भारताविरोधात पाकिस्तानचं ऑपरेशन 'बुनयान उल मरसूस'; काय आहे या शब्दाचा अर्थ?
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 10, 2025 10:07 IST2025-05-10T10:04:00+5:302025-05-10T10:07:44+5:30

भारताच्या ऑपरेशन सिंदूरनं बिथरलेल्या पाकिस्तानने भारताविरोधात ऑपरेशन बुनयान उल मरसूस(Operation Bunyan Ul Marsoos) सुरू केले आहे. या ऑपरेशनअंतर्गत पाकिस्तानने भारताच्या नागरी वस्त्यांवर हल्ल्याचा प्रयत्न सुरूच ठेवला आहे. ज्याला भारतीय सैन्याकडून चोख प्रत्युत्तर दिले जात आहे.
भारताविरोधात सुरू असलेल्या संघर्षात पाकिस्तानने त्याला ऑपरेशन बुनयान अल मरसूस नाव दिले आहे. ज्याचा अर्थ काचेसारखी मजबूत भिंत, अशी भिंत जी मजबुतीने रक्षण करते. या नावासह पाकिस्तान स्वत:ला जगासमोर मजबूत देश म्हणून ओळख बनवू इच्छित आहे.
ऑपरेशन बुनयान उल मरसूस अंतर्गत पाकिस्तानने शनिवारी भारतावर फतेह १ मिसाईलसह ड्रोन हल्ले केले. रेडिओ पाकिस्ताननुसार, बुनयान अल मरसूस हे नाव कुरानच्या एका आयातामधून घेतले आहे. ज्याचा अर्थ मजबूत भिंत..या ऑपरेशनमध्ये भारताच्या अनेक शहरांवर हल्ले केले जात आहेत परंतु भारताने हे सर्व हल्ले परतावून लावले.
पाकिस्तानी इंटर सर्विसेज पब्लिक रिलेशन्सचे महासंचालक लेफ्टिनंट जनरल अहमद शरीफ म्हणाले की, भारताने ३ सैन्य तळांवर हल्ले केलेत. त्याला प्रत्युत्तर देत भारताच्या पंजाबच्या शीख परिसरात ६ बॅलेस्टिक मिसाईल डागल्या आहेत. भारताने जे सुरू केले त्याला आमचे सैन्य संपवण्याची तयारी करत आहेत असा दावा त्यांनी केला.
पाकिस्तानी सैन्याने दावा केलाय की, भारताच्या अन्य सैन्य तळांवर हल्ले सुरू आहेत. भारताच्या त्या सगळ्या ठिकाणांना जिथून पाकिस्तानी नागरिकांवर आणि मशिदीवर हल्ले केले होते त्याला पाकिस्तान टार्गेट करत आहे असं सांगण्यात येते.
गुरुवारी रात्रीपासून भारताच्या विविध शहरांवर पाकिस्तानकडून सीजफायरचे उल्लंघन केले गेले. पाकिस्तानाकडून ३०० हून अधिक ड्रोन हल्ले केले. त्याला भारतीय सैन्याच्या एअर डिफेन्सने उडवून लावले. भारत आणि पाकिस्तान यांच्या तणावाच्या पार्श्वभूमीवर पाकिस्तानी पंतप्रधान शहबाज शरीफ यांनी नॅशनल कमांड अथॉरिटीची बैठक बोलावली आहे. ही कमिटी अणुसश्त्राचा वापर करण्याचा निर्णय घेते.
पाकिस्तानकडून हवाई हल्ले वाढल्यानंतर भारतीय लष्करानेही जबरदस्त प्रहार सुरू केला आहे. पाकिस्तान ज्या ठिकाणांवरून भारतातील नागरिक वस्त्यांवर आणि लष्करी ठिकाणांना लक्ष्य केले जात आहे. त्यातील काही चौक्या भारतीय लष्कराने उद्ध्वस्त केल्या आहेत.
गुरुवारपासून भारतातील सीमाभागातील नागरी वस्त्यांवर पाकिस्तानने भ्याड हल्ले सुरू केलेत. या ड्रोन हल्ल्यामुळे नागरिकांच्या घरांचे मोठे नुकसान झाले आहे. त्याशिवाय हल्ल्यात काहीजण जखमी झाल्याचीही माहिती आहे.
सीमेजवळील मुघलानी कोट गावातील एका शेतातून पाकिस्तानी ड्रोनचे अवशेष सापडले आहेत. पहाटे ५ च्या सुमारास पाकिस्तानकडून अमृतसर छावणीवर ड्रोन हल्ल्याचा प्रयत्न केला, मात्र हे ड्रोन हवेतच उडवण्यात आले अशी माहिती भारतीय लष्कराने देत पाकिस्तानला तोडीस तोड उत्तर देऊ असा इशाराही दिला आहे.
सीमेवर पाकिस्तान लष्कराकडून उखळी तोफांचे हल्ले गावांवर केले जात असून, यात आता एका अधिकाऱ्याचा मृत्यू झाला आहे. मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी अतिरिक्त आयुक्त राज कुमार थापा यांचा पाकिस्तानने केलेल्या हल्ल्यात मृत्यू झाल्याची माहिती दिली.