CoronaVirus :१० सेकंद श्वास रोखून धराल तर होणार नाही कोरोनाचे शिकार; खरं की अफवा?

By ऑनलाइन लोकमत | Published: March 24, 2020 05:35 PM2020-03-24T17:35:30+5:302020-03-24T17:52:59+5:30

जगभरात कोरोना व्हायरसने थैमान घातलं आहे. 16 हजार 497 बळी कोरोनाने आत्तापर्यंत घेतले आहेत. या आजाराला थांबवण्यासाठी किंवा या व्हायरसपासून बचावासाठी सोशल मीडियावर अनेक उपाय सांगितले आहेत. तसंच अफवा सुद्धा झपाट्याने पसरवल्या जात आहेत. या अफवांमध्ये किती तथ्य आहे. याबाबत आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

सोशल मीडियावर अशी अफवा पसरवण्यात आली होती की कोरोना व्हायरसची तपासणी घरच्याघरी सुद्धा करू शकतो. त्यासाठी दवाखान्यात जाण्याची गरज नाही.

अनेकांनी असा दावा केला आहे कोणीही व्यक्ती आपला श्वास १० सेकंद रोखून धरेल तर कोरोनाचे संक्रमण त्या व्यक्तीला होणार नाही.

१३ मार्चच्या एका फेसबुक पोस्टनुसार एखाद्या व्यक्तीने १० सेकंद आपला श्वास रोखून धरला तर ती व्यक्ती कोरोनापासून लांब राहू शकते. त्याच्या घशातील समस्या कमी होण्यास मदत होते.

तज्ञांनी या दाव्याची सत्यता पळताळून पाहिल्यानंतर अशा प्रकारचे दावे निव्वळ अफवा असल्याचे स्पष्ट केलं आहे.

तज्ञांच्या माहितीनुसार जगभरातील एकही कोरोना रुग्ण १० सेकंदापर्यंत श्वास रोखून धरू शकत नाही. याऊलट अनेक कोरोना व्हायरसचे रुग्ण हे वयोवृध्द असल्यामुळे आपला श्वास रोखून धरणं त्यांना शक्य नसतं.

वाढती कोरोनाच्या रुग्णाची संख्या पाहता कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन केलं आहे. याच पार्श्वभूमीवर संपूर्ण महाराष्ट्रात लॉकडाऊन केलं आहे.

भारतात आतापर्यंत 492 जणांना कोरोनाची लागण झाल्याचे आढळून आले आहे. आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार यापैकी 34 रुग्ण पूर्ण पणे बरे झाले असून 9 जणांचा मृत्यू झाला आहे.