₹६७००००० चं टॉयलेट, ₹७६००० चा ब्रश अन्... किती श्रीमंत आहेत रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन? रहस्यमय आहे संपत्ती!

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 3, 2025 18:59 IST2025-12-03T18:45:15+5:302025-12-03T18:59:31+5:30

खरे तर, पुतिन यांची गणना जगातील सर्वात श्रीमंत नेत्यांमध्ये होते, मात्र त्यांची खरी संपत्ती आजही एक रहस्य आहे...

रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन (Vladimir Putin) ४ डिसेंबरपासून दोन दिवसीय भारत दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यात दोन्ही देशांमध्ये अनेक मोठे व्यावसायिक करार होण्याची शक्यता आहे. यातच त्यांच्या रहस्यमय संपत्तीचीही चर्चा सुरू झाली आहे. खरे तर, पुतिन यांची गणना जगातील सर्वात श्रीमंत नेत्यांमध्ये होते, मात्र त्यांची खरी संपत्ती आजही एक रहस्य आहे.

'द वीक'च्या वृत्तानुसार, ७३ वर्षीय पुतिन यांचे वार्षिक उत्पन्न केवळ $१,४०,००० (सुमारे ₹ १.२६ कोटी) आहे. घोषित मालमत्तेत ८०० वर्ग फुटांचे एक अपार्टमेंट, एक ट्रेलर आणि तीन कारचा समावेश आहे. मात्र, तज्ज्ञांच्या मते, पुतिन यांची एकूण संपत्ती याहून फार अधिक आहे. त्यांनी आपली बरीच संपत्ती लपवून ठेवली आहे.

मग किती असावी पुतिन यांची संपत्ती? - माध्यमांतील वृत्तांनुसर, पुतिन यांची नेटवर्थ २०० अब्ज डॉलर (सुमारे १८ हजार अब्ज रुपये) पर्यंत असू शकते. रशियाचे मोठे गुंतवणूकदार बिल ब्राउडर यांनी म्हटले होते की, २००३ मध्ये रशियन अब्जाधीश मिखाईल खोडोरकोव्स्की यांना तुरुंगवास झाल्यानंतर पुतिन यांची संपत्ती वाढू लागली.

सीएनएनच्या मते, पुतिन यांनी मोठ्या व्यापाऱ्यांना धमकावून, अटक करण्याची भीती दाखवून त्यांच्याकडून रोख रक्कम आणि कंपन्यांचे शेअर्स घेतले, यामुळे एवढी संपत्ती तयार झाली.

१.४ अब्ज डॉलर किमतीचा १,९०,००० चौरस फुटांचा विशाल महाल - पुतिन यांची घोषित संपत्ती आणि एकूण संपत्तीतील फरक प्रचंड वेगळा आहे. त्यांच्या कथित मालमत्तांमध्ये काळ्या समुद्राच्या किनारी असलेला १.४ अब्ज डॉलर किमतीचा १,९०,००० चौरस फुटांचा विशाल महाल आणि १९ अन्य घरांचा समावेश आहे. यांची किंमत 1.4 अब्ज डॉलर एवढी सागितली जाते.

या महालाच्या बाथरूममध्ये $८५० (साधारणपणे 76 हजार रुपये) चा इटालियन टॉयलेट ब्रश आणि $१२५० (साधारणपणे 1.13 लाख रुपये) किंमतीचा टॉयलेट पेपर होल्डर वापरला जातो.

महागड्या घड्याळांचा आणि विमानांचाही शौक - त्यांना महागड्या घड्याळांचा आणि विमानांचाही शौक आहे. त्यांच्याकडे ५८ विमाने आणि हेलिकॉप्टर असून, त्यात 'द फ्लाइंग क्रेमलिन' नावाच्या $७१६ दशलक्ष किमतीच्या विमानात $७५,००० किमतीचे सोन्याचे टॉयलेट असल्याची चर्चा आहे.

याशिवाय, पुतिन यांच्याकडे जिम आणि मसाज पार्लरसह २२ डब्यांची बुलेटप्रूफ 'घोस्ट ट्रेन' देखील आहे, ज्याच्या बांधकामावर सुमारे $७४ दशलक्ष खर्च आला आहे.