CoronaVirus 4th Wave: चिंताजनक! जूनमध्ये येणार कोरोनाची चौथी लाट? IIT चा मोठा दावा, XE नं वाढवलं टेन्शन

By ऑनलाइन लोकमत | Published: April 15, 2022 07:52 PM2022-04-15T19:52:49+5:302022-04-15T20:08:40+5:30

आरोग्य मंत्रालयाने जारी केलेल्या आकडेवारीनुसार, गेल्या 24 तासांत (शुक्रवारी) भारतात 949 नवे कोरोनाबाधित समोर आले आहेत. यामुळे आता, भारतातील एकूण संक्रमित रुग्णांची संख्या 11,191 वर पोहोचली आहे.

देशात पुन्हा एकदा कोरोना रुग्ण संख्या वाढताना दिसत आहे. यामुळे आरोग्य विभागाचे टेन्शनही वाढले आहे. गेल्या जवळपास 2 वर्षांपासून, कोरोनाचे नव-नवे व्हेरिअंट सातत्याने समोर येत आहेत. यातच आता, कोरोनाचा नवा व्हेरिअंट XE नेही भारताच्या गुजरात आणि महाराष्ट्रात प्रवेश केला आहे.

आरोग्य मंत्रालयाने जारी केलेल्या आकडेवारीनुसार, गेल्या 24 तासांत (शुक्रवारी) भारतात 949 नवे कोरोनाबाधित समोर आले आहेत. यामुळे आता, भारतातील एकूण संक्रमित रुग्णांची संख्या 11,191 वर पोहोचली आहे.

गेल्या काही दिवसांत रुग्णसंख्या सातत्याने वाढत असल्याने, तज्ज्ञांनीही चौथ्या लाटेचा अंदाज वर्तवला आहे. कोरोनाच्या चौथ्या लाटेसंदर्भात आयआयटी कानपूरने एक अध्ययन केले आहे. यात, चौथी टाक केव्हापर्यंत येऊ शकते, यासंदर्भात सांगण्यात आले आहे.

काही दिवसांपूर्वी आयआयटी कानपूरमधील तज्ज्ञांनी एक संशोधन केले होते. त्या संशोधनानुसार, 22 जून 2022 च्या जवळपास देशात कोरोनाची संभाव्य चौथी लाट सुरू होऊ शकते. ऑगस्ट महिन्याच्या अखेरीस ही लाट पीकवर असेल. प्रीप्रिंट रिपोजिटरी MedRxiv वर शेअर करण्यात आलेल्या रिव्ह्यूनुसार, चौथ्या लाटेसंदर्भात अभ्यास करण्यासाठी सांख्यिकीय मॉडेल वापरण्यात आले होते. यात, संभ्याव्य नवी लाट चार महिन्यांपर्यंत चालेल, असे समोर आले.

संशोधनात सांगण्यात आले होते की, या अभ्यासाच्या डेटानुसार, भारतात कोरोनाची चौथी लाट, प्रारंभिक डेटा उपलब्ध होण्याच्या तारखेपासून 936 दिवसांनंतर येईल. प्रारंभिक डेटा उपलब्ध झाल्याची तारीख 30 जानेवारी 2020 होती. यामुळे चौथी लाट सुरू होण्याची संभ्याव्य तारीख 22 जून 2022 च्या आसपास असू शकते. तर 23 ऑगस्टच्या जवळपास याचा पीक असू शकतो. तसेच 24 ऑक्टोबर 2022 पर्यंत लाट संपू शकते.

IIT कानपूरच्या गणित आणि सांख्यिकी विभागाचे सबरा प्रसाद राजेश भाई, सुभ्रा शंकर धर आणि शलभ यांच्या नेतृत्वाखालील हे अध्ययन करण्यात आले. चौथ्या लाटेची तीव्रता देशातील नवीन कोरोनाव्हायरस व्हेरिअंट आणि लसीकरणाच्या स्थितीवर अवलंबून असेल, असेही या अध्ययनावरून स्पष्ट होते.

विज्ञानाच्या आधारावर तपास होणे आवश्यक - नीती आयोग कोरोनाच्या चौथ्या लाटेसंदर्भात भविष्यवाणी करणाऱ्या IIT-कानपूरच्या अध्ययनासंदर्भात बोलताना, NITI आयोगाने म्हटले होते की, ते अशा प्रकारच्या अध्ययनाचा अत्यंत सन्मान करतात. मात्र, या विशेष रिपोर्टचे वैज्ञानिक मूल्य आहे की नाही, हे तपासणे अद्याप बाकी आहे.