थकवा, अशक्त्तपणा, हातापायाला मुंग्या येतात... ही लक्षणे तुम्हालाही जाणवतात? आजच करा तपासणी
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 28, 2024 17:37 IST2024-05-28T17:27:00+5:302024-05-28T17:37:16+5:30
शरीर निरोगी राहावे म्हणून अनेक प्रकारची जीवनसत्त्वे, खनिजे, प्रथिने, फायबर आणि कार्ब्स इत्यादींची गरज भासते.

बहुतेक पोषक तत्त्वे सहसा अन्न आणि पेयातून मिळत असतात. परंतु व्हिटॅमिन बी १२ हे जीवनसत्त्व सहसा शाकाहारी अन्नपदार्थांमध्ये नसते. वाढत्या वयात त्याची कमतरता निर्माण होते. त्यामुळे त्याची तपासणी योग्य वेळेत व्हायला हवी.
काय काळजी घ्याल?
नियमित आहारात बदल करावा, नेहमी पूरक आहार घेणं तसेच नियमितपणे तपासणी व चाचणी करावी त्याचबरोबर परिणामाबद्दल जागरूकता वाढवावी. सगळ्यात महत्वाचं म्हणजे डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.
व्हिटॅमिन बी १२ आवश्यक का भासते?
शरीरातील लाल रक्तपेशींच्या निर्मितीमध्ये आणि मज्जासंस्था निरोगी बनवण्यासाठी व्हिटॅमिन बी १२ विशेष भूमिका बजावते.
हे मानसिक आरोग्यासाठी अत्यंत उपयुक्त मानले जाते. मेंदूचे नुकसान आणि अल्झायमरसारख्या आजारांपासून संरक्षण करण्यासाठी व्हिटॅमिन बी १२ उपयुक्त असते. यामुळे तणाव कमी होतो, म्हणून या जीवनसत्त्वाला तणाव विरोधी जीवनसत्त्व असेही म्हणतात.
तपासणी कधी करावी?
वृद्ध व्यक्त्ती, गॅस्ट्रोइंटेस्टीइनल विकार असलेल्या व्यक्ती किंवा बी १२ शोषणावर परिणाम करणारी दीर्घकालीन औषधे घेणाऱ्या व्यक्तींना व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेचा धोका आहे का, हे जाणून घेण्यासाठी नियमित तपासणी करण्याचा सल्ला डॉक्टर अथवा आहारतज्ज्ञ देतात, जेणेकरून वेळेवर चाचणी करून लवकर निदान झाल्यास आणि योग्य वेळी उपचार घेता येतील.
लक्षणे कोणती?
व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेमुळे थकवा, अशक्त्तपणा, सुन्नपणा वाटणे, हातापायाला मुंग्या येणे आणि गोष्टी लक्षात न राहणे, लक्ष केंद्रित न होणे यासारखी लक्षणे दिसतात.
अशी लक्षणे वाढत्या वयाबरोबर पाहावयास मिळतात. त्यामुळेच त्याकडे दुर्लक्ष होते आणि निदान पटकन न झाल्यास उपचारास विलंब होतो.
कशी पूर्ण होईल कमतरता:
व्हिटॅमिन बी १२ मासे, चिकन, अंडी आणि कोळंबीमध्ये आढळते. जर तुम्ही मांसाहारी असाल तर या गोष्टी खा. शाकाहारी लोक काही प्रमाणात दही, ओटमील, सोयाबीन, ब्रोकोली आणि टोफू खाऊन ही कमतरता भरून काढू शकतात. या व्यतिरिक्त, एक चांगला पर्याय म्हणजे शाकाहारी तज्ज्ञांच्या सल्ल्याने व्हिटॅमिन बी १२ पूरक आहार घेतला पाहिजे.