"कोरोनाचा Delta Variant सर्वांत धोकादायक, यापासून अमेरिकेसह संपूर्ण जगाने सावध व्हावे"

By ऑनलाइन लोकमत | Published: July 11, 2021 09:07 AM2021-07-11T09:07:34+5:302021-07-11T09:18:33+5:30

कोरोना व्हायरसचा आता सर्वात प्रमुख आणि धोकादायक व्हेरिएंट डेल्टा (Delta Variant) आहे, असे अमेरिकेची सर्वोच्च मेडिकल संस्था, सेंटर्स फॉर डिसीज कंट्रोल अँड प्रिव्हेंशनने (CDC) म्हटले आहे. डेल्टा व्हेरिएंट सतत अमेरिकेत आणि जगभरातील लोकांना संक्रमित करीत आहे.

अमेरिकेत गेल्या दोन आठवड्यांत अनेक कोरोना प्रकरणांमध्ये डेल्टा व्हेरिंएंट आहे. अमेरिकेच्या काही भागात अजूनही लोक लस घेण्यास असमर्थ आहेत, यामुळे अमेरिकन सरकार चिंतेत आहे. लस घेतली नाही, यामध्ये मुलांचा देखील समावेश आहे. गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये डेल्टा व्हेरिएंटची नोंद भारतात झाली होती. याला B.1.617.2 म्हणून देखील ओळखले जाते.

सध्या अमेरिकेतल्या सर्व कोरोना प्रकरणांपैकी 51.7 टक्के प्रकरणे डेल्टा व्हेरिएंटची आहेत. 20 जून ते 3 जुलै या कालावधीत हा डेटा आहे. तर अल्फा व्हेरिएंट किंवा B.1.1.7, जो सर्वात आधी यूकेमध्ये आढळला. हा सुद्धा अमेरिकेत 28.7 टक्के कोरोना प्रकरणांमध्ये दुसर्‍या क्रमांकावर आहे.

सीडीसी म्हणणे आहे की, डेल्टा व्हेरिएंट अमेरिकेत खूप वेगाने पसरला. आता हा देश आणि जगातील सर्वात मोठा कोरोना व्हेरिएंट आहे. मे मध्ये त्याची प्रकरणे केवळ 10 टक्के होती, ती 6 जून ते 19 जून दरम्यान झपाट्याने वाढून 30 टक्के झाली.

आयोवा, कन्सास, मिसौरीमध्ये डेल्टा व्हेरिएंटचा 80.7 टक्के प्रादुर्भाव झाला. तर नेब्रास्का, कोलोराडो, मोंटाना, नॉर्थ डकोटा, साउथ डकोटा, उटाह, व्योमिंग येथे 74.3 टक्के संसर्ग पसरला आहे, असे सीडीसीने नोंदवले आहे.

अमेरिकेसारख्या देशांमध्ये, ज्याठिकाणी बहुतेक लसीकरण करण्यात आले आहे, मात्र याठिकाणी ज्या लोकांनी लस घेतली नाही, त्या लोकांना डेल्टा व्हेरिएंटचा संसर्ग झाल्याचे दिसून आले आहे. विशेषत: तरुणांना आणि मुलांना संसर्ग झाला.

जागतिक आरोग्य संघटनेच्या मार्गदर्शक तत्त्वांचे आत्तापर्यंत पालन करण्यास सीडीसीने नकार दिला आहे. ज्यामध्ये असे सांगितले गेले आहे की, ज्यांना लस मिळाली आहे ते देखील मास्क लावतील.

डेल्टा व्हेरिएंटमुळे संपूर्ण जग चिंतेत आहे. कारण कोरोना व्हायरसचा हा व्हेरिएंट, ज्यांनी लस घेतली आहे, त्यांना देखील संसर्ग करत आहे. यामुळे ऑस्ट्रेलिया, ब्रिटन, इस्त्राईल आणि बर्‍याच युरोपियन देशांमध्ये लॉकडाऊन लागून करण्यात आले. त्यामुळे अमेरिकेतही बरीच भीती आहे. अल्फा व्हेरिएंटपेक्षा 40 ते 60 टक्के जास्त संसर्गजन्य आहे.

वुहानमधून आलेल्या व्हेरिएंटपेक्षा डेल्टा व्हेरिएंट 50 टक्के अधिक संसर्गजन्य आहे. यामुळे अधिक लोक रुग्णालयात दाखल होत आहेत. डेल्टा व्हेरिएंटचा प्रभाव यूकेमध्ये कमी आहे, परंतु याठिकाणी झालेल्या एका स्टडीतून असे दिसून आले आहे की, जलद लसीकरण कार्यक्रम सुरू करावा. लोकांनी स्वत: ला जाऊन लस घेतली तर ते डेल्टा व्हेरिएंटपासून वाचतील किंवा त्याची गंभीरता कमी करू शकतील.

फक्त लसीकरणामुळे संपूर्ण सुरक्षा मिळणार नाही. लसीकरणानंतरही लोकांना मास्क घालावा लागेल, जेणेकरून ते डेल्टा व्हेरियंट किंवा इतर कोणत्याही व्हेरिएंटचे संक्रमण टाळतील. मुले या व्हेरिएंटपासून इम्यून नाहीत. तरूणही नाहीत. त्यामुळे त्यांना वाचविणे फार महत्वाचे आहे. सध्या अमेरिकेत फक्त 47 टक्के लोकांना लसीचे दोन्ही डोस मिळाले आहेत.