बापरे! मंकीप़ॉक्सचा धोका अजून टळलेला नाही; आताही आहे चिंतेचाच विषय, WHO चा गंभीर इशारा

By ऑनलाइन लोकमत | Published: November 2, 2022 04:47 PM2022-11-02T16:47:52+5:302022-11-02T16:55:53+5:30

Monkeypox : जग कोरोनाच्या संकटाचा सामना करत असतानाच आता मंकीपॉक्सने जगाचं टेन्शन वाढवलं आहे. मंकीपॉक्सच्या रुग्णांची संख्या देखील दिवसेंदिवस वाढत आहे.

कोरोनाने संपूर्ण जगाला विळखा घातला आहे. अनेक देशांमध्ये गंभीर परिस्थिती निर्माण झाली असून लाखो लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. जग कोरोनाच्या संकटाचा सामना करत असतानाच आता मंकीपॉक्सने जगाचं टेन्शन वाढवलं आहे. मंकीपॉक्सच्या रुग्णांची संख्या देखील दिवसेंदिवस वाढत आहे.

मंकीपॉक्स व्हायरसच्या उद्रेकाने संपूर्ण जग चिंतेत आहे. जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) मंगळवारी दिलेल्या माहितीनुसार, त्यांच्या आपत्कालीन समितीने ठरवले आहे की मंकीपॉक्सला जागतिक आरोग्य आणीबाणी म्हणून वर्गीकृत केले जावे. कारण तो सार्वजनिक आरोग्यासाठी चिंतेची बाब आहे.

वृत्तसंस्था एफपीच्या रिपोर्टनुसार, डब्ल्यूएचओने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, आपत्कालीन समितीने हे ओळखले आहे की 20 ऑक्टोबर रोजी झालेल्या शेवटच्या बैठकीपासून अनेक देशांमध्ये मंकीपॉक्सच्या उद्रेकात वाढ झाली आहे. याआधी घट झालेली पाहायला मिळाली होती.

WHO च्या आपत्कालीन समितीने यावर जोर दिला की जर व्हायरस लोकांमध्ये अधिक पसरू लागला तर त्याल थांबवणे कठीण होऊ शकते. मंकीपॉक्स उद्रेकाच्या संदर्भात गुरुवारी आयएचआर आपत्कालीन समितीची तिसरी बैठक झाल्यानंतर हे विधान आले आहे. तिसरी बैठक व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे बोलावण्यात आली होती.

ज्यामध्ये 15 सदस्यांपैकी 11 सदस्य आणि समितीच्या नऊपैकी सहा सल्लागार बैठकीला उपस्थित होते. डब्ल्यूएचओचे महासंचालक टेड्रोस अधानोम गेब्रेयसस यांनी त्यांच्या सुरुवातीच्या भाषणात समितीचे स्वागत केले. काही ठिकाणी रुग्णसंख्येत घट होत आहे तर काही ठिकाणी वाढ असं म्हटलं आहे.

WHO च्या मोजणीनुसार, मंकीपॉक्स अचानक सहा महिन्यांपूर्वी पश्चिम आफ्रिकन देशांतून पसरू लागला. 109 देशांमध्ये 77,000 हून अधिक प्रकरणांपैकी 36 लोकांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे मंकीपॉक्सचा कहर संपलेला नसून तो आता देखील चिंतेचाच विषय आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.

मंकीपॉक्सच्या लक्षणांपैकी सर्वांत महत्त्वाचं लक्षण म्हणजे, शरीरावर चिकनपॉक्सप्रमाणे फोड दिसून येणं. मंकीपॉक्स झाल्यानंतर वेगाने बरं होण्यासाठी रोगप्रतिकारक शक्ती चांगली असणं गरजेचं आहे. मंकीपॉक्सची वाढती प्रकरणे लक्षात घेता लोकांना सावधगिरी बाळगण्याचा सल्ला देणारी मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत.

विशेषतः लहान मुले आणि गर्भवती महिलांना त्याचा जास्त धोका असल्याने त्यांनी आरोग्याकडे विशेष लक्ष द्यावे. तज्ज्ञांच्या मते, रोगप्रतिकारशक्ती कमकुवत असल्यास मंकीपॉक्सचा धोका वाढतो. मुले आणि गर्भवती महिलांची प्रतिकारशक्ती कमकुवत असते. लहान मुलांना याचा जास्त धोका असतो.

गर्भवती महिलांनाही मंकीपॉक्सची लागण होऊ शकते, असे एका संशोधनातून समोर आले आहे. हे संशोधन काँगोमध्ये करण्यात आले होते, ज्यामध्ये 216 महिलांचा समावेश होता. या संशोधनात सहभागी 5 पैकी 4महिलांचा गर्भपात झाला होता. त्याच वेळी, गर्भात वाढणाऱ्या मुलांमध्येही मंकीपॉक्सची लक्षणे आढळून आली.

महिलांनी आपल्या आरोग्याकडे विशेष लक्ष दिले पाहिजे. संक्रमित व्यक्तीसोबत शारीरिक संबंध ठेवतानाही हा आजार हेाऊ शकतो. यासाठी बाधित व्यक्तीपासून सुरक्षित अंतर ठेवणे कधीही चांगले. स्वतःला लक्षणे आढळल्यास डॉक्टरांशी संपर्क साधून आजाराबाबत खात्री करून घ्यावी.

रोगप्रतिकारक शक्ती मजबूत ठेवण्यासाठी ताजी फळे आणि भाज्या खा. रोज हळदीचे दूध प्या. अन्नपदार्थ शेअर करू नका. तसेच, ब्रश, टूथपेस्ट, टॉवेल इत्यादी गोष्टी शेअर करू नका. संक्रमित व्यक्तीपासून अंतर ठेवा.

सर्दी, खोकला आणि मंकीपॉक्सची लक्षणे दिसल्यास त्या व्यक्तीपासून लगेच वेगळे राहणेच जास्त चांगले. घराबाहेर पडताना मास्क लावा. याच्या मदतीने तुम्ही कोरोना व्हायरसचाही संसर्गही टाळू शकता. (टिप- ही माहिती आम्ही केवळ वाचक म्हणून आपल्यापर्यंत पोहोचवत आहोत. प्रत्येकाची शारीरिक स्थिती वेगळी असल्यानं कोणताही उपाय करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला जरूर घ्यावा.)