...अन् चीनचा 'गेम' झाला! भारतानं दर्जा दाखवून दिला; जगभरात ड्रॅगनची दाणादाण

By कुणाल गवाणकर | Published: January 15, 2021 06:07 PM2021-01-15T18:07:00+5:302021-01-15T18:09:53+5:30

चीनच्या वुहानमधून जगभरात कोरोना पसरल्याचे पुरावे समोर आले. मात्र चीननं नेहमीच पुरावे नाकारले. आता जागतिक आरोग्य संघटनेचं पथक कोरोनाचं उगमस्थान शोधण्यासाठी चीनमध्ये पोहोचलं असताना त्यांना क्वारंटिन करण्यात आलं.

संपूर्ण जगात कोरोना पसरला असताना चीननं कोरोनावर नियंत्रण मिळवलं. त्यानंतर चीननं जगभरात वैद्यकीय साधनसामग्री पोहोचवण्यास सुरुवात केली. त्यामुळे सगळ्या देशांच्या अर्थव्यवस्थांना घरघर लागली असताना चीनचा फायदा झाला.

संपूर्ण जगात कोरोनाचा कहर सुरू असल्यानं परिस्थिती बिकट होती. अनेक देशांमध्ये लॉकडाऊन असल्यानं वैद्यकीय उत्पादनं चीनमधून आयात केली जात होती. यातही चीननं निकृष्ट उत्पादनं पाठवली.

चीनची उत्पादन क्षमता मोठी आहे. त्याचा फायदा ड्रॅगननं इतर देशांमध्ये लॉकडाऊन सुरू असताना उठवला. मात्र आता जगभरात लसीकरण सुरू असताना चीन तोंडावर आपटला आहे.

गेल्या आठवड्याभरापासून चीनच्या सिनोवॅक कोरोना लसीला धक्क्यावर धक्के बसले आहेत. अनेक देशानी सिनोवॅकच्या लसीसाठी नोंदणी केली होती. मात्र यातील अनेक देशांनी आता ऑर्डर रद्द करण्यास सुरुवात केली आहे.

चीन अक्षरश: तोंडावर आपटला असताना दुसऱ्या बाजूला भारतात तयार होणाऱ्या कोरोना लसींना वाढती मागणी आहे. त्यामुळे कोरोना लसीच्या निर्मितीत भारत सध्या जगात 'पॉवरहाऊस' झाला आहे.

एकीकडे जगातील अनेक देश चीनला देण्यात आलेली कोरोना लसींची ऑर्डर रद्द करत असताना दुसरीकडे चीनमधील सरकारी वृत्तपत्रं आणि तज्ज्ञदेखील स्वत:च्या देशाच्या लसींच्या दर्जावर प्रश्न उपस्थित करत आहेत.

ब्राझील आतापर्यंत चिनी कोरोना लसींचा वापर करत होता. मात्र आता त्यांनी भारतीय कंपनी सीरमसोबत करार केला आहे. त्यामुळे आता ब्राझीलला कोविशील्ड लस पाठवली जाईल. ब्राझील आधी अनेक देशांनी कोविशील्डसाठी ऑर्डर दिली आहे.

भारत बायोटेकनं कोवॅक्सिन लस तयार केली आहे. कोवॅक्सिनच्या आपत्कालीन वापरास परवानगी देण्यात आली आहे. जगातील एक डझनहून अधिक देशांनी कोवॅक्सिनचा वापर करण्यास उत्सुकता दाखवली आहे.

लसींच्या निर्मितीत भारत अग्रगण्य देश आहे. सीरम इन्स्टिट्यूट अतिशय सुरक्षितपणे लस तयार करत आहे. सीरमच्या लसीची गुणवत्ता आणि त्यांची क्षमतादेखील प्रचंड असल्याचं चीनमधील तज्ज्ञांनी म्हटलं आहे.