाने एलियन्सबाबत आता मोठा दावा केला आहे. या शास्त्रज्ञाने पृथ्वीपासून १२० प्रकाशवर्षे दूर असलेल्या एका ग्रहावर एलियन्सचं अस्तित्व असल्याचे संकेत शोधून काढले आहेत. हा ग्रह आपल्या सौरमालेपासून फार दूर अंतरावर आहे.

ब्रिटनमधील केंब्रिज विद्यापीठामध्ये खगोलशास्त्राचे प्राध्यापक असलेल्या निक्कू मधुसूदन यांनी हा शोध लावला आहे. त्यांनी एलियन्सकडून मिळालेल्या संकेतांचं वर्णन सुंदर आणि रोमांचक असं केलं आहे.

प्राध्यापक निक्कू मधुसूदन आणि त्यांच्या टीमने जेम्स वेब स्पेस टेलिस्कोपच्या डेटाचा वापर करून एक्सोप्लॅनेट के२-१८ बीच्या वातावरणामध्ये डायमिथाइल सल्फाइड आणि डायमिथाइल डायसल्फाइडच्या रसायनांच्या खुणा शोधून काढल्या आहेत.

आपल्या सौरमालेबाहेर असलेल्या ग्रहांचा उल्लेख एक्सोप्लॅनेट असा केला जातो. के२-१८ हा आपल्या पृथ्वीपेक्षा ८.६ पट अधिक मोठा आहे. डायमिथाइल डाय सल्फाइड एकाच रासायनिक परिवारामधील अणू आहेत. तसेच या दोघांच्या आधारावर तिथे बायोलॉजिकल क्रिया होत आहेत, असे मानले जाते. त्या आधारावर तिथे आधी किंवा आता जीवन अस्तित्वात आहे याचा शास्त्रज्ञ शोध घेतात.

प्राध्यापक निक्कू मधुसूदन यांनी सांगितले की, आम्हाला भक्कम आणि स्पष्ट सिग्नल मिळाले आहेत. द अॅस्ट्रोफिजिकल जर्नल लेटर्स मध्ये याबाबतचं संशोधन प्रसिद्ध झालं आहे. प्राध्यापक मधुसूदन यांनी पुढे सांगितले की, आम्ही मागच्या वेळी जे संकेत पाहिले होते ते डीएमएसमुळे आहेत की नाही, याबाबत आम्हाला निश्चितपणे माहिती नव्हती. मात्र हे संकेत आम्हाला पुढे काम करण्यासाठी प्रोत्साहित करणारे होते. यासाठी वेगवेगळ्या उपकरणांचा वापर करून अभ्यास करण्यात आला.

यापूर्वी डीएमएसचा तात्पुरता अंदाज हा अन्य उपकरणांच्या आधारावर लावण्यात आला होता. के२-१८बी च्या वातावरणामध्ये काही रेणू असल्याचे भक्कम पुरावे मिळाले आहेत. आता हे संशोधनावर शिक्कामोर्तब झाले तर आपल्या सौरमालेबाहेरील एका ग्रहावर जीवसृष्टीच्या अस्तित्व आहे हे निश्चित होईल. तिथेही जीवन आहे आणि तिथे एलियन्सचं वास्तव्य असू शकतं.