CoronaVirus Live Updates : बापरे! श्वास घेण्यास त्रास, रुग्णांच्या फुफ्फुसावरही वाईट परिणाम; मुंबईत पुन्हा वेगाने वाढतोय कोरोना

By ऑनलाइन लोकमत | Published: August 20, 2022 03:47 PM2022-08-20T15:47:01+5:302022-08-20T16:11:36+5:30

CoronaVirus Live Updates : देशाची आर्थिक राजधानी मुंबईत कोरोनाने पुन्हा डोकं वर काढले आहे. गेल्या काही दिवसांपासून कोरोनाचे एक हजाराहून अधिक नवे रुग्ण समोर येत आहेत.

देश कोरोनाच्या महाभयंकर संकटाचा सामना करत आहे. गेल्या 24 तासांत कोरोनाचे 13,272 नवे रुग्ण आढळून आले आहेत. कोरोनामुळे आतापर्यंत देशभरात तब्बल 5,27, 289 लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. अनेक राज्यांमध्ये आता पुन्हा एकदा कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत असलेली पाहायला मिळत आहे. यामुळे प्रशासनाच्या चिंतेत भर पडली आहे.

देशाची आर्थिक राजधानी मुंबईत कोरोनाने पुन्हा डोकं वर काढले आहे. गेल्या काही दिवसांपासून कोरोनाचे एक हजाराहून अधिक नवे रुग्ण समोर येत आहेत. दरम्यान, कोरोनाच्या या संसर्गाचा परिणाम लोकांच्या फुफ्फुसावर होत आहे. त्यामुळे लोकांना श्वास घेण्यास मोठा त्रास होत आहे. सर्वाधिक परिणाम ज्येष्ठ नागरिकांना होतो. जे इतर आजारांनी त्रस्त आहेत.

लसीचे सर्व डोस घेतलेल्या लोकांनाही ही समस्या होत आहे. राज्यातील विविध वैद्यकीय महाविद्यालयात दाखल झालेल्या 200 कोरोना रुग्णांच्या तपासणीत घसा खवखवणे, सर्दी, धाप लागणे, अस्वस्थ वाटणे अशा समस्या होत असल्याचँ डॉक्टरांना आढळून आले. जे नंतर रुग्णांच्या फुफ्फुसात पोहोचतं. मात्र, त्यामुळे मृतांच्या संख्येत कोणतीही वाढ झालेली नाही. तर काही रुग्णांना ऑक्सिजनची गरज भासते.

मुंबईत गेल्या दोन दिवसांपासून कोरोनाचे एक हजारांहून अधिक नवे रुग्ण आढळून येत आहेत. शुक्रवारी कोरोनाचे 70 रुग्ण मुंबईतील रुग्णालयात दाखल झाले. गेल्या 52 दिवसांतील कोरोना रूग्णांच्या रूग्णालयात दाखल होण्याचा हा सर्वात मोठा आकडा आहे. सध्या रुग्णालयात कोरोनाचे 509 रुग्ण उपचार घेत आहेत.

मुंबईत सध्या 20 कोरोना रुग्ण ऑक्सिजन सपोर्टवर आहेत तर 17 व्हेंटिलेटरवर आहेत. बहुतेक रूग्णांमध्ये सारखीच सुरुवातीची लक्षणे असतात, नंतर काहींना ताप, श्वासोच्छवासाची तक्रार असते. डॉ. गौतम भन्साळी यांच्या मते, काही ज्येष्ठ नागरिकांचे एचआरसीटी स्कोअरही कमी असल्याचे आढळून आले आहे. त्याचवेळी डॉ. सलील यांच्या म्हणण्यानुसार 6-7 दिवसांनी रुग्णांच्या त्रासात वाढ होत आहे. अशा रुग्णांना इतर आजारही असतात.

डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार, सौम्य लक्षणे असलेल्या रुग्णांसाठी फारशी काळजी नाही कारण सध्या हंगामी आजार देखील लोकांना त्रासदायक ठरत आहेत. डॉ.राहुल पंडित यांच्या म्हणण्यानुसार, इन्फ्लूएन्झा झालेल्या रुग्णांच्या रक्तातील ऑक्सिजनची पातळीही कमी असल्याचे दिसून येत आहे.

नागरिकांनी तापाकडे दुर्लक्ष करू नये. मात्र, दहीहंडी किंवा इतर सणांमध्ये गर्दी झाल्यानंतर कोरोनाचे प्रमाण वाढू शकते, ज्यासाठी आम्ही तयार आहोत असंही डॉक्टरांनी म्हटलं आहे. देशातील अनेक राज्यांमध्ये आता पुन्हा मास्क सक्ती करण्यात आली आहे. तसेच कोरोना नियमावलीचं पालन करण्याचं देखील आवाहन हे सातत्याने केलं जातं. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.

जगभरात कोरोनाचा हाहकार पाहायला मिळत आहे. रुग्णांच्या संख्येने तब्बल 60 कोटींचा टप्पा पार केला आहे. तर लाखो लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. कोरोनामुळे लोकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. अनेक देशांमध्ये गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. रुग्णांची संख्या सातत्याने वाढत असल्याने काही ठिकाणी भीषण परिस्थिती आहे.

वर्ल्डोमीटरच्या आकडेवारीनुसार, जगभरात कोरोनाने आतापर्यंत 64 लाख लोकांचा बळी गेला आहे. तर 60 कोटींहून अधिक लोकांना कोरोनाची लागण झाली असून एकूण रुग्णांची संख्या 600,021,122 आहे. तर 6,470,055 जणांचा मृत्यू झाला आहे. जगभरात 574,069,684 लोकांनी कोरोनावर मात केली आहे. तर कोट्यवधी लोकांनी लस घेतली आहे.