जगभरात अनेक ठिकाणी तणाव, सीमा अशांत, मात्र या देशांकडे सैन्यच नाही, कसं होतं संरक्षण?
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 29, 2024 15:27 IST2024-12-29T15:24:41+5:302024-12-29T15:27:49+5:30
Countries Have No Military: सद्यस्थितीत जगातील अनेक देशांमध्ये तणावाचं वातावरण आहे. काही ठिकाणी युद्ध परिस्थितीत आहे. तर काही देशांमध्ये सीमांवरून वाद सुरू आहेत. अशा परिस्थितीत देशाच्या संरक्षणासाठी सैन्यदल असणं अपरिहार्य बनलेलं आहे. मात्र जगात असेही काही देश आहेत जे या सर्व वादविवादांपासून दूर आहेत. तसेच त्यांच्याकडे स्वत:चं सैन्यदलही नाही.

सद्यस्थितीत जगातील अनेक देशांमध्ये तणावाचं वातावरण आहे. काही ठिकाणी युद्ध परिस्थितीत आहे. तर काही देशांमध्ये सीमांवरून वाद सुरू आहेत. अशा परिस्थितीत देशाच्या संरक्षणासाठी सैन्यदल असणं अपरिहार्य बनलेलं आहे. मात्र जगात असेही काही देश आहेत जे या सर्व वादविवादांपासून दूर आहेत. तसेच त्यांच्याकडे स्वत:चं सैन्यदलही नाही. स्वत:चं लष्कर नाही असे कोणकोणते देश सध्या जगात आहेत आणि त्यांची संरक्षण व्यवस्था कशी आहे याचा घेतलेला हा आढावा.
मोनॅको
भूमध्य सागराच्या किनाऱ्यावर असलेल्या मोनॅको या देशाकडे स्वत:चं लष्कर नाही आहे. मोनॅकोच्या संरक्षणाची जबाबदारी ही फ्रान्सच्या लष्कराकडून उचलली जाते. मोनॅको या देशाची लोकसंख्या ३१ हजार एवढी असून, या देशाकडे केवळ २ सैनिक आहेत. त्यातील एक राजकुमारासाठी आहे आणि एक हा नागरिकांसाठी आहे.
मॉरिशस
भारतासोबत असलेल्या खास नात्यामुळे मॉरिशस हा देश आपल्या परिचयाचा आहे. हिंदी महासागरातील बेटांवर वसलेल्या मॉरिशसची लोकसंख्या ही १३ लाख एवढी आहे. मॉरिशसकडे कुठलंही नियमित सशस्त्र सैन्य दल नाही. या देशाकडे १० हजार पोलीस कर्मचारी आहेत. ते देशाची अंतर्गत आणि बाह्य सुरक्षा व्यवस्था पाहतात.
कोस्टा रिका
मध्य अमेरिकेतील निसर्गसंपन्न अशा कोस्टारिका या देशाकडेही कुठलंही लष्कर नाही. १९४८ मध्ये भयंकर यादवी उफाळून आल्यानंतर येथील लष्कर संपुष्टात आणण्यात आलं होतं. तेव्हापासून या देशात केवळ पोलीस यंत्रणाच आहे. तसेच ते अंतर्गत सुरक्षा व्यवस्था पाहतात.
आइसलँड
यूरोपमधील आइसलँड या देशाकडेही स्वत:चं लष्कर नाही आहे. आइसलँड हा नाटोचा सदस्य देश आहे. तसेच आइसलँडच्या संरक्षणाची जबाबदारी ही अमेरिकेने उचललेली आहे.
ग्रॅनडा
ग्रॅनडा हा कॅरेबियन समुद्रातील बेटांवर वसलेला एक देश आहे. या देशाकडेही स्वत:चं लष्कर नाही आहे. रॉयल ग्रॅनडा पोलीस तटरक्षक दलाची भूमिका बजावतात. तसेच अंतर्गत व्यवस्था पाहतात.