"असं सोशल मीडिया तयार करा जिथे वडिलांवर बॅन लागणार नाही," ट्रम्प यांच्या मुलाची विनंती

By जयदीप दाभोळकर | Published: January 15, 2021 12:12 PM2021-01-15T12:12:32+5:302021-01-15T12:19:05+5:30

अमेरिकेच्या संसद इमारतीत झालेल्या हिंसाचारानंतर अमेरिकेचे मावळते राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना फेसबुक ट्विटर, युट्यूब, स्नॅपचॅटसारख्या सोशल मीडिया माध्यमांनी बंदी घातली होती.

दरम्यान, यानंतर जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती आणि टेस्ला, स्पेस एक्ससारख्या कंपन्यांचे संस्थापक अॅलन मस्क यांच्याकडे डोनाल्ड ट्रम्प यांच्या मुलानं एक विनंती केली आहे.

त्यांनी असं सोशल मीडिया प्लॅटफॉर्म तयार करावं ज्या ठिकाणी आपल्या वडिलांना बॅन केलं जाणार नाही, अशी विनंती त्यांनी मस्क यांच्याकडे केली आहे. फेसबुक ट्विटर, युट्यूब, स्नॅपचॅटसारख्या सोशल मीडिया माध्यमांनी अमेरिकन संसदेत झालेल्या हिंसाचारानंतर सुरक्षेच्या कारणास्तव ट्रम्प यांच्या सोशल मीडिया अकाऊंट्सवर बंदी घातली होती.

ट्रम्प यांच्या मुलानं एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. यात त्यांनी अॅलन मस्क हे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म का तयार करत नाहीत असा प्रश्न त्यांनी विचारला आहे.

त्यांनी अंतराळासंबंधी अनेक उत्तर काम केलं आहे आणि ते स्वत:च्या हिंमतीवरच केलं आहे. त्यांनी मोठ्या मोठ्या देशांच्या सरकारांपेक्षा अधिक उत्तम काम करून दाखवलं आहे, असंही ते म्हणाले.

मी एक असा प्लॅटफॉर्म तयार करायला सांगत आहे ज्यावरून आपले विचार दुसऱ्या विचारधारेच्या लोकांसोबत शेअर करता येतील. तसंच त्या ठिकाणी आपल्यावर निर्बध घालण्याचे प्रयत्नही केले जाणार नाही असा प्लॅटफॉर्म तयार झाला पाहिजे, असं ट्रम्प यांच्या मुलानं म्हटलं.

अॅलन मस्क तुम्ही असा एखादा प्लॅटफॉर्म का तयार करत नाही. तुम्ही एक कॉन्सेप्ट घेऊन या. मला असं वाटतं की तुम्ही असे व्यक्ती आहात जे अमेरिकेच्या फ्री स्पीचला वाचवू शकता असंही त्यांनी नमूद केलं. ट्रम्प यांना बॅन केल्यानंतरनंतर मोठ्या टेक कंपन्या चुका करत असल्याचं ते म्हणाले होते.

तसंच या लोकांची पद्धत नागरिकांमध्ये दरी निर्माण करण्याची आहे आणि मी मोठ्या कालावधीपासून यासंदर्भात बोलत आहे. या कंपन्यांनी मोठी चूक केली आहे आणि अन्य कंपन्यादेखील असं करतील असा संदेश यातून जात आहे. यामुळे अनेक समस्या निर्माण होऊ शकतात, असंही ट्रम्प म्हणाले होते.

अमेरिकेचे मावळते राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना गेल्या काही दिवसांत अनेक धक्के बसले आहेत. अमेरिकेच्या संसदेच्या इमारतीत ट्रम्प समर्थकांनी केलेल्या हिंसाचारानंतर ट्रम्प यांचं ट्विटर अकाऊंट कायमचं बंद करण्यात आलं होतं.

धक्क्यांची ही मालिका सुरूच असून, फेसबुक, ट्विटरनंतर गुगलची मालकी असलेल्या यूट्यूबने डोनाल्ड ट्रम्प यांचे अधिकृत अकाऊंट बंद केलं होतं. यानंतर आता ट्रम्प यांना आणखी एक झटका बसला आहे. सोशल नेटवर्किंग अ‍ॅप स्नॅपचॅटने कायमस्वरुपी बॅन केलं आहे.