कोरोनाग्रस्तांच्या मृतदेहातून किती दिवसांपर्यंत होऊ शकतो संसर्ग; रिपोर्टमधून धडकी भरवणारा खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Published: December 18, 2020 12:13 PM2020-12-18T12:13:56+5:302020-12-18T12:34:32+5:30

CoronaVirus Marathi News and Live Updates: जगभरात कोरोनावर संशोधन सुरू असून रोज नवनवीन माहिती समोर आली आहे. याच दरम्यान आणखी एक चिंताजनक माहिती समोर आली आहे.

कोरोनाने संपूर्ण जगाला विळखा घातला आहे. जगभरातील रुग्णांची संख्या सात कोटींच्या वर गेली आहे. तर अनेकांचा मृत्यू झाला आहे. कोरोनामुळे गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे.

जगभरात कोरोनावर संशोधन सुरू असून रोज नवनवीन माहिती समोर आली आहे. याच दरम्यान आणखी एक चिंताजनक माहिती समोर आली आहे. कोरोना व्हायरसची लागण झालेल्या व्यक्तीच्या मृतदेहापासूनही धोका असल्याचं समोर आलं आहे.

कोरोनाग्रस्तांच्या मृतदेहापासून अनेक दिवसांपर्यंत संसर्ग पसरू शकत असल्याची माहिती समोर आली आहे. जर्मनीमध्ये झालेल्या एका संशोधनातून ही बाब समोर आली आहे.

यूनिव्हर्सिटी मेडिकल सेंटर हॅम्बर्ग (University Medical Center Hamburg) येथे झालेल्या संशोधनाचा निकाल हा गंभीर प्रमाणात कोरोनामुळे संक्रमित झालेल्या व्यक्तींच्या छोट्याशा सँम्पलवर आधारित आहे.

संशोधकांनी याबाबत मोठ्या पातळीवर संशोधन करण्याची गरज व्यक्त केली आहे. इमर्जिंग इन्फ्रेक्सियस डिसीज नावाच्या प्रसिद्ध जनरलमध्ये प्रकाशित या संशोधनातील टीमने रुग्णालयात कोरोनामुळे मृत झालेल्या 11 जणांचा मृतदेहांवर चाचणी केली आहे.

मृतदेहांच्या नाकाच्या स्वॅबचा टेस्ट पुढील सात दिवसांपर्यंत सुरू ठेवला. ही टेस्ट प्रत्येक 12 तासाला घेण्यात आली. प्रत्येक वेळी मृत व्यक्तीच्या आरएनएमध्ये SARS-CoV-2 ची पातळी दिसत होती.

संशोधकांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत व्यक्तीच्या पेशीत SARS-CoV-2 चं संक्रमण सात दिवसांपर्यंत पाहायला मिळालं. संशोधकांच्या टीमने हा महासाथीचा धोकादायक टप्पा असल्याचे सांगितले. याशिवाय या मुद्द्यावर मोठ्या पातळीवर संशोधन करण्याची गरज व्यक्त केली.

महाराष्ट्रातील ठाणे जिल्ह्यात मे महिन्यात कोविड-19 मुळे 40 वर्षीय महिलेचा मृत्यू झाल्यानंतर त्यांच्या अंत्यसंस्कारात सहभागी झालेल्या 18 जणांना कोरोनाची लागण झाली होती.

उल्हासनगर नगरपालिका परिषदेची ही घटना असल्याचे सांगितले जात आहे. तेव्हा नगरपालिकेच्या प्रवक्त्यांनी सांगितलं होतं की, नियमांचं उल्लंघन करीत तब्बल 70 जणं महिलेच्या अंत्यसंस्कारात सामील झाले. मृत्यूपूर्वीच महिलेची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली होती. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.

जगभरात कोरोनामुळे गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. अनेक देशांमध्ये पुन्हा एकदा लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली आहे. कोरोनाग्रस्तांचा आकडा सातत्याने वाढत आहे.