भारताला डिवचायला गेले आणि स्वत:च ट्रोल झाले, ट्विटरवर पाकिस्तानी सैन्याची उडाली खिल्ली

By ऑनलाइन लोकमत | Published: August 3, 2020 03:32 PM2020-08-03T15:32:34+5:302020-08-03T15:40:37+5:30

कलम ३७० रद्द करण्याच्या भारताच्या निर्णयाला ५ ऑगस्ट रोजी एक वर्ष पूर्ण होत आहे. त्यापार्श्वभूमीवर काश्मीरमध्ये अस्वस्थता पसरवण्याचा डाव पाकिस्तानकडून खेळला जात आहे.

गतवर्षी भारताने काश्मीरमधील कलम ३७० रद्द केल्यापासून पाकिस्तान सरकार आणि लष्कर कमालीचे अस्वस्थृ झालेले आहे. पाकिस्तानकडून हा मुद्दा प्रत्येक ठिकाणी उपस्थित करण्याचा प्रयत्न झालाय, पण प्रत्येक ठिकाणी तोंडघशी पडण्याची वेळ पाकिस्तानवर आली आहे.

दरम्यान, कलम ३७० रद्द करण्याच्या भारताच्या निर्णयाला ५ ऑगस्ट रोजी एक वर्ष पूर्ण होत आहे. त्यापार्श्वभूमीवर काश्मीरमध्ये अस्वस्थता पसरवण्याचा डाव पाकिस्तानकडून खेळला जात आहे. त्याचाच एक भाग म्हणून पाकिस्तानी सैन्याच्या मीडिया विंगने एक गाणे रिलीज केले आहे. मात्र पाकिस्तानचा हा डाव त्यांच्याच अंगाशी आल्याचा प्रकार घडला आहे.

पाकिस्तानी सैन्याने काश्मीरबाबत एक गाणे रिलीज केले. मात्र पाकिस्तानी लष्कर गाण्यावरून स्वत:च्याच देशात ट्रोल झाले. हे गाणे रिलीज झाल्यानंतर सोशल मीडियावर हॅशटॅग आयएसपीआर ट्रेंड होऊ लागला आणि पाकिस्तानमधून नाराजी व्यक्त होऊ लागली.

डेव्हलपिंग पाकिस्तान नावाच्या ट्विटर अकाऊंटवरून एक ट्विट करण्यात आले आहे. आम्ही काश्मिरींसोबत ऐक्य दाखवण्यासाठी काय करतोय, तर रस्त्यांचे नाव बदलतोय. नवी गाणी रिलीज करतोय आणि घोषणाबाजी करतोय, असे या ट्विटमध्ये म्हटले आहे.

पाकिस्तानचे सरकार देशातील करदात्यांच्या पैसा वाया घालवत आहे, असा आरोप अनेक पाकिस्तानी नागरिकांकडून करण्यात येत आहे. दरम्यान, पाकिस्तानी लष्कराकडून सुरू असलेल्या स्टंटबाजीबाबत संताप व्यक्त करण्यात येत आहे.

दरम्यान, पाकिस्तानमध्ये दहशतवादी हल्ला झाला तर आमचे लष्कर एखादे गाणे शेअर करील, असा टोला एका ट्विटर युजरने लगावला आहे.

पाकिस्तान काश्मीरच्या मुद्द्यावरून प्रोपेगेंडा फैलावण्याचा प्रयत्न करत आहे. त्याचाच भाग म्हणून पाकिस्तानी पंतप्रधान इम्रान खान हे ५ ऑगस्ट रोजी मुझफ्फराबादला जाणार आहेत. तसेच ५ ऑगस्ट हा दिवस काळा दिवस म्हणून साजरा करण्याचा पाकिस्तानचा प्रयत्न आहे.