मूळच्या गुजराती कुटुंबाने खरेदी केली 'पाकिस्तान एअरलाईन्स'; कोण आहेत कराचीतील उद्योगपती आरिफ हबीब?
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 24, 2025 09:33 IST2025-12-24T09:28:21+5:302025-12-24T09:33:57+5:30
Arif Habib Pakistan International Airlines: आरिफ हबीब यांनी १३५ बिलियन रुपयांमध्ये पाकिस्तान इंटरनॅशनल एअरलाईन्स कंपनी खरेदी केली.

पाकिस्तान आपली सरकारी विमान कंपनी विकली. मंगळवारी (२३ डिसेंबर) इस्लामाबादमध्ये याचा लिलाव पार पडला. आरिफ हबीब यांनी १३५ बिलियनमध्ये हा सौदा झाला.

पाकिस्तान इंटरनॅशनल एअरलाईन्स कॉर्पोरेशन लिमिटेड आता आरिफ हबीब यांची झाली आहे. मागील दोन दशकांमधील पाकिस्तानमध्ये झालेले हे सर्वात मोठे खासगीकरण आहे. भारतीयांसाठी यातील खास गोष्ट म्हणजे याचे गुजरातसोबत असलेले कनेक्शन.

आरिफ हबीब हे पाकिस्तानातील एक यशस्वी उद्योगपती आहेत. आरिफ हबीब समूहाचे संस्थापक आहेत. त्यांच्या समूहाची अनेक क्षेत्रांमध्ये गुंतवणूक आहे. आर्थिक सेवा, रियल इस्टेट, सिमेंट, खते, वीज आणि स्टील उद्योग यामध्ये त्यांच्या समूहाची मोठी गुंतवणूक आहे.

आरिफ हबीब यांना त्यांच्या समाजसेवेमुळे ओळखले जाते. आरिफ हबीब फाऊंडेशनच्या माध्यमातून आरोग्य, शिक्षण आणि सामाजिक कल्याणाच्या योजनांमधून ते सेवाकार्य करत असतात. उद्योग आणि सामाजिक क्षेत्रातील कार्यामुळे त्यांना पाकिस्तानातील सर्वोच्च नागरी सन्मान सितारा-ए-इम्तियाज पुरस्कारही मिळालेला आहे.

आता आरिफ हबीब आणि गुजरात कनेक्शनबद्दल... आरिफ हबीब यांचे कुटुंबीय मूळचे गुजरातमधील आहेत. जुनागढ जिल्ह्यातील बंटवा गावातील. १९४७ मध्ये फाळणी झाली आणि त्यांचे कुटुंबीय गुजरातमधील चहा उद्योग आणि संपत्ती सोडून पाकिस्तानातील कराचीमध्ये गेले. आरिफ हबीब यांचा जन्म कराचीत झाला.

आरिफ हबीब यांनी १९७० मध्ये कराची स्टॉक एक्सचेंजमध्ये एक स्टॉकब्रोकर म्हणून कामाला सुरूवात केली. अनेकवेळा ते स्टॉक ब्रोकरचे अध्यक्ष म्हणून निवडून आले. त्यांनी हळूहळू गुंतवणूक करण्यास सुरूवात केली. खासगीकरण वाढले आणि त्यांनी सरकारी कंपन्यांमधील हिस्सा त्यांनी विकत घेण्यास सुरूवात केली.

याच कंपन्यांमधून त्यांना भरपूर परतावा मिळू लागला. त्यांच्या उत्पन्नाचा तोच मुख्य स्त्रोत आहे. पाकिस्तान इंटरनॅशनल एअरलाइन्स कॉर्पोरेशन लिमिटेडमधील गुंतवणूक हा त्याचाच भाग आहे. पाकिस्तानातील माध्यमांच्या रिपोर्टनुसार त्यांची संपत्ती ५०० मिलियन डॉलर इतकी आहे.

















