ओमायक्रॉनचा तरुणांना जास्त धोका; तज्ज्ञांचा गंभीर इशारा

By ऑनलाइन लोकमत | Published: December 2, 2021 05:50 PM2021-12-02T17:50:57+5:302021-12-02T17:58:35+5:30

Corona Variant Omicron : तज्ज्ञांनी असाही इशारा दिला आहे की, ओमायक्रोनमुळे फक्त सौम्य आजार येईल, असे म्हणणे थोडे घाईचे ठरू शकते.

जोहान्सबर्ग : कोरोनाच्या ओमायक्रॉन या नव्या व्हेरिएंटमुळे जगभरात भीतीचे वातावरण तयार झाले आहे. 20 हून अधिक देशांमध्ये ओमायक्रॉन व्हेरिएंटचे रुग्ण असल्याची पुष्टी झाली आहे.

या नवीन व्हेरिएंटबाबत दक्षिण आफ्रिकेचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, ओमायक्रॉन किती प्राणघातक आहे आणि त्याचा लोकांवर काय परिणाम होईल? हे तूर्तास सांगणे कठीण आहे. पण, कोरोनाच्या नवीन व्हेरिएंटतचा आतापर्यंत बहुतांश तरुणांवर परिणाम झाला आहे.

याचबरोबर, तज्ज्ञांनी असाही इशारा दिला आहे की, ओमायक्रोनमुळे फक्त सौम्य आजार येईल, असे म्हणणे थोडे घाईचे ठरू शकते. याबाबत अधिक माहिती गोळा करत आहोत, असे तज्ज्ञांनी म्हटले आहे.

दोन ते तीन आठवड्यांनंतरच याबद्दल अधिक माहिती मिळेल. काही रुग्णांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहेत. ते सर्व तरुण आहेत, ज्यांचे वय 40 किंवा त्यापेक्षा कमी आहे, असेही दक्षिण आफ्रिकेच्या तज्ज्ञांनी सांगितले.

दुसरीकडे, नॅशनल इन्स्टिट्यूट फॉर कम्युनिकेबल डिसीजेसमधील (NICD) सार्वजनिक आरोग्य देखरेख आणि प्रतिसाद प्रमुख मिशेल ग्रोम यांनी सांगितले की, कोरोना व्हायरसच्या नवीन व्हेरिएंटमुळे जास्तकरून तरूणांचा मृत्यू झाला आहे. परंतु आम्ही वृद्ध वयोगटांमध्येही याची तपासणी करण्यास सुरुवात केली आहे.

यापूर्वी नॅशनल इन्स्टिट्यूट फॉर कम्युनिकेबल डिसीजेसने सांगितले होते की, दक्षिण आफ्रिकेतील नवीन व्हेरिएंटची संख्या गेल्या 24 तासांत जवळपास दुप्पट होऊन 8,561 झाली आहे. ओमायक्रॉन हा आतापर्यंत देशातील मुख्य स्ट्रेन आहे.

दक्षिण आफ्रिकेचे सरकार आणि तज्ज्ञांनी 25 नोव्हेंबरला कोरोनाचा नवीन व्हेरिएंट आढळल्याचे जाहीर केले. यानंतर जागतिक आरोग्य संघटनेने या व्हेरिएंटचे ओमायक्रान असे ठेवले.

हा नवीन व्हेरिएंट आढळल्यानंतर,अमेरिका, युरोपियन संघ, कॅनडा, इस्रायल, ऑस्ट्रेलिया आणि इतर देशांनी अनेक दक्षिण आफ्रिकन देशांच्या प्रवासावर बंदी घातली आहे. तसेच, काही देशांनी दक्षिण आफ्रिकेतून येणाऱ्या विमानांवर बंदी घातली आहे.