Corona Vaccine: खुशखबर! भारतात लसीचं काऊंटडाऊन सुरू; २०२१ पर्यंत कोरोनामुक्त होण्याचं लक्ष्य

By प्रविण मरगळे | Published: December 15, 2020 10:19 AM2020-12-15T10:19:35+5:302020-12-15T10:24:23+5:30

कोरोना महामारीने संपूर्ण जगात हाहाकार माजवला आहे. कोविड १९ च्या संकटामुळे अमेरिकेसारखा बलाढ्य देशही त्यांच्या ३ लाखाहून अधिक लोकांना वाचवू शकला नाही. भारतातही आतापर्यंत कोरोना व्हायरसमुळे १ लाख ४३ हजाराहून जास्त लोकांना जीव गमवावा लागला आहे. पण आता कोरोना व्हायरसचं संक्रमण नियंत्रणात येत असल्याचं दिसून येत आहे. भारतात कोरोना व्हायरस संपुष्टात येण्याची सुरुवात झाली आहे.

सीरम इंस्टिट्यूट ऑफ इंडियाचे सीईओ अदार पूनावाला यांचा दावा आहे की, त्यांच्या कंपनीला या महिन्याच्या अखेरपर्यंत कोरोना लशीचा (Covid 19 Vaccine) इमरजेन्सी वापर करण्याची परवानगी मिळू शकते. अदार पूनावाला यांची कंपनी ब्रिटनच्या ऑक्सफोर्ड एस्ट्राजेनेकासोबत संयुक्तपणे कोविशिल्ड नावाची लस तयार करत आहे. त्याशिवाय भारत बायोटेक आणि फायजर इंडियाही भारतात कोरोनावरील लस बनवण्याच्या स्पर्धेत आहे

कोविशिल्डची तिसऱ्या टप्प्यातील चाचणी पूर्ण झाली आहे. त्यांनी भारत आणि ब्रिटनमध्ये इमरजेन्सी वापरासाठी परवानगी मिळावी यासाठी अर्ज केला आहे. भारत बायोटेकची कोवाक्सिन हैदराबादमध्ये तयार होत आहे. त्यांनीही इमरजेन्सी वापरासाठी केंद्राकडे परवानगी मिळावी यासाठी अर्ज केला आहे. अमेरिकेत फायजरची कोरोना लस टोचण्याची सुरुवातही झाली आहे. त्यांनी भारतात ड्रग्स कंट्रोलर जनरल ऑफ इंडियाकडे परवानगीसाठी अर्ज केला आहे.

अदार पूनावाला यांचा अंदाज आहे की, जर कोरोना लस वापरासाठी परवानगी मिळाली तर २०२१ च्या सप्टेंबर-ऑक्टोबरपर्यंत भारतात जनजीवन सर्वसामान्य होऊ शकतं. तोपर्यंत देशातील २० टक्के लोकसंख्येला कोरोना लस उपलब्ध झाली असेल. ते शक्य झालं तर भारत कोरोनाविरुद्धची लढाई जिंकेल असा विश्वासही अदार पूनावाला यांनी व्यक्त केला आहे.

देशात एकीकडे कोरोना लस येण्याची आतुरतेने प्रतिक्षा केली जात आहे. तर दुसरीकडे विविध राज्यांनी कोरोना लस स्टोरेज, वितरण आणि लसीकरण करण्याची तयारी सुरु केली आहे. कोरोना लस ठेवण्यासाठी थंड तापमान आवश्यक आहे. यासाठी डीप फ्रिजर आणि दुसऱ्या साहित्यांची जमवाजमव सुरु केली आहे.

सरकारने कोरोना लसीकरण करण्यासाठी मार्गदर्शनक सूचना तयार केली आहे. कोरोना काळात लॉकडाऊनपासून लस वितरण करण्यापर्यंतचं प्लॅनिंग करण्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भूमिका महत्त्वाची आहे.या प्लॅनिंगतंर्गत लसीकरण करण्याची तयारी सुरु करण्यात आली आहे. यूपीच्या ७५ जिल्ह्यात कोरोना लशीची कोल्ड चेन तयार करण्यात आली आहे.

दिल्लीत लसीकरण करणाऱ्यांना प्रशिक्षण देण्यास सुरुवात झाली आहे. या महिन्याच्या अखेरपर्यंत अथवा जानेवारीत लसीकरण देण्याइतपत दिल्लीत तयारी झाली आहे. दिल्लीत १ लाख आरोग्य कर्मचारी आणि १ लाख ७० हजार कोविड कर्मचाऱ्यांना पहिल्या टप्प्यात कोरोना लसीकरण करण्यात येणार आहे

कोविड लसीकरण कार्यक्रमातंर्गत जम्मू काश्मीरमध्ये संपूर्ण लोकसंख्येला लस दिली जाणार आहे. यात ज्या लोकांना कोरोनाचा धोका अधिक आहे अशांना प्राधान्य दिलं जाणार आहे. एका केंद्रावर १०० ते २०० जणांना लस दिली जाणार आहे. तसेच लस दिल्यानंतर ३० मिनिटे संबंधित व्यक्तीवर काय परिणाम होतो याचं निरीक्षण करण्यात येणार आहे.

लसीकरण केंद्रावर एकावेळी एकाच व्यक्तीला लस टोचली जाईल. कोविड एप्लिकेशनमध्ये पहिल्यांदा नोंदणी करावी लागेल त्यानंतर लस दिली जाईल. ऑन द स्पॉट रजिस्ट्रेशन होणार नाही. पहिल्या टप्प्यात ३० कोटी लोकांना कोरोनाची लस उपलब्ध करून दिली जाणार आहे.

पहिल्या टप्प्यात आरोग्य कर्मचारी, ५० वर्षापेक्षा जास्त वय असणाऱ्या नागरिकांना, ५० वर्षापेक्षा कमी वय असणाऱ्या गंभीर आजारी रुग्णांना प्राधान्याने लस टोचण्यात येणार आहे. भारताने सर्वात जास्त कोरोना लशीची ऑर्डर दिली आहे. आतापर्यंत १६० कोटी डोसची ऑर्डर देण्यात आली आहे.