ललित मोदी आणि विजय माल्यासोबत दिसणारी 'ही' महिला कोण?
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 24, 2025 19:59 IST2025-12-24T19:48:42+5:302025-12-24T19:59:46+5:30
आयपीएलचे संस्थापक आणि माजी अध्यक्ष ललित मोदी सध्या त्यांच्या वैयक्तिक आयुष्यामुळे पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. विजय माल्याच्या वाढदिवसाच्या पार्टीतील एका व्हायरल व्हिडिओमध्ये ललित मोदींसोबत एक महिला दिसून आली, जी त्यांची नवी गर्लफ्रेंड असल्याचं सांगितलं जात आहे.

व्हॅलेंटाईन डे २०२५ च्या निमित्ताने ललित मोदींनी स्वतः या नात्याची कबुली दिली होती. सुष्मिता सेनसोबतच्या अल्पशा नात्यानंतर आता मोदींच्या आयुष्यात रीमा बौरी यांची एन्ट्री झाली आहे.

६१ वर्षीय ललित मोदी यांनी सोशल मीडियावर रीमा बौरी यांच्यासोबतचे काही फोटो शेअर केले होते. "मी आयुष्यात दोनदा नशीबवान ठरलो. जेव्हा २५ वर्षांच्या मैत्रीचं प्रेमात रुपांतर होतं, तेव्हा ते खूप खास असतं," अशा शब्दांत मोदींनी आपल्या भावना व्यक्त केल्या होत्या.

रीमा यांनीही या पोस्टवर "लव्ह यू मोर" अशी कमेंट करून नात्यावर शिक्कामोर्तब केलं होतं. रीमा बौरी या केवळ ललित मोदींच्या जोडीदार म्हणूनच नाही, तर त्यांच्या स्वतःच्या कर्तृत्वामुळेही ओळखल्या जातात.

रीमा या लेबनॉनमध्ये स्थित असलेल्या एक स्वतंत्र सल्लागार आहेत. त्यांचा मार्केटिंग क्षेत्रात मोठा अनुभव आहे. त्यांनी त्यांचे प्राथमिक शिक्षण ब्रिटनमधील सरे येथील 'सेंट टेरेसा कॉन्व्हेंट'मधून पूर्ण केले.

त्यानंतर स्वित्झर्लंडमधील 'ब्रिलेंटमोंट इंटरनॅशनल स्कूल'मधून ए-लेव्हल पूर्ण करून लंडनच्या अमेरिकन इंटरनॅशनल युनिव्हर्सिटीमधून मार्केटिंगमध्ये पदवी मिळवली. रीमा यांना अनेक भाषा अवगत आहेत. त्या इंग्रजी, फ्रेंच आणि पोर्तुगीज भाषा अस्खलित बोलू शकतात, तसेच त्यांना अरबी भाषेचेही ज्ञान आहे.

रीमा यांचे इन्स्टाग्राम अकाउंट खासगी असून ललित मोदी त्यांना फॉलो करतात. ललित मोदी यांचे पहिले लग्न मिनल सगरानी यांच्याशी झाले होते. १९९१ पासून २०१८ पर्यंत (मिनल यांच्या निधनापर्यंत) ते एकत्र होते.

मिनल यांच्या निधनानंतर २०२२ मध्ये ललित मोदींनी अभिनेत्री सुष्मिता सेनसोबतच्या नात्याची घोषणा केली होती, ज्यामुळे मोठी खळबळ उडाली होती. मात्र, हे नाते फार काळ टिकले नाही आणि आता २०२५ मध्ये मोदींनी रीमा बौरी यांच्याशी असलेल्या प्रेमाची जाहीर कबुली दिली आहे.

















