आश्चर्य! 'या' शहरात गगनचुंबी इमारतीही बनल्यात मातीच्या; पाहून अचंबितच व्हाल

By ऑनलाइन लोकमत | Published: April 11, 2020 10:11 PM2020-04-11T22:11:35+5:302020-04-11T22:23:55+5:30

पूर्वीच्या काळात बहुतेक लोक मातीपासून घरे बांधत होती. त्या काळात चिरे आणि विटा आदींचा वापर फारच कमी प्रमाणात केला जात होता. परंतु आता परिस्थिती उलट असून, क्वचितच आपल्याला मातीची घरं पाहायला मिळतात.

बऱ्याच ठिकाणी चिऱ्यांनी बांधलेली घरं दिसतात. पण आपणास हे जाणून आश्चर्य वाटेल की जगात असे एक शहर आहे, जेथे 500पेक्षा जास्त गगनचुंबी इमारती मातीपासून बनविलेल्या आहेत.

या इमारती जगाला आश्चर्यचकित करतायत, कारण पाऊस किंवा वादळाचा त्यांच्यावर काही परिणाम होत नाही. इथल्या बर्‍याच मातीच्या इमारती शेकडो वर्ष जुन्या आहेत.

या विचित्र इमारती येमेनच्या मध्य-पूर्वेतील देश शिबम शहरात आहेत. हे शहर केवळ जगभर प्रसिद्ध आहे, कारण तिकडे मातीपासून बनवलेल्या गगनचुंबी इमारती आहेत.

त्यातील काही पाच मजल्या आहेत तर काही 11 मजल्यांइतक्या उंच आहेत. या इमारतींमध्ये बरेचशे लोक अजूनही राहतात. या शहराची लोकसंख्या सुमारे 7000 आहे. येथील लोकांचा मुख्य व्यवसाय पशुसंवर्धन आहे.

चिकणमातीने बनलेल्या उंच इमारती असलेल्या या शहरास 'वाळवंटातील शिकागो' किंवा 'वाळवंटातील मॅनहॅटन' असे संबोधले जाते.

. युनेस्कोने 1982मध्ये या शहराला जागतिक वारसा म्हणून घोषित केले. तथापि, 2015मध्ये येमेनमध्ये गृहयुद्ध झाले आणि त्यामुळे येथील इमारतींचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. त्याच वर्षी युनेस्कोने त्याला 'जोखमीतील सांस्कृतिक वारसा' म्हणून स्थान दिले.

शिबमला बर्‍याचदा 'जगातील सर्वात प्राचीन गगनचुंबी इमारत शहर' म्हणूनही संबोधले जाते. असे म्हटले जाते की, इसवी सन 1530मध्ये एक भयंकर पूर आला, ज्यामध्ये संपूर्ण शहर नष्ट झाले.

त्यानंतरच येथे मातीच्या इमारती बांधल्या गेल्या. विटा बनविण्याकरिता वापरण्यात येणाऱ्या चिकणमातीचा या इमारती बांधण्यासाठी उपयोग केला गेला आहे.

इतिहासकारांच्या मते, जेव्हा इमारतींना वाळवंटात तीव्र उष्णता मिळाली तेव्हा त्या विटांसारख्या मजबूत बनल्या. काही ठिकाणी या मातीच्या इमारतींना मजबुतीसाठी लाकडाचाही आधार घेण्यात आला आहे.

या शहरात जगातील सर्वात उंच मातीची इमारती आहेत. जरी येथे सरासरी तापमान 28 डिग्री सेल्सिअस असलं तरी इमारतींच्या खोल्यामध्ये एसीसारखाच गारवा असतो. वास्तविक माती उष्णता शोषून घेत असल्यानं या ठिकाणी राहणाऱ्या लोकांना जास्त उष्मा सहन करावा लागत नाही.