Corona Medicine : दिलासादायक! 35 रुपयांची कॅप्सूल, 5 दिवसांचा कोर्स; कोरोनावरील 'या' खास औषधासंदर्भात जाणून घ्या

By ऑनलाइन लोकमत | Published: January 5, 2022 04:32 PM2022-01-05T16:32:51+5:302022-01-05T16:39:48+5:30

Molnupiravir Corona Medicine : हे औषध भारत स्ट्राइड्स फार्मा, डॉ. रेड्डीज, सन फार्मा, सिप्ला, हिटेरो आणि ऑप्टीमस सारख्या 13 कंपन्या तयार करत आहेत. या सर्व कंपन्या हे औषध आपल्या ब्रँड नेमने लॉन्च करत आहेत.

कोरोना विषाणूवर एक नवीन औषध भारतात आले आहे. काही दिवसांपूर्वीच, ड्रग्स कंट्रोलरने अँटी-व्हायरल औषध मोलनुपिरावीरच्या आपत्कालीन वापरास मान्यता दिली होती. या औषधाचा वापर कोरोनाच्या उपचारात केला जाणार आहे. भारतातील 13 कंपन्या हे औषध तयार करत आहेत

मोलनुपिरावीर हे औषध कोरोनाच्या उपचारात अत्यंत प्रभावी मानले जात आहे. या औषधामुळे कोरोना रुग्णांना रुग्णालयात दाखल होण्याचा आणि मृत्यू होण्याचा धोका लक्षणीयरित्या कमी होईल. या औषधाचा एक डोस 200mg असेल. त्याचा कोर्स ५ दिवसांचा असेल.

अशी असेल या औषधाची किंमत - हे औषध भारत स्ट्राइड्स फार्मा, डॉ. रेड्डीज, सन फार्मा, सिप्ला, हिटेरो आणि ऑप्टीमस सारख्या 13 कंपन्या तयार करत आहेत. या सर्व कंपन्या हे औषध आपल्या ब्रँड नेमने लॉन्च करत आहेत.

हैदराबादमधील डॉ. रेड्डीजने 'Molflu' नावाने हे औषध बाजारात आणले आहे. याच्या एका कॅप्सूलची किंमत 35 रुपये एवढी ठेवण्यात आली आहे. बाधित रुग्णांना 24 तासांत या 8 गोळ्या घ्याव्या लागणार आहेत. म्हणजेच 5 दिवसांत 40 गोळ्या. घ्याव्या लागणार आहेत. या औषधाच्या 40 कॅप्सूल्सची किंमत 1,400 रुपये एवढी असेल.

कोण घेऊ शकतं हे औषध? - वैद्यकीय सल्ल्याशिवाय हे औषध घेणे धोकादायक ठरू शकते. याशिवाय, तुमचे वय 18 वर्षांपेक्षा कमी असेल किंवा तुम्ही गर्भवती असाल तरीही हे औषध घेऊ नये.

ज्या रुग्णांना कोरोनाची गंभीर लक्षणे असतील त्यांनाच हे औषध दिले जाईल. सौम्य लक्षणे किंवा कोणतीही लक्षणे नसलेल्यांना हे औषध न घेण्याचा सल्ला देण्यात आला आहे.

कुठून विकत घेता येईल हे औषध? - हे औषध देशभरातील फार्मसीच्या दुकानात मिळेल. डॉ. रेड्डीज शिवाय, इतर कंपन्यांकडूनही Molnupiravir औषध बाजारात येत आहे. ही सर्व औषधे बाजारात उपलब्ध असतील, जी वैद्यकीय सल्ल्याने घेता येतील.

यासंदर्भात डॉ. रेड्डीज यांनी जारी केल्या एका निवेदनानुसार, पुढील आठवड्यापासून देशभरातील फार्मसी दुकानांमध्ये Molflu औषध विकले जाईल. तसेच, ज्या राज्यांमध्ये कोरोनाचे रुग्ण अधित आहेत, अशा राज्यांना हे औषध सर्वप्रथम विकले जाईल.

कुणी तयार केलं हे औषध? - हे औषध अमेरिकन फार्मा कंपनी Merck ने तयार केले आहे. यूएस फूड अँड ड्रग्स अॅडमिनिस्ट्रेशन (FDA) ने नुकतेच, हे औषध कोरोना रुग्णांवर उपचार करण्यासाठी वापरण्यास परवानगी दिली आहे. आता या औषधाला भारतातही परवानगी मिळाली असून ते भारतातही बनवले जात आहे.