महिलांपेक्षा पुरुषांना हृदयविकाराचा जास्त धोका; याबाबत डॉक्टर काय सांगतात...
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 5, 2025 11:54 IST2025-09-05T11:49:44+5:302025-09-05T11:54:18+5:30
Heart Attack Risk: महिलांपेक्षा पुरुषांना हृदयविकाराचा झटका येण्याचे कारण काय? जाणून घ्या...

Heart Attack Risk: अनेक संशोधनांमधून असे दिसून आले आहे की, महिलांपेक्षा पुरुषांना हृदयविकाराचा झटका येण्याची शक्यता जास्त असते. याचे कारण केवळ जीवनशैलीच नाही, तर हार्मोनल फरक, ताण आणि दैनंदिन आहारदेखील आहे. यावर डॉक्टरांचे मत देखील अगदी स्पष्ट आहे.
एबीपी न्यूजच्या वृत्तानुसार, डॉ. शालिनी सिंह सांगतात की, पुरुषांना हृदयविकाराचा झटका येण्याची शक्यता जास्त असते, कारण त्यांच्या शरीरात इस्ट्रोजेन हार्मोनची पातळी नसते. हा हार्मोन महिलांमध्ये आढळतो, जो काही प्रमाणात हृदयरोगापासून त्यांचे संरक्षण करतो. हेच कारण आहे की, ४५ वर्षांनंतर महिलांमध्ये हार्मोनल बदल होतात, तेव्हा त्यांना हृदयविकाराच्या समस्या वाढू लागतात. याउलट पुरुषांमध्ये कमी वयातदेखील हृदयविकाराच्या समस्या जाणवू शकतात.
पुरुषांची जीवनशैली अनेकदा अधिक तणावपूर्ण असते. नोकरीचा दबाव, आर्थिक जबाबदाऱ्या आणि कमी झोपेचा हृदयावर थेट परिणाम होतो. अनेक अभ्यासातून असे आढळून आले आहे की, पुरुषांमध्ये उच्च रक्तदाब, मधुमेह आणि कोलेस्टेरॉलची समस्या लवकर विकसित होते, ज्यामुळे हृदयविकाराचा धोका वाढतो.
डॉक्टरांचे म्हणणे आहे की, पुरुषांमध्ये महिलांपेक्षा धूम्रपान आणि मद्यपानाची सवय जास्त असते. हे दोन्ही घटक हृदयाच्या धमन्या कमकुवत करतात आणि ब्लॉकेजचा धोका वाढवतात. म्हणूनच पुरुषांना लहान वयातच हृदयविकाराचा झटका येऊ शकतो.
आजकाल फास्ट फूड आणि अनियमित आहार, हे पुरुषांमध्ये जास्त प्रमाणात आढळतात. तेलकट अन्न खाल्ल्याने वजन झपाट्याने वाढते, ज्यामुळे लठ्ठपणा येतो. लठ्ठपणा हा हृदयरोगाचे एक प्रमुख कारण मानला जातो. डॉक्टर म्हणतात की, निरोगी आहार आणि नियमित व्यायामाने हृदयाचे आरोग्य चांगले राखता येते.
पुरुषांनी वेळोवेळी त्यांची तपासणी करत राहावी. तसेच, धूम्रपानापासून दूर राहणे, संतुलित आहार, योग आणि ध्यान यासारख्या सवयी लावून हृदयरोग टाळता येतात. पुरुषांमध्ये हृदयविकाराचा धोका महिलांपेक्षा जास्त असतो, परंतु चांगली जीवनशैली राखून आणि वेळेवर तपासणी करून हा धोका बऱ्याच प्रमाणात कमी करता येतो.