ऑफिसमध्ये कर्मचाऱ्यांनी कोरोना नियम मोडले, तर बॉसला होणार तुरुंगवास!

By ऑनलाइन लोकमत | Published: June 8, 2020 05:16 PM2020-06-08T17:16:58+5:302020-06-08T17:45:57+5:30

कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊनमुळे बंद झालेल्या कंपन्या पुन्हा सुरू होत आहेत. दरम्यान, आता कामाच्या ठिकाणी कर्मचार्‍यांसाठी काही गोष्टी पहिल्या सारख्या राहणार नाहीत. कंपनीच्या मालकांना कर्मचाऱ्यांच्या सुरक्षिततेची, स्वच्छतेची आणि सोशल डिस्टंसिंगचीही काळजी घ्यावी लागणार आहे.

ब्रिटनमध्ये यासंदर्भात कठोर कायदा तयार करण्यात आला आहे. सोशल डिस्टंसिंग आणि स्वच्छतेबाबत दुर्लक्ष केल्यास आरोग्य आणि सुरक्षा कायद्याचे उल्लंघन केल्याप्रकरणी कंपनीच्या मालकाविरूद्ध दिवाणी किंवा फौजदारी दोन्ही खटले दाखल केले जाऊ शकतात.

आरोग्य आणि सुरक्षा कायद्याचे उल्लंघन केल्यास दंड किंवा किमान दोन वर्षे तुरूंगवासाची शिक्षा होऊ शकते. म्हणूनच, कंपनीच्या मालकास प्रामुख्याने याची काळजी घ्यावी लागेल की, कंपनीचा कोणताही कर्मचारी कोरोनाच्या जाळ्यात सापडेल.

जर तुमची कामाची जागा असुरक्षित असेल तर काही गोष्टी लक्षात ठेवून तुम्ही सुरक्षित राहून काम करू शकता. भीतीमुळे काही लोक कामाच्या ठिकाणी येण्यास आक्षेप घेतात. तरी सुद्धा आपण हे सर्व सोडू शकत नाही, असे एक ब्रिटिश लॉ फर्मचे वकील डॅनियल पार्सन्स यांनी सांगितले.

डॅनियल पार्सन्स म्हणाले, "जेव्हा हा मुद्दा तुमच्या सुरक्षिततेचा असेल तेव्हा कायदा तुमचे रक्षण करतो. अशा परिस्थितीत कंपनीच्या मालकांनी कामासाठी सुरक्षित व्यवस्था केली पाहिजे आणि कामाच्या ठिकाणी असलेल्या जोखमीचे मूल्यांकन देखील केले पाहिजे."

"कामाच्या ठिकाणी कर्मचार्‍यांच्या सुरक्षेची काळजी घेणे ही कंपनीच्या मालकांची जबाबदारी आहे. तसेच, कामाच्या ठिकाणी काम सुरू करण्यासाठी त्यांना काही खास युक्त्या शोधाव्या लागतील", असे ब्रिटनमधील क्लिनोलॉजी या कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉमिनिक पोनिया यांनी सांगितले.

म्हणजेच, काही नियमांचे काटेकोरपणे पालन करावे लागेल. दररोज स्वच्छतेची काळजी घेतली पाहिजे. फ्लोर चेंजिंग प्लॅनपासून ते सोशल डिस्टंसिंगचे पालन करण्याचा विचार केला पाहिजे.

लॉकडाऊन हटवल्यानंतर देशात आणि जगामध्ये संसर्गाचा धोका आणखी वाढू नये, यासाठी आपला प्रयत्न असला पाहिजे. असे न केल्यास व्हायरसचा धोका आणखी वाढू शकतो.

दरम्यान, भारतात लॉकडाऊन हटविण्याच्या पहिल्या टप्प्यात मोठी मंदिरे, रेस्टॉरंट्स आणि मॉल्स उघडण्यास परवानगी देण्यात आली आहे.

तसेच, अनेक मोठ्या कंपन्या सुरू झाल्या आहे. कंपन्यांच्या कामाच्या ठिकाणीही काम करणाऱ्या कर्मचार्‍यांना विशेष मार्गदर्शक सूचनाही देण्यात येत आहेत.