कांदा कापताना डोळ्यात एकही थेंब येणार नाही; शेफ पंकज भदौरियाने सांगितल्या ट्रिक्स...

By ऑनलाइन लोकमत | Published: March 13, 2023 08:06 AM2023-03-13T08:06:06+5:302023-03-13T08:13:44+5:30

कांदा कापताना डोळ्यातून पाणी न येण्यासाठी काय करावे? शेफ पंकज भदौरिया हिने काही ट्रिक्स सांगितल्या आहेत.

कांदा कापताना डोळ्यात पाणी येते. अक्षरशा कांदा कापणारा घळघळा रडतोय की काय, असे वाटते. काही वर्षांपूर्वी तर एका मुलाचा कांदा कापताना डोक्यावर हेल्मेट घातलेला फोटो खूप व्हायरल झाला होता. यामुळे बरेचजण कांदा कापण्यासाठी नकार देतात. अनेकदा कांदा ओला असेल तर डोळ्यात पाणी येण्याचा प्रकार हा जास्त असतो.

कांदा कापताना डोळ्यातून पाणी न येण्यासाठी काय करावे? शेफ पंकज भदौरिया हिने काही ट्रिक्स सांगितल्या आहेत. त्या एकदा ट्राय करून पहा. फायदा झाला तर तुमचाच, तुमच्या मैत्रिणी, मित्र आणि शेजाऱ्यांनाही सांगा. फायदा झाला तर त्यांचाही...

तुमच्या घरात कोणी कांदा कापत असेल तर त्याच्या डोळ्यात तुम्ही पाणी पाहिले असेल. परंतू कधी टीव्हीवर शेफच्या डोळ्यात पाणी आलेले पाहिलेय? एखाद्या मोठ्या हॉटेलमध्ये शेफच्या डोळ्यात पाणी पाहिलेय? ही शक्यता फार कमी आहे. कारण ते लोक यापैकीच एखादी ट्रिक वापरत असतील.

पंकज भदौरिया हिने नुकताच तिच्या इन्स्टावर कांदा कापतानाचा व्हिडीओ शेअर केला आहे. कांदा कापण्यापूर्वी एक छोटासा उपाय केला तर तुमचे अश्रू वाहणार नाहीत, असे ती म्हणतेय. जर तुम्हाला विश्वास बसत नसेल तर एकदा ट्राय करून पहा.

कांदा कापताना डोळ्यात पाणी का येते? हे आपण शाळेत असताना शिकले आहे. कांद्यातील पेशी कापल्या जातात, यामुळे त्यातून जो गॅस बाहेर पडतो, त्यामुळे सल्फेनिक अॅसिड तयार होते. हवेत आल्यावर त्याचे प्रोपैनथियॉल एस-ऑक्साइड गॅसमध्ये रुपांतर होते.

हाच गॅस डोळ्याला लागला की डोळ्यातील पाण्यासोबत रासायनिक प्रक्रिया होऊन सल्फ्यूरिक असिड तयार होते आणि त्यामुळे डोळ्यांना टोचल्यासारखे वाटू लागते. मग डोळ्यातून पाणी येऊ लागते.

मास्टरशेफ पंकजनुसार कांदा कापण्यापूर्वी कांद्याची साले काढून तो मधोमध कापावा आणि काही वेळासाठी पाण्यात ठेवावा.

दुसरा उपाय म्हणजे, कांदा कापताना तोंडात चिंगम ठेवावा. तो चावत चावत कांदा कापल्यास डोळ्यातून पाणी येत नाही. असे करून तुम्ही खूप सारे कांदे कापू शकता. पार्टीच्या तयारीसाठी ही ट्रिक वापरता येईल.

कांदा कापताना डोळ्यातून अश्रू न येण्यासाठी ते १५ ते २० मिनिटे आधी फ्रिजमध्ये ठेवावे. यामुळे कांद्यातील जे डोळ्यांत पाणी आणण्यास कारणीभूत रसायन असते ते कमी होते. मग कापताना त्याचा त्रास होत नाही.

चिरण्यापूर्वी कांद्याच्या मुळाचा भाग कापून वेगळा करा. कांदा कापताना समोर मेणबत्ती, दिवा किंवा अन्य काही पेटती वस्तू ठेवा. त्यात ज्योत हवी.

किंवा धारदार चाकू वापरा. खुल्या हवेत किंवा पंख्यासमोर कांदे कापून घ्या.