भाजपचे २० ते २५ आमदार फोडण्याचे उद्धव ठाकरे यांचे कारस्थान होते; एकनाथ शिंदे यांचा गौप्यस्फोट

By ऑनलाइन लोकमत | Published: May 7, 2024 06:52 AM2024-05-07T06:52:35+5:302024-05-07T06:53:02+5:30

Eknath Shinde vs Uddhav Thackeray Shivsena: मलाही एका गुन्ह्यात तुरुंगात टाकणार होते. मी हरिश्चंद्र असलो, तरी मी एकदा ठरवले तर करेक्ट कार्यक्रम करतो. - एकनाथ शिंदे

Uddhav Thackeray had a conspiracy to break 20 to 25 BJP MLAs; Eknath Shinde's secret explosion | भाजपचे २० ते २५ आमदार फोडण्याचे उद्धव ठाकरे यांचे कारस्थान होते; एकनाथ शिंदे यांचा गौप्यस्फोट

भाजपचे २० ते २५ आमदार फोडण्याचे उद्धव ठाकरे यांचे कारस्थान होते; एकनाथ शिंदे यांचा गौप्यस्फोट

लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : देवेंद्र फडणवीस यांना तुरुंगामध्ये टाकून भाजपचे २० ते २५ आमदार फोडायचे पूर्ण प्लानिंग उद्धव ठाकरे यांनी केले होते, असा गौप्यस्फोट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सोमवारी केला. त्यांचे प्लानिंग यशस्वी झाले असते, तर मला माझी खेळी खेळता आली नसती. त्यामुळे ठाकरेंचा प्लान अंमलात येण्यापूर्वी मीच त्यांचा करेक्ट कार्यक्रम केल्याची माहिती शिंदे यांनी दिली. 

ठाणे लोकसभा मतदारसंघातील शिंदेसेनेचे उमेदवार नरेश म्हस्के यांच्या प्रचारासाठी महायुतीची बैठक आयोजित केली होती. त्यावेळी मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, भाजपच्या लोकांना आत घालून मलाही संपविण्याचे कटकारस्थान सुरू होते. एका गुन्ह्यात माझे खोटे नाव गोवण्याचे काम सुरू होते. उद्धव यांना धनुष्यबाण, बाळासाहेबांचे विचार नको असून, त्यांना केवळ पैसाच हवा आहे, असा टोलाही त्यांनी लगावला. 

मी हरिश्चंद्र असलो, तरी मी एकदा ठरवले तर करेक्ट कार्यक्रम करतो. खरी शिवसेना आमचीच आहे, त्यांच्याकडे ना नेता, ना झेंडा, ना अजेंडा आहे; आमच्याकडे विकासाचा अंजेडा असल्याचे त्यांनी सांगितले. मी जिथे बसतो तिथे त्यांचा बाजार उठवून टाकतो, असा इशाराही त्यांनी दिला. ठाण्यातील महायुतीच्या बैठकीला माजी मंत्री गणेश नाईक व त्यांचे पुत्र माजी खासदार संजीव नाईक गैरहजर होते. भाजपच्या आ. मंदा म्हात्रे या हजर होत्या. संजीव नाईक हे भाजपच्या वतीने ठाण्यातून निवडणूक लढवण्यास इच्छुक होते.

दिघेंची लोकप्रियता ठाकरेंना सलत होती
 शिवसेनेचे दिवंगत नेते आनंद दिघे यांची वाढती प्रसिद्धी उद्धव ठाकरे यांच्या नजरेत खुपत होती. त्यामुळे दिघे यांचे जिल्हाप्रमुख काढण्याचे कारस्थान आखण्यात आले होते, त्यांच्या जागी पर्यायी व्यक्तीची नियुक्ती करण्यात येणार होती, असा गौप्यस्फोटही मुख्यमंत्री शिंदे यांनी केला. 
 ‘धर्मवीर’ चित्रपटात आधी काही गोष्टी खऱ्या दाखविल्या नव्हत्या; परंतु आता पुढच्या भागात सगळे खरे दाखविणार, असेही ते म्हणाले. शिंदे म्हणाले की, दिघेंना ‘मातोश्री’ने मानसिक त्रास दिला. 
  दिघे इस्पितळात असताना त्यांना पद सोडण्याचा निरोप दिल्याने ते बेचैन झाले होते; परंतु दिघे यांनी पद आणि जिल्हा सोडला तर आपल्यासोबत एकही 
माणूस राहणार नाही, असे अनेकांनी ‘मातोश्री’ला सांगितले. त्यानंतर ‘मातोश्री’ने निर्णय मागे घेतला. 
  दिघे यांनी शिवसेनेचे मुख्य नेते म्हणून राज ठाकरे यांचे नाव पुढे केले होते; परंतु त्याची दखल घेतली नाही, असेही शिंदे म्हणाले.

आता फोन बंद ठेवायचा नाही
खासदार झाल्यावर नगरसेवक, आमदार यांच्या कोणत्याही कामात आडकाठी करायची नाही. महापालिकेत लक्ष घालायचे नाही, खासदार होऊन दिल्लीत काम करायचे, खासदार झाल्यावर फोन बंद ठेवायचा नाही. आता बदलणार नाही, तर बदलावे लागले, अशा सूचनाही मुख्यमंत्री शिंदे यांनी म्हस्के यांना दिल्या.


दिघे यांच्या नावाला 
केला विरोध : म्हस्के
राजन विचारे हा माणूस दिघे यांचा झाला नाही तर तो आपला कसा काय होणार, अशा शब्दांत ठाणे लोकसभेचे उमेदवार नरेश म्हस्के यांनी विचारे यांच्यावर टीका केली. दिघे यांचा नवरात्र उत्सव, हंडी सुरू असतानाही टेंभी नाक्यापासून हाकेच्या अंतरावर विचारे यांनी देवी आणि हंडी उत्सव सुरू केला. दिघे यांचे नाव ट्रस्टला देण्यास, तसेच हिरानंदानी मेडोज येथील नाट्यगृहाला देण्यास उद्धव ठाकरे यांनी विरोध केल्याचा दावा म्हस्के यांनी केला.
विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी २६/११ हल्ल्यातील शहीद पोलिस आणि मृत्युमुखी निष्पाप मुंबईकरांबाबत केलेले वक्तव्य प्रचंड चीड आणि संताप आणणारे आहे, अशी टीका शिंदे यांनी केली. ‘भारत जोडो’ नाही ‘भारत तोडो’ यात्रा करणाऱ्या राहुल गांधींच्या नादाला लागून विजय वडेट्टीवार वेडे झाले आहेत, अशी टीका त्यांनी केली.

Web Title: Uddhav Thackeray had a conspiracy to break 20 to 25 BJP MLAs; Eknath Shinde's secret explosion

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.