रात्रीच्या काळोखात समुद्राच्या मधोमध रशियानं केला कांड; अमेरिका पाहतच राहिला, भारत-चीनला फायदा
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 24, 2026 16:52 IST2026-01-24T16:46:36+5:302026-01-24T16:52:26+5:30

अमेरिकेने रशियाकडून तेल खरेदी करण्यावरून भारतावर अतिरिक्त २५ टक्के टॅरिफ लावला आहे. अलीकडच्या काळात भारताने रशियाकडून तेल खरेदी कमी केली आहे परंतु आजही रशिया भारताचा सर्वात मोठा तेल पुरवठादार आहे. रशियाच्या तेलावर अमेरिका आणि पाश्चात्य देशांनी निर्बंध आणले आहेत.

रशियासोबत इराणवरही निर्बंध आणले गेलेत. त्यामुळे पुन्हा डार्क फ्लीट चर्चेत आले आहे. म्हणजेच हे एक टँकरचं असं नेटवर्क असते, ज्याचा वापर रशिया, इराण आणि व्हेनेझुएलाच्या निर्बंधित तेलाचा व्यवसाय करते. याची व्याप्ती जागतिक टँकरच्या एकूण क्षमतेच्या आसपास १८.५ टक्के इतकी आहे. त्यातून हा व्यवसाय किती पसरला आहे त्याचा अंदाज लावला येतो.

तेलाच्या या काळ्या दुनियेत सर्वात मोठा खेळाडू रशिया आहे. डार्क फ्लीटमध्ये कायम जुन्या जहाजांचा वापर केला जातो. त्यात बहुतांश पाश्चात्य देशांच्या कंपन्या असतात. जागतिक निर्बंधांना चकमा देण्यासाठी अनेक युक्त्या वापरल्या जातात. त्यात बनावट झेंडे लावणे, बनावट लोकेशन पाठवणे, वारंवार नाव बदलणे, जीपीएस सॅटेलाईटपासून वाचण्यासाठी ट्रांसपोंडर बंद करणे याचा समावेश आहे.

या जहाजांचे ऑपरेशनल स्ट्रक्चर इतके जटील असते की ते सहज सापडणे कठीण होते. युक्रेनवर रशियाने हल्ला केल्यानंतर या जहाजांच्या संख्येत वेगाने वाढ झाली आहे. ही जहाजे रशियाच्या बाल्टिक आणि काळ्या समुद्रातील बंदरांमधून तेल वाहून नेतात ज्यामुळे रशियाला दरवर्षी अब्जावधी डॉलर्सची कमाई होते.

केप्लरच्या अंदाजानुसार, जागतिक डार्क फ्लीटमध्ये ३,३०० हून अधिक जहाजे आहेत. अलीकडच्या काळात सिंगापूरभोवती अशा जहाजांच्या लक्षणीय हालचाली दिसून आल्या आहेत. या जहाजांमध्ये अनेकदा तस्करी केलेले तेल आणि लष्करी उपकरणे असतात असं रिपोर्टमध्ये म्हटलं आहे.

सोबतच सहसा रात्रीच्या वेळी या जहाजांमध्ये माल वाहतूक करतात. ही जहाजे अनेकदा मलेशियाच्या किनाऱ्याजवळ सापडतात, ज्यामुळे गंभीर सुरक्षा आणि पर्यावरणीय धोके निर्माण होतात. यापैकी बहुतेक जहाजे दुबईसारख्या देशांमधून चालणाऱ्या शेल कंपन्यांच्या मालकीची आहेत.

या जहाजांचे मालक कोण आहेत आणि त्यांचा विमा कोण घेतो हे शोधणे कठीण आहे. बऱ्याचदा ते समुद्रात जहाजांमध्ये इंधन हस्तांतरित करण्याची प्रक्रिया, बंकरिंगमध्ये गुंततात. यामुळे जहाज प्रत्यक्षात कुठून आले आणि तेल कुठून आले याचा मागोवा घेणे कठीण होते असं तज्ञांचे म्हणणे आहे. कधीकधी ते तेल मिसळतात, म्हणून समुद्रात डार्क फ्लीटमध्ये एक कायदेशीर जहाज असते, ज्यातून जहाज-ते-जहाज हस्तांतरण केले जाते आणि ते तेल मिसळतात जेणेकरून तेल प्रत्यक्षात कुठून आले हे शोधणे कठीण होते.

जागतिक बाजारपेठेत रशिया आणि इराण हे बंदी घातलेल्या कच्च्या तेलाचे प्रमुख विक्रेते आहेत तर भारत आणि चीन हे सर्वाधिक खरेदीदार आहेत. २०२५ च्या शेवटच्या तीन महिन्यांत भारत आणि चीनने डार्क फ्लीटकडून सुमारे २० टक्के कच्च्या तेलाची खरेदी केली. एस अँड पीच्या रिपोर्टनुसार, चीन इराणी तेलाचा सर्वात मोठा खरेदीदार आहे. हे तेल एका अस्पष्ट प्रक्रियेद्वारे चीनपर्यंत पोहोचते. इराणी कच्चे तेल वाहून नेणारी जहाजे त्यांचा माल आग्नेय आशियातील किनाऱ्यावरील इतर जहाजांवर हस्तांतरित करतात. त्यानंतर ही जहाजे चिनी बंदरांकडे जातात.

२०२५ मध्ये ६८६ जहाजे आणि १९६ कंपन्यांना कच्च्या तेलाची बेकायदेशीर वाहतूक केल्याबद्दल निर्बंध आणले होते. असे असूनही डार्क फ्लीट केवळ मोठाच नाही तर ऑपरेशनलदृष्ट्या मजबूत देखील आहे. ही अशी यंत्रणा आहे ज्यात प्रवेश करणे कठीण आहे.

भारत डार्क फ्लीटद्वारे कच्च्या तेलाचा एक प्रमुख आयातदार देखील आहे. अंदाजानुसार २०२४ मध्ये रशियाच्या भारतात होणाऱ्या कच्च्या तेलाच्या ९.५% शिपमेंट डार्क फ्लीटद्वारे झाले. एप्रिलमध्ये अमेरिकेने लादलेल्या शुल्कानंतर भारताने रशियन कच्च्या तेलाची आयात लक्षणीयरीत्या कमी केली असे अधिकृत आकडेवारीवरून दिसून येते. भारताच्या कच्च्या तेलाच्या आयातीमध्ये रशियाचा वाटा जुलै २०२४ मध्ये ४५% च्या उच्चांकावरून डिसेंबर २०२५ मध्ये ३२% पर्यंत घसरला.

















