मध्यरात्रीचा थरार! समुद्रात ४ तास पोहत १३ वर्षीय मुलाने आई अन् भावंडांना वाचवलं, काय घडलं?
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 13, 2026 08:26 IST2026-02-13T08:21:15+5:302026-02-13T08:26:17+5:30

गोष्ट आहे ऑस्ट्रेलियातील एका कुटुंबाची, नुकतीच घडलेली. जोआन एपलबी ही महिला ऑस्टिन, ब्यू आणि ग्रेस या आपल्या तीन मुलांसह समुद्रावर फिरायला गेली होती.

सारेच जण पॅडलबोर्डसह पाण्यात खेळत होते. खेळता-खेळता पाण्यात ते थोडे दूर गेले आणि तेवढ्यात सोसाट्याचा वारा सुटला. हळूहळू सगळेच समुद्रात वाहत जाऊ लागले. त्यातल्या त्यात त्यांचं नशीब म्हणजे या साऱ्यांनीच लाइफ जॅकेट घातलेलं होतं. अर्थात तरीही ते समुद्रकिनाऱ्यापासून फार दूर नव्हते.

त्यांनी आपल्या बचावासाठी मोठमोठ्यानं हाका मारल्या; पण त्याचा काहीही उपयोग झाला नाही. अशावेळी आई जोआननं विचार केला, आपला १३ वर्षांचा मुलगा ऑस्टिनला कोणाची तरी मदत मागवण्यासाठी किनाऱ्याकडे पाठवावं. कारण त्या चौघांपैकी फक्त त्यालाच पोहता येत होतं.

ऑस्टिनही झटक्यात तयार झाला, पण किनारा किती दूर आहे, त्याचा खरा अंदाज ना त्याला होता, ना त्याच्या आईला. शिवाय अंगातल्या लाइफ जाकीटमुळे पोहणं त्याला आणखीच कठीण होत होतं. पोहणं सोपं जावं म्हणून शेवटी त्यानं अंगातलं लाइफ जॅकेटही काढून टाकलं.

आता त्याला केवळ स्वत:च्या ताकदीवरच किनाऱ्यावर पोहोचायचं होतं. आश्चर्याची गोष्ट म्हणजे आजपर्यंत सलगपणे ३५० मीटरपेक्षा जास्त तो कधीच पोहला नव्हता. तेही फक्त स्वीमिंग पूलवर. समुद्रात याआधी तो कधीच पोहला नव्हता, पण तरीही आज त्यानं हे धाडस केलं. कारण आता त्याच्या डोक्यात फक्त एकच विचार घोळत होता.. काहीही झालं तरी किनाऱ्यापर्यंत पोहोचायचं आणि मदत मिळवून आपल्या आईला आणि भावा-बहिणीला वाचवायचं!

तब्बल चार तास तो पोहत होता. अनेकदा अशी वेळ आली, त्याला वाटायचं, आता आपण पोहू शकत नाही. पुढे जाऊच शकत नाही, पण प्रत्येकवेळी त्याच्या डोळ्यासमोर त्याचं कुटुंब यायचं आणि तो पुन्हा हातपाय मारायला लागयचा..इकडे जोआनचीही घालमेल खूपच वाढली होती. आता मध्यरात्र झाली होती. समुद्रात खूप खोलवर ते वाहत आले होते.

लाइफ जॅकेटमुळे ते पाण्यावर तरंगत होते इतकंच आणि बुडत्याला काडीचा आधार म्हणून पॅडलबोर्ड त्यांनी पकडून ठेवलेला होता. थंडगार पाण्यात ते अक्षरश: कुडकुडले होते आणि भीतीनं अर्धमेले झाले होते. तरीही त्यांनी धीर सोडला नव्हता. आपल्या लहानग्या मुलाला आपण एकंटंच किनाऱ्याकडे पाठवलं याचीही आता तिला खूपच खंत वाटत होती. त्याचं काही बरंवाईट तर झालं नसेल या शंकेनं ती माता स्वत:लाच कोसत होती.

समुद्रात आता तब्बल १४ किलोमीटर दूर ते वाहत आले होते. ऑस्टिनही जीवाच्या आकांतानं पोहत असताना आपली आई आणि भावंडांचाच विचार करीत होता. त्याच्या अंगातली शक्ती संपत आली होती. आपण किनाऱ्यावर पोहोचू की नाही याची त्यालाही शंका वाटत नव्हती; पण अचानक पाण्यात त्याचा पाय जमिनीला लागला! त्याच अवस्थेत तो दोन किलोमीटर पळत गेला.

त्यांनी किनाऱ्यावर जिथे आपली बॅग ठेवली होती, तिथे तो पाेहोचला. त्यातून त्यानं आईचा मोबाइल काढला आणि रेस्क्यू टीमला फोन केला. त्यानंतर तो बेशुद्ध पडला..रेस्क्यू टीमनं रात्रीच्या अंधारात समुद्रात या कुटुंबाला शोधून काढलं, त्यावेळी पाण्यात पडून त्यांना दहा तास झाले होते.

आई आणि ऑस्टिनच्या भावंडांना वाटत होतं, ऑस्टिन आता या जगात नाही. ऑस्टिनलाही आपल्या कुटुंबाबाबत तेच वाटत होतं, पण त्यांची जेव्हा प्रत्यक्ष भेट झाली, तेव्हा कोणाच्याच डोळ्यांतले अश्रू थांबत नव्हते!...

















