Corona Virus News: कोरोना बद्दलचा मोठा गैरसमज वैज्ञानिकांनी केला दूर; 'हे' नक्की वाचा...

By ऑनलाइन लोकमत | Published: January 12, 2022 11:08 PM2022-01-12T23:08:57+5:302022-01-12T23:13:06+5:30

कोरोना व्हायरसचा जगात उद्रेक होऊन आता दोन वर्षाहून अधिक काळ लोटला आहे. गेल्या दोन वर्षात वैज्ञानिकांनी कोरोना विषाणूबाबत खूप अभ्यास केला आहे आणि यातून बरीच महत्त्वाची माहिती देखील समोर आली आहे. यातच आता कोरोना विषाणू बाबत अतिशय महत्त्वाची माहिती वैज्ञानिकांनी दिली आहे.

ब्रिटनच्या युनिव्हर्सिटी ऑफ ब्रिस्टेलच्या वैज्ञानिकांनी केलेल्या एका अभ्यासातून समोर आलेल्या माहितीनुसार कोरोना विषाणू हवेत २० मिनिटांपेक्षा अधिक काळ राहिल्यानंतर त्याची संक्रमण क्षमता ९० टक्क्यांपर्यंत कमी होते.

ब्रिटनच्या ब्रिस्टल युनिव्हर्सिटीच्या वैज्ञानिकांनी 'The Dynamics of SARS-CoV-2 Infectivity with Changes in Aerosol Microenvironment' नावानं एक अभ्यास अहवाल प्रसिद्ध केला आहे. यात कोरोना विषाणूची संक्रमण क्षमता किती वेळानं कमी होते याचा अभ्यास करण्यात आला आहे.

कोरोना विषाणूच्या संक्रमणात हवेतील आर्देता खूप मोठी भूमिका बजावते. जर हवा कोरडी असेल तर कोरोना विषाणूची संक्रमण क्षमता लवकर कमी होते. तर हवेत ओलावा असेल तर विषाणूची संक्रमण क्षमता अधिक काळ असते असं निष्पन्न झालं आहे.

दिल्लीस्थित बीएलके मॅक्स रुग्णालयाच्या आरोग्य विभागाचे संचालक डॉ. संदीप नायर यांनी केलेल्या दाव्यानुसार कोरोना विषाणू जेव्हा फुफ्फुसांमध्ये असतो तेव्हा विषाणूला ओलावा मिळतो. पण जेव्हा ड्रॉपलेटच्या रुपात तो बाहेर येतो तेव्हा कोरड्या वातावरणामुळे त्याची संक्रमण क्षमता कमी होते.

डॉ. नायर यांच्या दाव्यानुसार गेल्या दोन वर्षात कोरोना रुग्णांवर उपचार करत असताना त्यांना एक गोष्ट लक्षात आली आहे. एखादा व्यक्ती कोरोना संसर्ग झालेल्या व्यक्तीच्या संपर्कात सुरुवातीचे काही दिवस राहिला असेल तर त्यालाही संसर्ग होण्याची शक्यता अधिक असते. पण कोरोना रुग्णाला संसर्ग होऊन बरेच दिवस झाले असतील आणि त्यावेळी रुग्णाच्या संपर्कात आलेल्यांना संसर्गाची शक्यता फार कमी असते.

ब्रिस्टल विद्यापीठातील वैज्ञानिकांनी आपल्या अभ्यास असं देखील नमूद केलं आहे की, ज्या ठिकाणी कोरडं वातावरण असतं अशा खोल्यांमध्ये संक्रमण क्षमता अगदी ५ सेकंदात ५० टक्क्यांनी कमी होते. अर्थात क्षमता कमी झाली असली धोका मात्र कायम असतो. ५ मिनिटांनंतर संक्रमण क्षमता १९ टक्क्यांपर्यंत कमी होते. जास्त तापमानात विषाणूचा प्रसार जास्त होत नाही ही शक्यता देखील वैज्ञानिकांनी फेटाळून लावली आहे. तापमानाचा विषाणूवर कोणताही परिणाम होत नाही.

दिल्लीस्थित आकाश रुग्णालयाचे श्वासरोग तज्ज्ञ डॉ. आकाश बुद्धिराजा यांनी दिलेल्या माहितीनुसार ब्रिस्टल विद्यापीठाच्या वैज्ञानिकांच्या रिसर्चमधून दोन प्रमुख मुद्दे उपस्थित होतात. पहिलं म्हणजे मास्क आणि सोशल डिस्टन्सिंग हे आजही कोरोनावर सर्वोत्तम उपाय आहेत. लोक घराबाहेर, ऑफिसात जितकं अधिकवेळ मास्कचा वापर करतील, सोशल डिस्टन्सिंगचं पालन करतील तितकं ते सुरक्षित राहतील.

ब्रिटनच्या ब्रिस्टल विद्यापीठाच्या वैज्ञानिकांनी हा अभ्यास कोरोनाच्या तीन व्हेरिअंटवर केला आहे. यात अल्फा व्हेरिअंटचा देखील समावेश आहे. सध्या जगभरात धुमाकूळ घालत असलेला ओमायक्रॉन व्हेरिअंट देखील त्याच पठडीतला आहे की नाही हे येणाऱ्या दिवसात कळून येईल. तोवर मास्क आणि सोशल डिस्टन्सिंगचं पालन करणं अतिशय महत्त्वाचं आहे, असं डॉक्टर म्हणाले.