आपल्याला टोचली जाणारी कोरोना लस खरी आहे की खोटी, कसं ओळखायचं? खुद्द सरकारनंच सांगितलं

By ऑनलाइन लोकमत | Published: September 5, 2021 03:07 PM2021-09-05T15:07:39+5:302021-09-05T15:20:17+5:30

यासंदर्भात, केंद्र सरकारने शनिवारी सर्व राज्यांना पत्र लिहिले आहे. या पत्रात कोव्हॅसीन, कोविशील्ड आणि स्पुतनिक-व्ही लसींशी संबंधित सर्व माहिती देण्यात आली आहे... (covaxin, covishield and sputnik-v )

कोरनाने जगभरात थैमान घातले आहे. कोरोनाचा सामना करण्यासाठी जगभरात मोठ्या प्रमाणावर लसीकरण अभियान सुरू आहे. मात्र, यातच अनेक ठिकाणी बनावट लस दिली जात असल्याच्या बातम्याही आल्या. आंतरराष्ट्रीय बाजारातही बनावट लसींच्या धंद्याचा खुलासा झाला. अलीकडेच, आग्नेय आशिया आणि आफ्रिकेत बनावट कोविडशील्डच्या लसी सापडल्या. (covaxin covishield and sputnik-v centre government tells states how to identify fake vaccines)

यानंतर जागतिक आरोग्य संघटनेने बनावट लसींपासून सावध राहण्याचा इशाराही दिला होता. याच संदर्भात आता केंद्र सरकारने राज्यांना, असे अनेक स्टॅंडर्ड्स (मानके) सांगितली आहेत, ज्याच्या आधारे आपल्याला दिली जात असलेली लस खरी आहे की बनावट हे समजू शकेल.

केंद्र सरकारने शनिवारी सर्व राज्यांना यासंदर्भात पत्र लिहिले आहे. एनडीटीव्हीच्या वृत्तानुसार, या पत्रात कोव्हॅसीन, कोविशील्ड आणि स्पुतनिक-व्ही लसींशी संबंधित सर्व माहिती देण्यात आली आहे. यामुळे या लसी खऱ्या आहेत की बनावट, हे समजू सकेल. सध्या या तीन लसींसह देशभरात लसीकरण मोहीम राबविली जात आहे.

खरी लस ओळखता यावी, यासाठी केंद्राने सर्व आवश्यक माहिती राज्यांना दिली आहे. यावरून, लस पाहताच ती खरी आहे, की बनावट हे ओळखता येईल. लस खरी आहे, की बनावट हे ओळखण्यासाठी कोविशील्ड, कोव्हॅक्सिन आणि स्पूतनिक-व्ही, या तिन्ही लसींवरील लेबल, त्यांचा कलर, ब्रँडचे नाव यासंदर्भात संपूर्ण माहिती देण्यात आली आहे.

कोविशील्ड (COVISHIELD)- 1. SII चे प्रोडक्ट लेबल, लेबलचा रंग गडद हिरवा असेल. 2. ब्रँडचे नाव ट्रेड मार्कसह 3. जेनेरिक नावाचा टेक्स्ट फॉन्ट बोल्ड अक्षरांत नसेल. 4. यावर CGS NOT FOR SALE असे ओव्हरप्रिंट असेल.

कोव्हॅक्सीन (COVAXIN) - 1. लेबलवर अदृश्य UV हेलिक्स असेल, हे केवळ UV प्रकाशातच दिसू शकते. 2. लेबल क्लेम डॉट्समध्ये छोट्या अक्षरात लपलेला मजकूर असेल, यात COVAXIN असे लिहिलेले आहे. 3. कोव्हॅक्सिनमध्ये 'X' दोन रंगांमध्ये असेल. याला ग्रीन फॉयल इफेक्ट असे म्हटले जाते.

स्पूतनिक-व्ही (sputnik-v) - 1. स्पुतनिक-व्ही लस रशियातील दोन वेगवेगळ्या प्लांट्समधून आयात करण्यात आल्या आहेत. यामुळे त्या दोघांनाही थोडे वेगळे लेबल आहेत. तथापि, सर्व तपशील आणि डिझाइन सारखेच आहे. केवळ मॅन्युफेक्चररचे नावच वेगळे आहे. 2. आतापर्यंत आयात केलेल्या सर्व लसींपैकी केवळ 5 एम्प्युल पॅकेट्सवर इंग्रजीमध्ये लेबल लिहिलेले आहे. याशिवाय, उर्वरित पॅकेट्सवर रशियन भाषेत लिहिलेले आहे.