CoronaVirus News: 'तो' परत आलाय! दुसऱ्या लाटेत धोकादायक ठरलेला आजार परतला; मुंबईत पहिला रुग्ण सापडला

By ऑनलाइन लोकमत | Published: January 28, 2022 08:56 AM2022-01-28T08:56:44+5:302022-01-28T09:00:27+5:30

CoronaVirus News: कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत अनेक मृत्यूंना कारणीभूत ठरलेला आजार परतला

देशात आलेली कोरोनाची तिसरी लाट कायम आहे. गेल्या काही दिवसांपासून देशात दररोज २ लाखांहून अधिक रुग्णांची नोंद होत आहे. त्यामुळे धोका कायम आहे. कोरोनाची तिसरी लाट कायम असताना दुसऱ्या लाटेत धोकादायक ठरलेला आजार परतला आहे.

कोरोनाच्या ओमायक्रॉन व्हेरिएंटनं धुमाकूळ घातला असताना म्युकरमायकोसिसचा (ब्लॅक फंगस) धोका वाढला आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत म्युकरमायकोसिसनं अनेकांचा बळी घेतला होता. म्युकरमायकोसिसमुळे अंधत्व येण्याचा, अवयव निकामी होण्याचा, उतीचं नुकसान होण्याचा धोका असतो.

म्युकरमायकोसिस झालेल्या रुग्णाला वेळेत उपचार न मिळाल्यास त्याचा मृत्यूदेखील होऊ शकतो. म्युकरमायकोसिस नाक, फुफ्फुसांवर हल्ला करतो. डेल्टा व्हेरिएंटमुळे देशात कोरोनाची दुसरी लाट आली. त्यावेळी मधुमेहाचा त्रास असलेल्या आणि बऱ्याच कालावधीपासून स्टेरॉईडवर असणाऱ्या कोरोना रुग्णांना ब्लॅक फंगसची लागण झाली होती.

रोगप्रतिकारशक्ती कमी असलेल्या, ट्रान्सप्लांट झालेल्या आणि बऱ्याच कालावधीपासून व्हेंटिलेटरवर असलेल्यांना म्युकरमायकोसिस अधिक धोका होता. दुसऱ्या लाटेत अनेकांच्या मृत्यूचं कारण ठरलेल्या म्युकरमायकोसिसचा धोका पुन्हा वाढला आहे. मुंबईत म्युकरमायकोसिसचा पहिला रुग्ण सापडला आहे.

मुंबईतील एका ७० वर्षीय वृद्धाला म्युकरमायकोसिसची लागण झाली आहे. ५ जानेवारीला या व्यक्तीला कोरोनाची लागण झाली. त्यानंतर १२ जानेवारीला त्याच्या शरीरात म्युकरमायकोसिसची लक्षणं दिसून आली. त्यानंतर त्याच्यावर वॉकहार्ट रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

रुग्णाला उपचारांसाठी दाखल करण्यात आलं त्यावेळी त्याच्या शरीरातील साखरेचं प्रमाण ५३२ वर पोहोचलं होतं. त्यामुळे तातडीनं डायबेटिक किटोएसिडोसिस उपचार सुरू करण्यात आले. रुग्णानं १० दिवस डायबेटिसची औषधं घेतली नव्हती अशी माहिती त्याच्या कुटुंबियांन दिली.

म्युकरमायकोसिसची लागण झाल्याचं समजल्यानंतर रुग्णावर डिब्रीडिमेंट शस्त्रक्रिया करण्यात आली. त्याच्या उती तपासणीसाठी पाठवण्यात आल्या. रुग्णाची प्रकृती आता स्थिर आहे, अशी माहिती वॉकहार्ट रुग्णालयातील डॉ. हनी सावला यांनी दिली.

म्युकरमायकोसिसचा धोका अद्याप तरी मोठ्या प्रमाणावर दिसून आलेला नाही, असं सावला म्हणाले. तिसऱ्या लाटेत म्युकरमायकोसिसचे रुग्ण वाढतील का, यावर आता भाष्य करणं धाडसाचं ठरेल, असं मुंबईतील मसीना रुग्णालयातील संसर्गजन्य आजार तज्ज्ञ डॉ. तृप्ती गिलाडा यांनी सांगितलं.

म्युकरमायकोसिसची लक्षणं कोणती? नाक बंद होणं किंवा नाक गळणं, गालाच्या हाडात वेदना होणं, चेहऱ्याचा एक भाग दुखणं, सूज, नाकाकडील भाग काळा पडणं, दात हलू लागणं, थ्रोम्बोसिस, नक्रोसिस, त्वचेवर घाव, छातीत दुखणं आणि श्वासोच्छवासावेळी त्रास.