फोडणी देण्यासाठी 'या' 6 पद्धतींचा कराल वापर; तृप्त होऊन द्याल ढेकर
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 12, 2019 16:02 IST2019-02-12T15:57:18+5:302019-02-12T16:02:49+5:30

भाजी अथाव एखादा पदार्थ तयार झाल्यानंतर त्यावर फोडणी म्हणजेच तडका देण्यात येतो. यामुळे पदार्थाच्या रंगासोबतच त्याची चवही बदलते. असं म्हणतात की, भौगोलिक परिस्थितीनुसार तेथील संस्कृतिही बदलते. त्याचप्रमाणे आपल्या देशातील प्रत्येका राज्यांमधील खाद्यसंस्कृती वेगळी आहेच, पण तेथे मिळणाऱ्या वेगवेगळ्या पदार्थांप्रमाणेच तेथील पदार्थांना देण्यात येणारी फोडणीही वेगळी असते. त्यामुळे प्रत्येक राज्यांमध्ये आढळून येणाऱ्या पदार्थांची चवही वेगळी असते.
साउथ इंडियन पद्धतीची फोडणी
तेल गरम करून त्यामध्ये राय, कढिपत्ता, कापलेल्या हिरव्या मिरच्या एकत्र करा. राय तडतडल्यावर हलकासा मसाला टाका. तयार फोडणी सांबर, नारळाची चटणी किंवा भातावर देऊन त्याची चव वाढवा.
पंजाबी पद्धतीची फोडणी
पॅनमध्ये तेल गरम करत ठेवा. त्यामध्ये राय-जीरं टाकून थोडंसं तडतडू द्या. त्यानंतर त्यामध्ये बारिक कापलेला कांदा टाका. कांदा गुलाबी होइपर्यंत परतवून घ्या. त्यानंतर त्यामध्ये आलं-लसणाची पेस्ट एकत्र करून टॉमेटो, राय-जीरं, काळी मिरी इत्यादी एकत्र करून थोडं शिजवून घ्या. खमंग अशी पंजाबी पद्धतीची फोडणी तयार आहे.
रायत्यावर देण्यात येणारी फोडणी
दही फेटून तयार केलेल्या रायत्यावर एक तेजपत्त्याचं पान ठेवा. लाकडाच्या कोळशाचा तुकडा गॅसवर ठेवून गरम करा. कोळसा गरम झाल्यानंतर त्यावर चिमूटभर हिंग, जीरं आणि राय टाका. थोडं तडतडल्यावर त्यावर तूपाचे दोन-तीन थेंब टाका. आचेवरून उचलून कोळशाचा तुकडा तेज पत्त्याच्या पानावर ठेवा. त्यानंतर रायत्यावर झाकण ठेवा.
मक्खनी तडका
एका पॅनमध्ये लोणी गरम करून त्यामध्ये आलं-लसणाची पेस्ट, टॉमेटोची प्यूरी, मीठ, लाल मिरची पावडर आणि थोडीशी साखर टाकून एकत्र करून घ्या. तयार फोडणी एखाद्या पदार्थाला देवून त्याची लज्जत वाढवा.
तीळाची फोडणी
तीळाचं तेल गरम करून त्यामध्ये पांढरे किंवा काळे तीळ टाका. तडतडल्यावर शेंगदाण्याचा कूट टाकून हलकंसं शेकून त्यामध्ये मसाला एकत्र करा. तयार फोडणी डाळ, भात किंवा पुलावमध्ये देऊ शकता. ही फोडणी चटणीला दिल्यामुळे चटणी लवकर खराब होणार नाही.
डाल तडका
तूप गरम करून त्यामध्ये जीरं, लवंग, हिंग, बारिक लसूण, लाल मिरची, काळी मिरी आणि लाल मिरची पावडर एकत्र करून गरम करा. तयार फडणी डाळीवर द्या. डाळीची चव वाढविण्यासाठी मदत होइल.