मनात आले तर डोनाल्ड ट्रम्प मस्कना अमेरिकेबाहेरही घालवू शकतात? बड्या हस्तीने वर्मावर बोट ठेवले...

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 6, 2025 13:46 IST2025-06-06T13:40:28+5:302025-06-06T13:46:04+5:30

Donald Trump vs Elon Musk: अमेरिकन मीडिया टायकून स्टीव्ह बॅनन यांचा डोनाल्ड ट्रम्प यांना सल्ला, ते व्हाईट हाऊसचे अधिकारीही होते.

अब्जाधीश एलन मस्क आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यातील मतभेद आता इरेला पेटले आहेत. मी नसतो तर डोनाल्ड ट्रम्प राष्ट्राध्यक्ष निवडणूक जिंकले नसते, असे वक्तव्य करून मस्क यांनी आता ट्रम्प यांनाच कमी लेखले आहे. यामुळे आता ही दोस्ती कुस्तीत बदलली असून मस्क यांना देशाबाहेर हाकलून द्या आणि त्यांची स्पेस एक्स कंपनी ताब्यात घ्या असा सल्ला अमेरिकेच्या बड्या हस्तीने दिला आहे.

एलन मस्कना धडा शिकविण्याची गरज आहे. मस्क यांच्या इमिग्रेशन स्थितीची चौकशी करावी आणि त्यांना शक्य तितक्या लवकर अमेरिकेतून हद्दपार करावे, असे अमेरिकन मीडिया टायकून स्टीव्ह बॅनन यांनी म्हटले आहे. मस्क यांची कंपनी स्पेसएक्स जप्त करण्याची देखील मागणी त्यांनी ट्रम्प यांच्याकडे केली आहे.

संरक्षण उत्पादन कायद्याचा वापर करून मस्कची रॉकेट कंपनी स्पेसएक्सवर नियंत्रण मिळवायला हवे, असेही ते म्हणाले. बॅनन हे व्हाईट हाऊसचे माजी अधिकारी देखील होते. मस्क यांनी स्पेसएक्सचे प्रमुख कार्यक्रम तात्काळ बंद करण्याची धमकी दिली आहे. कोरियन युद्धाच्या काळातील या कायद्याने राष्ट्राध्यक्षांना खाजगी कंपन्यांवर नियंत्रण ठेवण्याचा अधिकार मिळतो. याचाच वापर करण्याचा सल्ला बॅनन यांनी दिला आहे.

मस्क हे मुळचे अमेरिकन नाहीत. त्यांचा जन्म दक्षिण आफ्रिकेचा आहे. त्यांची आई ही कॅनडाची असल्याने त्यांना वयाच्या १७ व्या वर्षी कॅनडाचे नागरिकत्व मिळाले होते. दुहेरी नागरिकत्वामुळे मस्क यांना अमेरिकेत शिक्षण घेता आले, तसेच स्थलांतर करता आले.

एलन मस्क २००२ मध्ये अमेरिकेचे नागरिक बनले. हे नागरिकत्व घेताना आधी शिक्षण नंतर नोकरी असे टप्पे पार करत अनेक अडचणींतून त्यांना जावे लागले होते. यामुळे मनात आले तर ट्रम्प मस्क यांना अमेरिकेबाहेरही घालवू शकतात.

१९८९ मध्ये मस्क कॅनडाला गेले आणि त्यांनी किंग्स्टन, ओंटारियो येथील क्वीन्स युनिव्हर्सिटीमध्ये शिक्षण सुरू केले. १९९२ मध्ये, त्यांनी J-1 स्टुडंट एक्सचेंज व्हिसाचा वापर करून अमेरिकेतील पेनसिल्व्हेनिया विद्यापीठात बदली करून घेतली. विद्यापीठानंतर वर्क व्हिसा मिळवण्यासह त्यांनी व्हिसा बदलांच्या अनेक टप्प्यांतून जावे लागले. याच इमिग्रेशनची चौकशी करून ट्रम्प मस्कना कात्रीत पकडू शकतात.

बायडेन सरकार ईव्हीच्या खरेदीवर ७,५०० डॉलरची कर सवलत देत होते. ट्रम्प यांनी आणलेल्या नव्या विधेयकात ही सवलत बंद केली जाणार आहे. हीच गोष्ट मस्क यांना खटकली आहे. कारण अमेरिकेत त्यांचीच टेस्ला ही सर्वात मोठी ईव्ही कंपनी आहे. यावरून ट्रम्प आणि मस्क यांच्यात खटके उडू लागले आहेत. २००९ ते २०२५ दरम्यान ज्या कंपन्यांनी दोन लाख ईव्ही विकल्या आहेत, त्यांना ही सवलत मिळणार नाही, असे या विधेयकात आहे. डॉजमधून लाखो अमेरिकन लोकांच्या नोकऱ्या काढून घेणाऱ्या मस्क यांच्यावरच आता ट्रम्प यांनी कुऱ्हाडीचे घाव घालण्यास सुरुवात केली आहे.