आईचं स्वप्न साकार, संघर्षातून लेक बनली IAS; पण मुलीचं यश पाहण्याआधीच आईनं घेतला जगाचा निरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 31, 2025 13:28 IST2025-10-31T13:19:41+5:302025-10-31T13:28:26+5:30

मुलीनं काहीतरी वेगळं करावे, तिने समाजसेवा करून पुढे जावे हे एक स्वप्न आईने पाहिले. ते पूर्णही झाले परंतु त्याला उशीर झाला. एका अपघातात तो आनंद हिरावला जो मुलीला तिच्या आईच्या चेहऱ्यावर पाहायचा होता. डोळ्यात अश्रू घेऊन पुढे जाणे कठीण होते, परंतु आईचं स्वप्न पूर्ण करायचे होते.

कठीण संघर्षातून मुलीने यूपीएससी परीक्षा दिली. पहिल्या प्रयत्नात तिला यश मिळाले नाही, परंतु दुसऱ्या प्रयत्नात घवघवीत यश मिळवून ऑल इंडिया रँक १४ आणून ती टॉपर बनली. ही कहाणी आहे अंकिता चौधरी या तरुणीची...जिच्यावर दु:खाचा डोंगर कोसळला परंतु तिने पाऊल मागे घेतले नाही.

माहितीनुसार, अंकिता चौधरी हरियाणात राहणारी आहे. तिचं सुरुवातीचं शिक्षण रोहतकच्या इंडस पब्लिक स्कूलमध्ये झाले. शालेय शिक्षणात ती खूप मन लावून अभ्यास करत होती. त्यामुळे ती कायम वर्गात चांगले मार्क्स मिळवत होती. त्यानंतर पुढील शिक्षणासाठी ती दिल्लीला गेली.

अंकिताने तिच्या पदवीपूर्व शिक्षणासाठी दिल्ली विद्यापीठाच्या प्रतिष्ठित हिंदू कॉलेजमध्ये प्रवेश घेतला. तिथून तिने बीएससी पदवी मिळवली. त्यानंतर ती इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (आयआयटी) दिल्लीमध्ये गेली आणि एमएससी करू लागली. याच काळात तिने यूपीएससीची तयारी करण्याचा निर्णय घेतला.

अंकिताचे वडील शुगर मिलमध्ये अकाउंटंट म्हणून काम करतात. तिची आई शिक्षिका होती आणि तिला नेहमीच तिच्या मुलीने काहीतरी वेगळे करावे असे वाटत होते. समाजसेवा करत तिने पुढे जायला हवे, मात्र नशिबाच्या मनात वेगळेच होते. अंकिताच्या आईचे अपघातात निधन झाले. तिच्या मृत्यूनंतर अंकिताचे आयुष्य पूर्णपणे बदलले.

आईच्या निधनानंतरही अंकिताने हार मानली नाही. आईचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी ती पुढे प्रवास करत राहिली. डोळ्यात अश्रू आणत तिने तिचा अभ्यास सुरू ठेवला. या काळात तिला तिच्या वडिलांचा पाठिंबा होता. २०१७ मध्ये तिने पहिल्यांदाच यूपीएससी परीक्षा दिली पण ती नापास झाली. मात्र ती थांबली नाही, पुढे जात राहिली आणि दुसऱ्या वेळी तिने आणखी जास्त तयारी केली.

अंकिताने २०१८ मध्ये यूपीएससी परीक्षा दिली आणि देशात १४ वा क्रमांक मिळवला. तिच्या यशाने संपूर्ण कुटुंबाला अभिमान वाटला. निवड झाल्यानंतर तिला हरियाणा केडर मिळाला आणि ती आयएएस अधिकारी बनली. अंकिताची यशोगाथा अशा तरुणांसाठी प्रेरणादायी आहे जे कठीण परिस्थितीतही कधीही हार मानत नाहीत.

अंकिता सोशल मीडियावर सक्रिय आहेत, विशेषतः ट्विटरवर त्यांना अनेक जण फॉलो करतात, जिथे त्या यूपीएससीबाबत युवकांना प्रेरणा देतात. अंकिता यांचे जीवन एक प्रेरणादायी उदाहरण आहे, जे दृढनिश्चय आणि कठोर परिश्रमाचे महत्त्व दाखवते.

अपयश ही भीती नाही तर एक धडा देतो आणि जेव्हा तुम्ही हा धडा शिकता, तेव्हा यश तुमच्यामागे येते असं अंकिता सांगतात. आज त्या आयएएस अधिकारी आहेत आणि अनेक लोकांच्या आयुष्यात सकारात्मक बदल घडवत आहेत.

आयएएस अंकिता चौधरी सध्या गुरुग्राम महानगरपालिकेच्या अतिरिक्त आयुक्त म्हणून काम करतात. यापूर्वी त्यांनी सोनीपतमध्ये अतिरिक्त उपायुक्त (एडीसी) म्हणून काम केले होते, जिथे त्यांनी केलेले काम आजही कौतुकास्पद आहे.